Saturday 14 December 2013

डिसेंबर (2)

यातच कधीकधी सिंह राशी तुन होणारा लिओनीद उल्कावर्षाव आकाशाला चार चांद लावून जातो. अगोदरच आकाशात मोत्याने भरलेली चादर पसरलेली असते त्यात तो उल्कावर्षाव अस्मानात दिवाळी साजरी करत असतो. तारा पडताना पहाताना जर काही इच्छा व्यक्त केली तर खरी होते म्हणतात. उल्का वर्षाव होताना जणू नभांगन म्हणत असते घे लेका काय घ्यायच्या त्या इच्छा पूर्ण करुन घे.इकडे तिकडे उल्का पडताना आपण सगळ्या इच्छा विसरून जातो. बेभान होउन जातो. अन पहाटे पहाटे लक्षात येतो अरे आकाश आपल्याला ओंजळी भरभरून घे म्हणत होते आणि आपण काहीच मागितले नाही. ज्याने हा लिओनीद उल्कावर्षाव आयुष्यात एकदा तरी पाहीला तो जीवन भभरुन जगला. "जिवेत शरद: शतम" असे उगाच म्हणत नसावेत. ही अस्मानी देन डिसेंबरमधेच मिळते.
सगल्या हवेतच एक अनामिक उत्साह आनंद भरलेला असतो. कधी चुकून पहाटे जाग आली अन उबदार दुलई च्या बाहेर येवुन फिरायला जायचा मूड आला तर झकास मजा असते. थंडी अशी बहरात असते . अंगावर किंचीत काटा शिरशीरी ,अशा रोमांचित अवस्थेपासून हुडहुडी , दातावर कडकड दात वाजणे डोळ्यातुण पाणी येणे. अशा आवेगी अवस्थेपर्यन्त सगळ्या अवस्था एकाच क्षणात अनुभवायला मिळतात. त्यातून बाहेर पडून थोडे चालायला लागलो की मग अंगात एक वेगळाच विलक्षण उत्साह सम्चारतो. पार जगाच्या अंतापर्यन्त पळत सुटावेसे वाटते. ही नशा नुभवायची तर डिसेंबरातच कंटाळा हा शब्द डिक्षनरीतुनसुद्धा एकदम हद्दपार होउन कुठेतरी गायब झालेला असतो.अशावेळी आपलं चालणं सुद्धा एकदम वेगळच झालेलं असतं एकदम अल्लड. जगाचं दुसरं टोक गाठायची घाइ झाल्यासारखं.
समोरुन येणारे सगळे चेहरे मफलर शाल स्वेटर कानटोपी जर्कीन यानी झाकलेले असतात.
अशाच वेळेस एखादी सकाळ स्वतःचं रुपडं बदलून येते. ऐन डिसेंबरात आभाळ दाटून येतं वातावर कुंद झालेलं असतं. सगळं अंधुकलेलं असतं नगरपालीकेचे स्ट्रीट लाईट अगदीच मिणमिणत असतात. त्याअंधुक सकाळी रस्त्याचे दुसरे टोक कुठेतरी दुसर्‍या जगात जात असल्यासारखं दिसतं त्या धूसर प्रकाशात झाडे , इमारती , लाईटचे खांब अर्धवट धुक्यात लपेटलेल्या असतात. एखाद्या चित्रकाराने आपले चित्र अर्धे स्केचिंग करून अर्धेच रंगवुन ठेवल्या सारखे दिसत असतं.
आपण त्या चित्रातली एक व्यक्तीरेखा बनलेले असतो.काळ थांबवल्यासारखा असतो. घड्याळाचे काटे कुणीतरी फ्रीज केल्यासारखे आपण चित्रबद्ध होतो.
अशावेळेस कधी अवकाळी पाऊस येतो. शिंतोडे टपोरे थेंब मग मोठ्ठा पाऊस..... हा पाउस मे महिन्यातल्या पावसासारखा आनंदी वाटत नाही तर ग्रेस च्या कवीतेतला गूढ दु:खी वाटतो.
"पाऊस कधीचा पडतो......झाडांची हलती पाने...हलकेच मज जाग आली .दु:खांच्या मंद सूराने....." या ग्रेस च्या ओळी आतून आल्यासारख्या येतात " ती गेली तेंव्हा रिमझीम पाउस निनादत होता..... मेघात अडकली किरणे... हा सूर्य सोडवीत होता......" या ओळीतील सूर्याची अवस्था आपण अनुभवत असतो.एरव्ही गूढगर्भ भासणारी ग्रेसची कविता आपल्या आतून उमटत असते....... अशा वेळचा एकटे पणा ज्याने अनुभवलाय तो त्याक्षणी तरी वैराग्याच्या पलीकडे पोहोचलेला असतो. अशावेळेस दुरून कुठून मारवा ऐकायला मिळा किंवा दिवारोंसे मिलके रोना अच्छा लगता है.... किंवा ऐकायला आला तर मग ती अवस्था अत्यवस्था या प्रत जाते. उगाचच कसलीशी रुखरुख वाटते. आतून एकदम दाटून येते. उगाचच एक अनामिक हुरहूर लागते. का कोण जाणे उदास होत जातो.
यातुन बाहेर यावेसे वाटत नाही. त्याच मूड मधे आपण झोपी जातो.
दुसर्‍या दिवशीची सकाळ मात्र जादु केल्यासारखी उगवते. धुक्यातून सूर्य मिरण मार्ग काढत येतात. आणि आपले घर सोनेरी झळाळीने न्हाऊन काढतात.
एकदा मी अशाच डिसेंबरात. पंजाब मधे नांगल ( भीक्रा नांगल पैकी) गावात काही कामा निमीत्त होतो. गेस्टहाऊस एकदम धरणाच्या काठाला होते. समोरूच्या किनार्‍यावर एक सुवर्णवर्खी छत मिरवणारे गुरुद्वारा होते. आदले दिवशी सम्ध्याकाळी त्याकडे काही लक्ष्य गेले नाही. दुसर्‍यादिवशी पहाटे जाग आली तेंव्हा खोलीत धुके गच्च भरलेले होते. माझा हात मला जेमतेम कोपरापर्यन्त दिसत होता. थोड्यावेळाने सूर्योदय झाला अन एक इश्वरी चमत्कार झाला. गुरुद्वाराच्या छतावररुन परावर्तीत झालेले सोनेरी उन पाण्यात उतरले ते पुन्हा परावर्तीत होउन खिडकीतुन आत आले. धुके अन ते सोनेरी उन .... तो एक तास मी अक्षरशः स्वर्गात होतो. माझ्या रूमच्या भिंती टेबल बेड फॅन सगळे सोनेरी रंगाने न्हाऊन निघाले होते. त्या सोनेरी सकाळीचा अनुभव मला डिसेंबरनेच दिला.

डिसेंबर सम्पतासंपता ख्रिसमस येतो. सांताक्लॉज ची संकल्पना आपल्या कडे फारशी माहीत नाही. त्यातून मी न्यू इंग्लीश स्कूलचा विद्यार्थी . त्यामुळे सांताक्लॉजचा परीचय फक्त फिल्मी गाण्यातच झालेला. एकदा नाताळला पुण्यात कॅम्पमध्ये गेलो होतो. माझ्या लहान मुलीला अचानक घोडागाडीत सांताक्लॉज दिसला. त्याने तिला हॅलो केले. मुलगी घोडागाडी जवळ गेल्यावर तिच्या हातात त्याने चॉकलेट दिले. माझ्या मुलीच्या डोळ्यात साम्ताक्लॉज दिसल्याचा आनंद अक्षरशः निथळत होता. सांताक्लॉज दिसला . तो आपल्याला भेटला आणि त्याने चॉकलेट दिले न मगताच असे काही काहीतरी मोठ्ठे मिळू शकते यावर तिचा विश्वास बसत नव्हता . तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात आश्चर्य / आनंद मावत नव्हता.
