Saturday 21 May 2011

सार काही क्षम्य असतं

म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सार काही क्षम्य असतं
पण प्रेमात पडतानाचा क्षण अनुभवणं.......
हे इतके रम्य असते की
त्यापुढे तू दिसावीस म्हणुन ;
क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असतं
त्यामुळे परिक्षेची एक दोन युद्ध हरणं ही क्षम्य असतं.........
माझं ताटकळतं तुझी वाट पहात असणं...तुझं येणं...
आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन
मी किती रागावलोय ;
याचा अंदाज घेणं.....
तुझं हे असं पहाणं......
हे इतके रम्य असतं की
त्यापुढे तुझं मला तासभर उन्हात ताटकळवणंही क्षम्य असतं.......
मला उमजत असतात तुझी ती खोटी आर्जवं..
तुझे ते कसलेही बहाणे....
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......

No comments:

Post a Comment