डिसेम्बर असतो हुरहूर लावणारा. एक वर्ष सम्पले असे सांगणारा. इतकी वर्षे सम्पली तरीही आपण काहितरी करु शकलो नाही ही जणीव करुन देणारा. एखादा जीवलग आप्त दूर जातो तशी मनाची झपुर्झा अवस्था झालेले असते.
या वर्षभरात मिळालेल्या सुखदःखांचा / दिल्याघेतल्याचा हिषेब करायला लावणारा. ही अवस्था वीस डिसेंबरनंतर सुरु होते.
लहानपणी शाळेत मित्रना सांगताना एकतीस डिसेंबरला झोपुन एक जानेवारी ला उठलो तर मी मागील वर्षी झोपलो ते थेट यावर्षीच उठलो असे म्हणायचो. तोपर्यन्त एकतीस डिसेंबरचे फारसे वेगळेपण जाणावायचे नाही. मग कधीतरी टीव्ही आला. टीव्हीवर मुम्बै दूरदर्शन वर एकतीस डिसेंबरला विशेष कार्यक्रम व्हायला लागले. केबल टीव्ही आल्यानंतर हे व्यापक झाले. एकतीस डिसेंबर हा एक बघताबघता एक मोठा इव्हेंट बनला.
एकतीस डिसेंबर हा सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत हा डबल इव्हेंट झाला.अगोदरच डिसेंबरच्या हवेतला उत्साह असतोच.तो साजरा करायला निमित्तच लागते.धर्म देश प्रदेश भाषा सगल्या सीमा ओलांडून टाकणारा जागतीक उत्सव साजरा करायला मिळाला. एकतीस डिसेंबरच्या कितीतरी अगोदरपासून कोणाकोणाच्या एकतीस तारखेच्या कार्यक्रमाच्या जहीराती सुरु होतात. नाटकापासून /ऑर्केस्ट्रा./ फनी गेम्स /गझल / सुगम संगीत / फन फेअर कसले कसले कार्यक्रम होत असतात.
एकतीस तारखेला आपण वर्षभरात काय काय करायला मिळाले काय हुकले याचा हिषेब लावत असतो. मुलांचा संध्याकाळच्या पार्टीचा बेत एसएमेस वर किंवा व्हॉट्स अप वर पक्का ठरतो. आपन कोणालातरी आमंत्रीत करतो किंवा कोणातरी जायचे ठरवतो. एकमात्र असते. एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजताचा क्षण एकट्याने नव्हे तर मित्रांआप्तांसमवेत साजरा करायचा असतो. तो उन्मादी क्षण पुढच्या कितीतरी वर्षांसाठी आठवणीत साठवणीत ठेवून घ्याचा असतो.
साडेअ अकरा वाजतात आपण तयारी करतो. काय होणार माहीत असते तरी काहिशी उत्कंठा असते. अकरा पन्नास होतात.
आपण विल्डिंगाच्या टेरेसवर जातो. अकरा पंचावन्न..... आकाशात काहीच हालचाल नाही. अकरा सत्तावन्न..अठठावन्न.एकोणसाठ. साठ.......ढुंम्म्म्म्म्म्म्म्म........ आकाश उजेडाने भरून जाते. कुणीतरी आकाशात कस्लासा आकाश झगमगीत सोनीरी लाल निळा हिरवा असे आभाळ भरून टाकणारे प्रकाशाचे झाड उवडलेले असते. एक एक करत सगळीकडून आतशबाजी सुरु होते. लिओनीद उल्कावर्षावाला जणु उत्तर म्हणून नव्या वर्षाचे स्वागत फटक्यांच्या आतीषबाजीने सुरु होते..हॅप्पी न्यू इअर च्या आरोळ्या ऐकु येताय.
सोसायटीतील सर्वजण मधल्या कॉमन पॅसज मध्ये किंवा पार्किंग कधे येवुन एकमेकाना हॅपी न्यू इअर च्या शुभेच्छा देतात.
मोबाईल विवीध रिंगटोन्समध्ये किणकिणत असतात. पण प्रत्येकातुन उमटणारे शब्द हॅपी न्यू इअर म्हणत असतात.
वर्ष सरताना " का उगाच चिंतेत जगतोस मित्रा .आनंदी जग. उद्या नवा दिवस येणारा आहे." असा "हकूना मटाटा" दिलासा डिसेंबर देवून जातो. आपल्याला बोट धरून नव्या वर्षात घेवून जातो.

डिसेंबर (1)

ऐन डिसेंबरात आभाळ दाटून आलंय. ते तसे नेहमी एखाद्या दिवशी होतंच. "डिसेंबर" खरं तर मासानां मार्गोशीर्षोहमः म्हणावा असा. डिसेंबर म्हणजे नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली असते. सुट्टी संपवून शाळा कॉलेजे रुळावर येत असतात. गॅदरिंग चे वेध लागलेले असतात. दिवाळीच्या सुट्टीचा म्हणा की मस्त थंड हवेचा परीणाम म्हणा बहुतेक जण दुपारी सुद्धा उत्साही असतात. घरी कसाबसा एखादा कप चहा पिणारे मस्त पैकी आलं टाकून केलेल्या वाफाळत्या चहाचे दोन तीन राउंड सहज करतात.
सकाळचे कॉलेज असणारांची तर एक वेगळीच मजा असते. भल्या पहाटे अंथरुणावरुन बाहेर पडायची इच्छा नसते. गोधडीवर गोधडी "एक पाच मिनीटानी उठु" म्हणत पुन्हा गुडूप झोपतात. अशा घोरासूराना उठवायची एक मस्त ट्रीक कामी येते. घरभर वाफाळत्या आल्याच्या चहाचा सुवास दरवळतो. त्या मस्त गंधाने गारठा माघार घेतो. आपण एकदम फ्रेश होतो. मरगळ कुठे गायबते ते समजत देखील नाही. सुस्ती एकदम जादु झाल्यासारखी नाहीशी होते.
कॉलेज मधे तर एक वेगळाच माहौल असतो. एरवी काकूबाई छाप डार्क बदामी ,लाईट ग्रे, फिक्का मरून , असल्या मळखाउ रंगाना हद्दपार केलेले असते. पोपटी केशरी गुलाबी लाल जांभळा लेमन यलो अशा उत्साही रंगांची झगमग सुरु झालेली असते.
असे रंगीबेरंगी कपडे अंगावर असले की उत्साह अजूनच वाढतो.
कॉलेज कॅन्टीनला तिखट जाळ वडापाव आण गरमागरम कटिंग चहाच्या साक्षीने पीजे अर्थात डबड्या जोक्स च्या मैफिली सुरु होतात. एकातुन एक त्यातून अजून एक असे विषय निघत जातात. थेट मागच्या वर्षीच्या गॅदरिंग पर्यन्त जातो. गॅदरिंग च्या नाटकात काय धमाल झाली होती पासून लीना प्रधान ला मिळालेले फिशपाँड पर्यन्त चर्चा होत रहाते. या वर्षी देण्यासाठी जिलब्या पाडाव्या तशा चारोळ्या पडत असतात. गॅदरिंगच्या ऑर्केस्ट्रात दर वर्षी गायले जाणारे "दोनो ने किया था प्यार मगर. मुझे याद रहा तू भूल गया..... मैने तेरे लिये रे जग छोडा......" हे गाणे कोण गाणार याच्या चर्चा झडतात.
फर्स्ट इयर च्या मुलाना याची कल्पना नसते. त्यामुळे त्याना नईलाजाने ऑडियन्सची भूमिका घ्यावी लागते. पण त्यांच्या चेहेर्‍यावरची उत्सूकता आणि डोळ्यातील चमक बरेच काही सांगून जाते. आपणही हे असले क्षण मनात टीपत असतो.
गॅदरिंग मिस करायचे नाही. हा डोक्यातला विचार चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत असतो.
डिसेंबर महिन्यातील हवेचा परीणाम असो की नुकत्याच संपलेल्या दिवाळीचा. वातावरणात एक वेगळीच जादू असते.
नक्की काय ते सांगता येणार नाही.
चला आला धुंदूर मास. म्हणत आज्जी कधी गुळ घालुन मस्त गोडसर बाजरीच्या भाकर्‍या अन हिरव्या मिरच्यांचा ठेचा करायची. हिरव्या मिरचीचा सणसणीत तिखटजाळ कमी व्हावा म्हणुन सोबतीला ताटात लोण्याचा गोळा असायचा.
कच्चा कांदा मिर्चीचा ठेचा बाजरीची भाकरी अन सोबत तो लोण्याचा पांढरा शूभ्र गोळा. ही माझ्या लेखी तरी सर्वोच्च चैन आहे. कोणी डिसेंबर असे नुसते म्हंटले तरी मला त्या बाजरीच्या भाकरीचा खरपूस वास येतो.
डिसेंबरात लग्नांचा सुकाळ असतो. त्यामुळे बरेच महीने न भेटलेले सगे सोयरे मित्र नातेवाईक भेटत असतात. भेटल्यावर गप्पाना अक्षरश ऊत येतो. " अरे हो....... सकाळी लवकर उठायचे आहे." म्हणत रात्री किमान एक दीड पर्यन्त गप्पांचा जागर सुरूच रहातो.
डिसेंबर असतो स्नेह सम्मेलने काव्य सम्मेलने पुस्तक जत्रा आणि अशाच बर्‍याच सम्मेलनांचा. एकीकडे एकांकिका स्पर्धा. त्यातले ते जग वेगळेच असते. सदैव कसल्यातरी अचाट विचारानी भारलेलं. फुटकळ रोल असला तरी तो रोल ही पुढच्या भवितव्याची नांदी आहे या ठाम विश्वासावर अर्ध्या पाऊण तास चालणार्‍या एकांकिकेत नवं जग उभे करत त्यात जान ओतण्याचं सामर्थ्य त्या विश्वासत असते..
गावोगावी कोणती ना कोणती साहित्य सम्मेलने भरवली जातात. त्या निमित्ताने मोरोपंतांपासून नायगावकरांपर्यन्त नावे उगाळली जातात. त्यायल्या एखाद्या कार्यक्रमात शाळेत आठवी नववीत शिकलेली "नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूस.. माझे घर चंद्रमौळी .आणि दाराशी सायली.." ही इंदीरा संतांची कविता ही कविता संतूरच्या पार्श्व भूमीवर ऐकताना नव्याने भेटत जाते. कवितेचा शब्द न शब्द अंगभर संतुरचे झंकार उमटवतो.
डिसेंबर हा महिना गाण्याच्या, संगीताच्या मैफलींचा. नव्या जुन्या गायकाना ऐकण्याचा. त्या निमित्ताने पूर्वी ऐकलेल्या कुमार गंधर्व,शोभा गुर्टू, जसराज्, भीमसेन जोशी यांच्या मैफलींच्या आठवणीना उजाळा देण्याचा. हरीप्रसाद चौरसियांच्या बासरीवर ऐकलेला मालकंस, शिवकुमार शर्मानी संतूरवर छेडलेला हंसध्वनी आणि त्याला झाकीर हुसेन नी केलेली दणकेबाज साथ. त्याला मिळालेली टाळ्यांची छप्परफाड दाद. यांचे गारूड मानगुटीवरून उतरता उतरत नाही.
अशाच एखाद्या कार्यक्रमा कोणीतरी "आज जाने की जीद ना करो." ऐकवतं "रंजीशे सही......" ऐकवतं आपण पार हरवून जातो आणि नंतर स्वतःला कशाकशात शोधत रहातो.
डिसेंबर महिना असतो आकाशाचा. स्वच्छ निरभ्र आभाळ पहाण्याचा. शाळेत लहान असतानी मी निरभ्र या शब्दाचा अर्थ "निरभ्र म्हणजे अभ्रा न घातलेला" असा सांगितला होता. ते माझं निरभ्र वय होतं. कुठलाच अभ्रा, आवरण न चढवलेलं. जसं आहे तसं. डिसेंबरातलं आकाश तसंच असतं. डिसेंबरात संध्याकाळी मावळतीचं सूर्यबिंब दिसतं. ते जाणवतं ते त्याच्या पार्श्व भूमीवर उडणार्‍या पतंगाच्या हालचालीने. ईग्रजी व्ही च्या आकारात आकाशात उडणार्‍या बगळ्यांच्या माळे मुळे. डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात. हे कमी पडेल वाटले म्हणून की काय वृश्चिक राशी इंग्रजी एस आकारात आकाश व्यापून त्यातल्या अनुराधा मूळ ज्येष्ठा नक्षत्रानी दिवाळी साजरी करत असते.

Sunday 17 November 2013

एक बटा दो.... दो बटे चार (2)

असेच एकदा सिंहगडावर गेलो असताना बाबाने सूर्याजीने दोर कापल्यामुळे काय झाले ते सांगितले. मावळे त्वेशाने लढले. तुम्ही परतीचे दोर कापले की तुमची प्रगती होते. तुम्ही नवनव्या रिस्क्स घ्यायला तयार होता. हे सांगत असताना बाबाने स्पेन्सर जोन्सनच्या हु मूव्हड माय चीज चा संदर्भ आणला. इतिहासातील एका गोष्टीतून मोटीवेशन शी सांगड बाबाने सहज घातली होती. बाबाचे वाचन एकदम दांडगे. त्याला वाचलेले आठवायचे देखील. त्याचा त्याला फायदा व्हायचा. बाबाच्या वाचनामुळे मी सुद्धा लहान असतानाच वाचनाच्या प्रेमात पडले. बाबा मला खूप पुस्तके आणायचा पण त्यातली तो स्वतःच बर्‍याचदा वाचत बसायचा. "तोत्तोचान" एक होता कार्व्हर , हायडी या पुस्तकांची कितीतरी पारायणे आम्ही केली असतील कोण जाणे. एखादे जाड पुस्तक आणले की रात्रभर वाचून संपवायचा. बाबाच्या ओफिसच्या बॅगेत सुद्धा एखदे दुसरे पुस्तक असायचेच.
त्याउलट मम्मी. तीला मी रवीवारची लोकसत्ता सोडुन इतर काही वाचत बसलेले पाहिलेच नाही.तिच्या खांद्यावरच्या पर्समध्ये बाबाची बँकेची पासबुके आणि चेकबुक सोडून इतर काही पाहिले नाही. मी एकदा म्हणाले सुद्धा तसे. मम्मा म्हणाली हे चेकबुक मी साम्भाळते आहे म्हणून ठीक आहे निदान हवे तेंव्हा सापडते तरी. बाबाकडे ठेवले असते तर काही विचारायला नको.
ते मात्र खरे. सुरवातीला बाबा घरात असला की आम्ही नुसती धमाल करत असायचो. बाबा मम्माला म्हणायचा रात्रीचा स्वैपाक कशाला करतेस आपण बाहेर जाउया. मम्मा म्हणायची तुझे पैसे वर आले असतील तर मला दे. उगाच कशाला खर्च करत बसतोस. बाबा म्हणायचा अगं एरवी मी घरात नसतो. तेंव्हा तुम्ही दोघी असताच की घरात. आज मी आहे तर जाउयात बाहेर.
मम्मा म्हणायची की रोज तू बाहेरचेच जेवतोस आज घरचे जेव की.
बाबा कपाळाला हात लावून म्हणायचा की बघा कसली बायको मिळालीय.नवरा बाहेर जेवायला घेवून जातोय तर ही यायचे नाही म्हणते. तुझ्या जागी एखादी दुसरी कोण असती ना तर उड्या मारत तयार झाली असती.
मम्मा हा टाँट मस्त परतवुन लावायची. म्हणायची" मग शोध ना एखादी बाहेर जेवायला नेण्यासाठी."
बाबा निरुत्तर व्हायचा. मी खिदळत बसायचे. अशावेळेस बाबा अन मम्मा मला "खिदळपरी" म्हणायचे.
बाबा नंतर नंतर बरेच दिवस कामानिमित्त प्रोजेक्टसाठी बाहेरच असायचा. कधी ऑनसाईट तर कधी दिल्ली कलकत्ता बेंगलुर असे करत फिरायचा.
एक मात्र होते बाबा कधीही बाहेर गेला तरी तो दिवसातून एकतरी फोन करायचाच. मम्मा सुद्धा बाबाच्या फोनची आतुरतेने वाट बघत बसायची. फोन आला नाही तर कावरीबावरी व्हायची. सुरवाती सुरवातीला तर एकटीच रडत असायची. झोपताना मला त्याच्या फोटोवरुन हात फिरवायला सांगायची. मला कुशीत घेवून माझ्या केसातुन हात फिरवायची.
दिल्लीची असाइनमेंट घेतली होती त्यावेळेस बाबा जवळजवळ वर्षभर बाहेरच होता की ,फक्त शनिवार रविवार घरी यायचा ,त्यावेळी मम्मीच सगळं बघायची ,सगळ्या जवाबदार्‍या एकटी पेलायची ,मी तर केवढीशीच होते ,मला घेऊन बाजारहाट करायची ,घर ,शाळा ,तिचं ऑफीस ,कसं जमायचं तिला तिच जाणे ,पण कधी कसली कमतरता भासू द्यायची नाही .
हा...एक मात्र नक्की ,तिला बाबा सतत आठवायचा ,रोज रात्री झोपताना बाबाच्या फोटोकडे पहात रहायची ..खूप प्रेमाने बाबाच्या फोटोवरून हात फिरवायची ..त्याचा फोन आला नाही तर अगदी कासावीस होऊन जायची . हळुहळु मम्माला बाबाचे कामानिमित्त घरात नसणे हे पचनी पडले. ती त्यातून बाहेर पडू लागली.
बाबा बाहेर असला की मम्मा एकदम वेगळी असायची. घरात एक शिस्त नांदायची. सगळ्या वस्तु जेथल्या तेथे असायच्या.
कधी माझ्या मैत्रीणी आल्या तर एकदम पसारा व्हायचा . मम्माने एक दिवस "पसारा कमी असला की टेन्शन कमी होते" हे एकदा मस्त दाखवून दिले.कायझेन लीन मॅनेजमेन्ट ची सर्व तत्वे बहुद्धा मम्माकडूनच कोणीतरी उचलली असावीत. मम्माचे वागणे एकदम मेथॉडिकल असायचे. मम्मा घरात असताना आमचे घर म्हणने आय एस ओ सर्टीफाइड घर असायचे.
बाबा जसजसा कामानिमित्त घराबाहेर जास्त दिवस राहु लागला तशी अगोदर भित्री लाजाळू असणारी मम्मा बदलु लागली. पूर्वी मला एकटीला कुठे बाहेर जाउ न देणारी मम्मा मला क्लासच्या मित्रमैत्रीणींसमवेत ट्रीपला सहज परवानगी देवु लागली. इतकच काय तर ब्यांकेत , सोसायटीच्या मिटींगला,वगैरे कामात मम्मा पुढाकार घ्यायला लागली.
मम्मा एक वेगळाच कॉन्फिडन्स घेवुन वावरायची. मला मॅनेजमेण्ट च्या कोर्ससाठी हॉस्टेलला ठेवायचा निर्णय मम्माचाच. मम्माच्या कॉन्फिडन्स च्या माझ्यावर एक वेगळाच परीणाम व्हायला लागला. मी कॉलेजचे इव्हेन्ट करायला लागले. कुठे बोल्डली वागायला लागले. मम्मा एकदा माझ्या कॉलेजात आली होती प्रिंसीपॉलना भेटायला. काय बोलली कोण जाणे. पण राणे मॅडमना मम्माच्या कॉन्फिडन्स चे खूप कौतूक वाटले. कधीही दिसल्या की त्या मम्माबद्दल विचारायच्या. म्हणायच्या मुलीच्या जातीने कसे तुझ्या मम्मासारखे असायला हवे या मॉडर्न जमान्यात. माझी छाती अभिमानाने भरून यायची.
कधी मी लहानपणीचे फोटो काढले तर त्याफोटोतली मम्मा आणि माझ्या समोर असणारी आत्ताची मम्मा यातला फरक सहज जाणवुन यायचा. पूर्वीच्या बुजरेपणाचा लवलेशही तिच्यात दिसायचा नाही. कुठलेही निर्णय मम्मा रेंगाळत ठेवायची नाही. तड की फड. तिथल्या तिथे. अण्णा आजोबासुद्धा तिचा सल्ला घ्यायचे. त्यांचे जुन्या घराचे काही निर्णय होते ते मम्मानेच घेतले. बिल्डरशी बोलणी/ करार मम्मानेच केला. अण्णा आजोब तर "तू माझी सून असशील पण मी तुला माझा मुलगाच समजतो" असेच म्हणायचे.
सोसायटीच्या काही प्रकरणांत तर मम्माने तहसील ऑफिसात्/कलेक्टर ऑफिसात जावून स्वतः फॉलोअप करुन मॅटर तडीस लावले. तेंव्हापासून मम्मा सोसायटीच्या कमीटीची अविभाज्य भाग बनली.
आमची पहिली गाडी सँट्रो. आणली तेंव्हा मम्मा कसली खुश होती. दुसर्‍याच दिवशी बाबाने आग्रह करुन मम्माला गाडी शिकायला लावली. मम्मा गाडी चालवताना खूप घाबरायची. विशेषतः सिग्नलवर. नेहमी गाडी बंदच पडायची. मग बाबा तिकडचे दार उघडून बाहेर यायचा सिटस ची आदलाबदल करायचा. मी आणि बाबा त्यावरुन मम्माला चिडवायचो. मम्मा नंतर जिद्दीने गाडी शिकली. बाबासुद्धा तिच्याइतक्या सफाईने मुम्बैत गाडी चालवत नाही
एकदा मम्मा गाडी चालवत असताना एक टॅक्सीची गाडीच्या बंपरला धडक बसली. मम्मा काय भांडलीय त्या टॅक्सीवाल्याशी म्हणून सांगु? बाबाने घरी आल्यानंतर मम्माला अक्षरशः दंडवत घातला. म्हणाला आता कशी मस्त एकदम बोल्ड वाटतेस. माझ्यात नसते आले एवढे डेरिंग.झकास. मला अशीच बायको हवी होती. बाबा तर त्याच्या मित्राना हा किस्सा फोनवरुन अभिमानाने सांगत बसला होत. बाबाला मम्माच्या अशा बोल्डनेसचे फार कौतूक वाटायचे. म्हणायची शीक शीक जरा मम्माकडून जगातल्या प्रत्येक माणसाला अशी बोल्ड बायको हवी असते. शामळू रडुबाई. कोणालाच नको असते
हे सगळं माझ्या नकळत्या वयात माझ्या मनावर बरंच काही उमटवून गेलं.
हल्ली हल्ली बाबाचे आणि मम्माचे काय बिनसले होते कोण जाणे. बाबाने घरात पसारा केलेला मम्माला खटकायचे. तो पसारा ती बाबाला आवरायला लावायची.बाबाला ज्यावेळेस गाणी ऐकायची असत त्यावेळेस मम्माची जेवायला बसवायची घाई असायची. बाबा म्हणायचा की भांडीवाली लौकर येते म्हणुन काय आम्ही भूक नसतानाही जेवायचे. हवी तर भांडी मी घासतो. राहू दे.
मला तर बाबा अन मम्मा हे दोन धृव आहेत असे वाटायचे. एक एकदम बिन्धास्त.घरी असला की कसलीच शिस्त न पळणारा. आणि एक घरात सतत व्यवस्थितपणाचा आग्रह धरणारा. त्या दोघांच्या मधे माझा मात्र कायम दुभंगलेला पूल व्हायचा.
कबूल आहे मला ,बाबाचा वेंधळा ,हट्टी ,गमताड्या स्वभाव कुठेतरी मम्माला दुखावत/सुखावत होता ,तिच्या अपेक्षा ,तिच्या इच्छा ह्यांना काहीशी मुरड पडत होती ...बाबाच्या तर हे गावीही नसायचं ,
नकळत्या वयात माझ्यासमोर हे घडत होत ...आज कळत्या वयात ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला तर
..तर वाटत ,मम्मीची घुसमट होत होती का? बाबाचं नेहेमीच स्वताहात गुरफटून राहाण ,तिच्या अस्तित्वाची जाणीवच नसण ,ह्या गोष्टींचं तिला टेन्शन येतच असणार .......
शिवाय एखाद्या गोष्टीला आपण लावलेली शिस्त कोणीतरी उधळून लावतय हे तिला खटकत असाणार.
बाबाला सुद्धा आपल्या मोकळ्या वागण्यावर कोणी अंकुश ठेवलेला आवडत नसणार. तरी सुद्धा त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. बाबा कोठल्याही गावाहुन येताना त्या गावची स्पेश्यालिटी घेवुन यायचा. मम्मा बाबा घरात नसला तरीही त्याचे कपात आवरुन ठेवायची, त्याला लागणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींचीकाळजी घ्यायची. कधीकधी मम्मा बाबाचे स्वतःचा मुलगा असावा असे लाड करायची. तो येणार असला की त्याचा आवडता गाजर का हलवा बनवायची.
मी हॉस्टेलमध्ये असल्यामुळे हल्ली हल्ली त्यांच्यात काय बिनसले ते माहीत नाही.
पण अचानक डायवोर्स ची बातमी कळाली. ती सुद्धा कामवाल्या रखमाबाइकडून. मी उलट रखमालाच झापले.
पण ती बातमी खरी होती. बाबा घरी यायचा तेंव्हा अबोल असायचा. पानात पडेल ते मुकाट्याने खायचा. माझ्याशी दंगामस्ती , गाणी ऐकणे वगैरे बंदच. नवख्यामाणसाला सुद्धा जाणवेल इतके तंग वातावरण असायचे घरात.
मी बाबाशी याबद्दल एकदा बोलले. त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले ती नजर मला अनोळखी होती.आतून दुखावल्या सारखी. मला भितीच वाटली. तेच मम्माच्या बाबतीत. ती म्हणाली तुला आत्तातरी समजुन घ्यायची गरज नाहिय्ये.
मम्मा देखील आतुन रडत असावी अशा आवाजात म्हणाली. आणि तीने मला घट्ट मिठी मारली." बेटा तू खूप शीक मोठी हो.... मात्र कितीही मोठी झालीस तरी मम्माला विसरु नकोस.... आणि बाबाला तर कधीच नको तो खूप चांगला आहे."
मला कळालेच नाही. आणि नंतर ती स्फुन्दून स्फुन्दून रडायला लागली. मी कसेबसे तीला शांत केले.
बाबाला दुसर्‍या दिवशी फोन वरुन विचारले.त्याने हॅल्लो हॅल्लो हॅल्लो.म्हणत ऐकु न आल्याचा बहाणा करत फोन कट करून टाकला. मला खूप एकटे एकटे वाटायला लागले. मी मग आण्णा अजोबाना फोन केला. ते फोनवर बेटा बेटा बेटा.मोठ्या माणसानी काहिही केले तरी आपल्यावर त्याचा परीणाम होउ द्यायचा नाही. तु युनिव्हर्सिटी च्या परीक्षेच्या तयारीला लाग म्हणत त्यानी विषयांतर केले.
एकदा शनिवार रवीवार जोडून सोमवारी सुट्टी आली. मी थेट अण्णा अजोबांकडे गेले. मला आलेली बघताच अण्णा आजोबा घरातुन बाहेर पडले आज्जीने मला गळामिठी मारली. मल पुन्हा एकदा लहान पिल्लु बाळ झाल्यासारखे वाटले.
सुट्टीत आज्जोबांकडे आम्ही सगळे यायचो ते आठवले. बाबा मला रहाटाने विहीरीतील पाणी ओढून द्यायचा आणि आम्ही थंडे थंडे पानीसे नहाना चाहिये गाणे गात ते शिरशीरी आणणारे गार पाणी डोक्यावरुन घेत खिदळत आंघोळ करायचो.
आज्जी मस्त आलं घातलेला चहा बनवुन द्यायची. मग दुपारी भैरोबाच्या टेकडीवर जायचो. मम्मा घरात आज्जीसोबत घरातच थांबायचे. अन सम्ध्याकाळे मस्त कुळीथाचे पिठले करुन द्यायची.
कधी मम्मा आणि आज्जी सोबत विठ्ठलाच्या देवळात काकड आरतीला जायचो.बाबा आम्हाला चिडवायचा.लोक थंडीत काकडतात म्हणून सकाळच्या आरतीला काकडाअरती म्हणतात.
मम्मा बिचारी देवाचे अगदी मनापासून करायची. अर्थात ती कुठलेली काम करायची ते मनापासूनच. आज्जीच्या डोळ्यात तीचे कौतूक मावत नसायचे.
ममाची गोष्टच वेगळी तिच्या हातच्या स्वैपाकाची चव म्हणजे भन्नाटच. आणि ती तो पदार्थ ताटात देताना सुम्दर पद्धतीने द्यायची. साधे पोहे केले तरी ती त्यावर थोडेसे फरसाण खोबरे कोथिंबीर वर लिंबाची फोड अशी द्यायची.
पिवळे धम्मक पोहे त्यावर पांढरे शुभ्र खोबएर हिरवी कोथिंबीर आनि ती तजेलदार लिंबाची फोड एकदम पिक्चरस वाटायचे.
एकदा बाबाने पोहे केले होते. पोह्यांचा रंग कुठे पांढरा तर कुठे एकदम जर्द पिवळा असा काहितरीच होता. मम्माने हसत हसत ते पोहे दुरुस्त केले ममा वॉज अ‍ॅज युज्वल अ‍ॅट हर बेस्ट. ती आहेच तशी. कुठलाही आणि कितीही बिघडलेला पदार्थ द्या ती त्याचे झकास स्नॅक्स मध्ये रुपांतर करायची. तिच्या हातच्या चवीचा मला मात्र तोटा व्हायचा. शाळेतला डबा माझ्यापेक्षा मैत्रीणीच जास्त फस्त करायच्या.
त्या सुट्टीत माझ्याशी भरपूर गप्पा मारणारे अण्णा आजोबा बहुतेक वेळ घराबाहेरच होते. का कोण जाणे ते काहितरी माझ्यापासून लपवत असावेत.
सोमवारी संध्याकाळी आण्णा आजोबा मला बसला सोडायला आले होते. म्हणाले बेटा गणपतीला प्रार्थना कर . सगळं नीट होउ देत म्हणावे. टाटा करताना स्वतःचे डोळे रुमालाच्या टोकाने टीपत होते. ते असे कधीच करत नाहीत. बिचारे खूप हळवे झालेत आताशा.
मग एक दिवस बाबानेच साम्गितले की त्याने डायव्होर्स चा निर्णय घेतलाय. मी मम्मा कडे पाहीले. ती नजर चुकवत होती. बाबाला काही विचारयचा प्रयत्न केला त्याने देखील नजर चुकवली.
मी मात्र समजत राहीले की हे खोटं आहे . बाबा आपली थट्टा करतोय. पण ती थट्टा नव्हती.
युनिव्हर्सिटीच्या परीक्षा आल्या तशी मी अभ्यासात गुंग झाले. घरचे विचार कमी झाले.
परीक्षा संपली. बाबाचा फोन नाही. मम्माचा फोन नाही. मी घरी फोन केला तर कोणी उचलला नाही. काय कळत नव्हतं काय होत होतं
कशासाठी घेताहेत हे डायव्होर्स? का माझं छोटसं घरटं मोडताहेत? घरट्यावर केवळ ज्यानी ते निर्माण केलं त्यांच हक्क नसतो तर ते ज्यांच्यासाठी निर्माण केल त्यांचाहे तेवढाच हक्क असतो.
मग नक्की अशी काय चूक झाली असेल ? कोणाची झाली असेल? टाळी एका हाताने वाजत नाही. दोघेही तितकेच जबाबदार असतील. प्ण दोघांच्यात माझं काय? मम्मा मुळे मी कॉन्फिडन्ट बनले. बाबामुळे मी आनंद घ्यायला शिकले.
आणि त्या दोघामुळे मी सहवास म्हणजे काय हे शिकले.
बाबाचा फोन आला बाबाचा फोन आला होता. तो काही बोलला नाही. पण फोन त्याचाच होता. मी हॅलो हॅलो करत बसले पलीकडून बोलतच नव्हते. का कोण जाणे पण तो बाबाच होता. बाबाला ती बातमी कळाली असावी. त्याने मला कोर्टात येवु नकोस म्हणून सांगितले होते. मम्मीने सुद्धा तसेच सांगितले होते. मी हॉस्टेलवरच राहीले.
तो फोन आल्यानंतर मी कितीतरी वेळ फोन कानालाच लावून खुर्चीत तशीच बसून राहीले. पाय मणामणाचे असावेत इतके जड झाले होते. अवतीभवती सगळे खोल खोल जात होते...श्शी.......
काय चुकले असावे दोघांचे
बाबाचं नेहेमीच स्वतात गुरफटून राहाण ,मम्माच्या अस्तित्वाची जाणीवच नसण ,ह्या गोष्टींचं मम्माला टेन्शन येतच असणार ....... मम्माची शिस्त बाबाला खटकत असणार......
पण हे सगळं सामंजस्याने नाहीका सोडवता येणार. कोर्ट कशाला हवं त्यात? आणि कोर्ट तरी काय विचार करणार तो फक्त त्या दोघांचाच? माझं आस्तित्वच नाही?
डोकं सुन्न झालय ...नक्की चूक कोणाची आहे ? का केलं असेल असं ? माझा का विचार केला नाही ? मी कुणाकडे रहायचं ? मम्मी ?? कि बाबा??
प्रश्न प्रश्न ...डोक्यात कुणीतरी धार धार शस्त्राने वार करतय ...तरीही मी अजून कोलमडले नाहीये .कदाचित ...कदाचित हे वार झेलायची सवय लावून घेतलीय मी .....
आज पोरकं झाल्याचं फिलिंग येतंय ...मम्मी ..बाबा दोघाही नावाला आहेत असं वाटतंय .....
मला नेहेमीच दोघेही हवे होते ...दोघांच्या कुशीत शिरून झोपायचं होत ...हो ,अगदी आजही ....माझे प्रोब्लेम्स ,माझी सिक्रेट्स मला दोघांसोबत शेअर करायची आहेत. .. बाबा अन मम्माबरोबर पुन्हा एकदा कोकणच्या ट्रीपला जायचंय.
ए बाबा... मला तुझ्या कुशीत शिरुन ती अर्धी राहिलेली राजकुमार अन रानमांजराची गोष्ट ऐकायचीय.
माझ्या गोष्टीत तु राजा असतो अन मम्मा राजकन्या. राजकुमार राक्षसाला हरवतो आणि मग तो राजकन्येशी लग्न करुतो दोघे नंतर सुखात रहातात. माझ्या गोष्टीचा शेवट असाच हवाय....
मम्मा यू आर आयडीयल वुमन फॉर मी........तशीच रहा...... राजकुमार आणि राजकन्येला हरलेलं पहाणं नकोय मला......
तुला एक गाणं ऐकवायचं आहे. एक बटा दो दो बटे चार छोटी छोटी बातों मे बट गया संसार.......
पर्‍याना म्हणे शाप असतो एकटे रहाण्याचा....... तुमच्या खिदळपरीला सुद्धा असेल असाच एखादा शाप.
कुठलीही गोष्ट जोडता येते पण सांधलेला तडा आपलं आस्तित्व दाखवतच रहातो त्यावर कितीही रंगरंगोटीही केली तरी.
माझ्या लाइफ़चा एक अविभाज्य हिस्सा ...आज विभागालाय नव्हे मीच विभागली गेलेय.....पुन्हा जोडता येईल का मला हे नातं ?? की माझीही घुसमटच ........
.

एक बटा दो.......दो बटे चार..... (1)

क बटा दो.दो बटे चार छोटी छोटी बातो मे बट गया संसार.
नही बटेगा नही बटेगा मम्मी डॅडी का प्यार ओ मम्मी डॅडी का प्यार.........
एफ एम वर गाणं लागलय. माझं आवडीचं.लहानपणापासून अगदी आवडीचं. प्यार म्हणजे काय हे न कळायच्या वयात कुठल्या तरी पिक्चर मध्ये कोण्या लहान मुलानी म्हंटलेले गाणं. मी समाजाच्या कार्यक्रमात त्यावर डान्स देखील केला होता.
बाबाने त्याचे चिक्कार फोटो काढून ठेवले होते.. हे गाणं लागलं की मी नेहमीच एकदम खुशीत असायचे. आज मात्र वाटतय कशाला लागलं हे गाणं. त्यातले शब्द मला खिजवताहेत. जणू काही माझा पराभव बघून हसताहेत.
बाबाचा फोन आला होता. तो काही बोलला नाही. पण फोन त्याचाच होता. मी हॅलो हॅलो करत बसले पलीकडून बोलतच नव्हते. का कोण जाणे पण तो बाबाच होता. बाबाला ती बातमी कळाली असावी. त्याने मला कोर्टात येवु नकोस म्हणून सांगितले होते. मम्मीने सुद्धा तसेच सांगितले होते. मी हॉस्टेलवरच राहीले.
तो फोन आल्यानंतर मी कितीतरी वेळ फोन कानालाच लावून खुर्चीत तशीच बसून राहीले. पाय मणामणाचे असावेत इतके जड झाले होते. अवतीभवती सगळे खोल खोल जात होते...श्शी.......
स्वतःवर इतका राग येत होता. की सगळी रूम पेटवून द्यावी , खाली जाउन कोणालातरी चाकूने भोसकून काढावेसे वाटत होते. समोर येइल त्याला सणासण्ण थोबाडीत मारावे बोचकारुन काढावेसे वाटत होते. मी यातले काहीच न करता तश्शीच बसून राहिले. चेहेर्‍यावर हात ठेवून हमसून हमसून रडत राहीले. किती वेळ गेला माहीत नाही.... मी सुन्न झाले होते.
कोणीतरी माझ्या डोक्यावरुन हात फिरवत होते..... "ए काय झाले. मनु मनु.काय झाले काय झालं रडायला" सुप्रीया मला उठवत होती. बिचारीला बहुतेक सगळं न विचारताच समजलं असावे. तिने माझ्याकडे पाहिले..... अन तीही माझ्या गळ्यात पडून रडू लागली.........
काही वेळ गेला असेल सुप्रीया ने मला सावरले. मला म्हणाली काही बोलु नकोस.
सुप्रीया....... मम्मी बाबानी घटस्फोट घेतला. ते सेपरेट झालेत. बोलताना माझा आवाज मलाच अनोळखी वाटत होता. कुणीतरी त्रयस्थाने बोलल्या सारखे.
ते वेगळे झाले तरीही ते तुझे मम्मी बाबाच आहेत अजून. तुझे त्यांचे रीलेशन चेंज झाले नाहिय्ये.
सुप्रीया बरेच काहीतरी बोलत होती. माझी समजूत घालत होती. मला भातुकलीची भिंत मोडल्यासारखी वाटतय.
सुन्न / वाईट / सुटका / राग /दु:ख / सगळ्या भावना एकाच वेळेस येताहेत. अगदी जीवापाड जपलेलं खेळणं कोणीतरी मोडून टाकावं तसं.
मम्मी अन बाबा माझे सर्वस्व होते.. त्याने असे का केले. बॅडमिम्टन च्या मॅचमधे सपाटून हरल्या सारखे वाटतय.
आठवायला लागलं तेंव्हापासून मी बाबा सोबत खूप खेळायचे. लहानपणच्या बहुतेक फोटोत मी बाबाच्याच खांद्यावर नाहीतर कडेवर आहे.बाबा माझ्या बरोबर नेहमीच असायचा अगदी मी पहिल्या दिवशी कॉलेजला गेले तेंव्हापर्यन्त.
शाळेतल्या मैत्रीणींसोबत ज्या गप्पा व्हायच्या त्या सुद्धा मी बाबासोबत शेअर करायचे. अन बाबासुद्धा माझ्या सोबत बिन्धास्त असायचा. घार बाबा असला की घराचे नुसते खेळायचे ग्राउंड व्हायचे.मम्मा अक्शरशः वैतागायची. तीला घर आवरता आवरता नाकी नऊ यायचे.
माझ्या कपाटात एक फोटो आहे. मस्त पांढरा शुभ्र परी सारखा ड्रेस मध्ये. बहुतेक चौथीत असेन. परीसाठी मला कपाळावर चंदेरी चांदणी लावायची होती. ती चांदणी आणायला बाबाला दिवसभर वेळ मिळाला नसावा.त्याने माझ्या समोर मॅगी च्या पॅक मधली फॉईल कात्री ने कापून मस्त चांदणी बनवली. म्हणाला बघ कुणाकडेच नसेल अशी चांदणी. मी ती चांदणी लावून अ‍ॅन्युअल डे चा नाच केला. त्यावेळचा फोटो आहे. बाबाचे डोके भन्नाट चालते. विशेषतः अशा अडचणीच्या वेळेस.
बाबा तसा जाम जॉली. एकदम खुशीत असायचा. मी लहान असताना त्याच्या ऑफिसात जायचे. तेथे खूप कागद असायचे.
तिथला पेपर वेट मला खूप आवडायचा. त्यातली झाडांची नक्षी काही वेगळीच वाटायची. बाबा तो काचेचा पेपर वेट डोळ्या समोर धरुन त्यात निळे जांभळे सप्तरंग दाखवायचा. भुगोलाचे पुस्तक बाबाचे आवडएत पुस्तक. पण तो त्यातल्या अभ्यासाला सिंदबादच्या गोष्टींची जोड द्यायचा. अभ्यास न होता नुसतीस धम्माल व्हायची.
मम्माची गोष्टच वेगळी . तीला प्रत्येक गोष्ट जिथल्या तेथे हवी असायची. माझी पुस्तके कम्पास स्कूल्बॅग सगळं कसं जागच्या जागी हवं असायचं.
बाबा त्या उलट. एकदम बिन्धास्त. ट्रीपला निघालो तर जिथे जायचे ठरवले आहे ते ठिकाण ऐन वेळेस बदलायचा. एकदा लोणावळ्याला जायचे ठरवले. त्याला काय वाटले कोणास ठाऊक. खोपोली आल्यावर त्याने महडच्या गणपतीला जायचे का विचारले. महड झाल्यावर पालीच्या गणपतीला जाउ म्हणाला. तेथून मग त्याने उंबरखिंड दाखवतो म्हणत गाडी थेट सरळ तिकडे नेली. शिवाजी महाराजांची ती उंबरखिंडीतली लढाई त्याने अक्षरशः जिवंत केली. कारतलबखान, त्याचे ते अफाट सैन्य , सैन्याच्या अग्रभागी असलेली रायबाघन आणि ती मावळ्यांची छोटीशी फौज. सगळे डोळ्यासमोर उभे राहीले. इतिहासाचे ते पान आमच्या समोर वर्तमान होऊन आले. मी तर जीवाचे कान करून ऐकत होते. बहुतेक त्या दिवशी बाबाच्या अंगात शिवाजी चे मावळे संचारले असावेत. घरी येताना मला बाबा शिवाजीच्या सैन्यातला अधिकारी वाटत होता...... गाडीत मी पेंगुळले तरी डोक्यात तलवारींचा खणखणाट.... आणि तोफांचे आवाज निनादत होते. शाळेत आठवडाभर मी त्याच धुंदीत वागत होते.

आज फिर मरने का इरादा है..........

काल डायव्होर्स पेपर्स वर सह्या केल्या. माझा हात सह्या करताना थरथरेल असे वाटत होते. सह्या करताना मी मुद्दामच तुझी नजर टाळत होते.
न जाणो तुझे डोळे मला काही सांगतील आणि मी त्याच्या आधीन होईन. मला खरेतर माझीच भीती वाटत होती. सही करताना मी तुला पाहीले नाही हे एका अर्थाने बरेच झाले तुला मोकळे व्हायचे होते. तु झालास.
सह्या करून झाल्यावर कितीतरी वेळ हे स्वप्न आहे असेच मला वाटत होते.कोणीतरी हाक मारेल , गजर होईल आणि मला जाग येईल. मग मी या असल्या स्वप्नाबद्दल स्वतःलाच एखादी टपली मारेन आणि तुझासाठी चहा ठेवायला जाईन असेच वाटत होते. तू सुद्धा हे असलं स्वप्नं ऐकून मला खुळी आहेस झालं म्हणत गालावर हळूच टीचकी मारली असतीस.
पण तुला मान खाली घालून जड पायानी जाताना पाहीले आणि मी वास्तवात आले. माझ्या पायातलं त्राणच निघून गेलं. मी तेथेच खुर्चीवर बराच वेळ बसून राहीले.
वकिलाने पाणी आणून दिले. त्यानीच मला घरी सोडले.
डायव्होर्स ला मराठीत घटस्फोट का म्हणतात हे काल उमगले. डोक्यात इस्कोट होत होता.एका सहीच्या फरकाट्याए आयुष्यात बरेच बदल होतात असे कोणी सांगीतले असते तर मी विश्वास ठेवला नसता. मी आता ते अनुभवणार होते.
एक खोल श्वास घेतला.....वातावरणात मोकळेपणा ऐवजी जडसा पोकळपणाच जास्त होता. कदाचित हे माझे मत असेल.
पुढलं आयुष्य आता स्वतन्त्र घालवायचं होतं. या अशाच मोकळेपणाने. हं......
वीस वर्षांचे सहजीवन एका सहीने संपले.
आपलं लग्न ठरवून दाखवून केलेलं. मी देवभोळ्या कुटुंबात वाढलेली. वडीलाधार्याना मान देणारी. घर मैत्रीणी यांपलीकडे फारसं जग नसलेली. दाखवण्याच्या कार्यक्रमाअगोदर बाबांनी मला तुझे फोटो दाखवले होते. तु इंजीनीयर आहेस ते संगितले होते. पण दाखवण्याच्या कार्यक्रमात मी खूप घाबरले होते.तू कसा असशील कोण जाणे. तुझा स्वभाव कसा असेल कोण जाणे याची धास्ती होती. तेथे आपण कॉफी प्यायला गेलो. परक्या अनोळखी कोणाबरोबर मी प्रथमच हॉटेलमधे जात होते. तू जे मगवशील मी तेच मागवले. समोर आलेले भलेथोरले सँडविच कसे खायचे असते ते मला माहीत नव्हते. आजूबाजूला कोणीच तसले सँडविच खात नव्हते. तु सुद्धा खायला सुरवात करत नव्हतास. शेवटी मी हातात सँडविचचा एकेक तुकडा घेवून सुरवात केली. तू हसला नाहीस. एखाद्या समजूतदार वडीलधार्‍या माणसाने लहान मुलाशी बोलावे तसा तू मला वाटलास. बाबासुद्धा कधीकधी असेच वाटतात. का कोण जाणे तुझ्यासोबत एकदम सुरक्षीत.... आश्वासक वाटायला लागले. तुझ्या डोळ्यातले सॉफ्ट भाव मला आवडले. तू मला आवडून गेलास. यालाच क्लीक होणे म्हणतात असे तू नंतर मला सांगीतलेस.
माझ्या एका आत्याचं लग्न एकदम धुमधडाक्यात झालं होतं दिव्यादिव्यांच्या गाडीतून सजलेल्या आत्याची वरात निघाली होते आपलं लग्न असंच थाटामाटत करायचं हे मी तेंव्हाच म्हणजे इयत्ता दुसरीत ठरवून टाकले होते. हनीमून च्या वेळेस हे मी जेंव्हा तुला सांगितले तेंव्हा तू बराचे वेळ हसत होतास. डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसताना कोणालातरी मी प्रथमच पहात होते.
लग्न ठरल्यानंतर आपण जूहूला फिरायला गेलो होतो. तेंव्हा तू म्हणाला होतास " आयूष्यभर तुला फुलात ठेवेन असे म्हणत नाही मात्र तुला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करेन इतके वचन मात्र देतो........." तुझे ते वाक्य मी आल्यानंतर आईला सुद्धा सांगीतले होते.
आईच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली पोरी तुला समजूतदार नवरा लाभलाय. हीरा लाभावा तसा लाभेल तुला.
त्यानंतर आपण एकदा गेटवेला गेलो होतो. तेथे तू माझा हात हातात घेतलास. छातीत इतक्या जोरात धडधडत होते की बहुतेक ते आजूबाजूला निश्चीत ऐकु गेल असेल. आपण गेटवेच्या कठड्यावर बराच वेळ हात हातात घेवून न बोलता बसून होतो. तुझा हात हातात घेतल्यावर जे फीलिंग आले होते त्याची आठवण परवपरवापर्यन्त ताजी होती. तो जादूचा स्पर्ष आठवला की आजही एकदम मोहोरून जाते. तुझ्या भाषेतच बोलायचे तर " मॅजीक ऑफ स्टॅटीक इलेक्ट्रीसिटी......"
घरी जायला उशीर झाला तर माझ्या ऐवजी तूच धास्तावला होतास.
आपलं लग्न झालं.तू म्हणाला होतास तसे साधेपणाने नाही तर मला हवं होतं तसं धुमधडाक्यात वाजतगाजत.
तुमच्या घरी आल्यावर मला कधी परक्या घरी आल्यासारखं वाटलंच नाही. आई तशा साध्याच अगदी माझ्या आईसारख्याच. आण्णा तर मला त्यांच्या गेल्या जन्मीची मुलगीच म्हणायचे.
लग्न झाल्यावर तुला नोकरी सोडून व्यवसाय करायचे सुचले.त्या निर्णयाबाबत मी साशंक होते पण तुला व्यवसाय करायचा होता. मी तुला साथ देणार होते.
तुझ्या माझ्या आवडीनिवडी अगदीच भिन्न होत्या. तुला कविता आवडायच्या वाचायला आवडायचे. मी फारसे वाचले नव्हते.
मला शाळेत नववीच्या धड्यात असलेली इंदीरासंतांची " नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूस......" ही कविता तु मला पडत्या धिंगाणा घालणार्‍या पावसात किती छान अनुभवून दिली होतीस.त्या धिंगाणा घालणार्‍या पावसात एकदम मनमोकळे नाचायला लागावे इतका भन्नाट आवडला होतास तू तेंव्हा. एखादी गोष्ट थेट समजावून द्यायची तुझी स्टाईल काही भन्नाटच.
तू तसा फारसा बोलका /बडबड्या असा नव्हतास. पण मित्रांच्या घोळक्यात,एखाद्या कार्यक्रमात तु एकदम खुलायचास. कार्यक्रमात निवेदन करणे तुझा हातखंडा. त्या वेळेस मला तुझ्या कडे पहातच रहावेसे वाटायचे.
मुद्दाम होऊन तू मला कधी इंप्रेस करायचा प्रयत्न केला नाहीस.हीच गोष्ट मला खूप आवडायची. तू तसा अगदी साधा होतास मला हव्वा होता तस्सा.
स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर तू त्यात व्यस्त झालास. माझ्याशी गप्पा मारायला वेळ मिळायचा नाही. व्यवसायात म्हणावे तसे यश मिळत नव्हते. तुझी चरफड मला समजत होती. शेवटी तू आपल्या साठीच करत होतास ना. अपयशाने खचून जाणे तुझ्या स्वभावात नव्हते. पण व्यवसायात यश येत नाही म्हणून आण्णा तुझ्यावर चिडायचे. बाहेरचे व्याप / व्यवसायात बस्तान बसवण्याची धडपड आणि त्यात भर म्हणजे आण्णांचे टोमणे मारून बोलणे... तू वैतागयचास. . त्यात तुझी चूक नव्हती आण्णांचीही नव्हती. शेवटी मी तुला काहीशा धास्तीनेच नवे काहीतरी शिक्षण घेण्याबद्दल सांगीतले.तू ते मनावर घेतलेस
नवे कोर्सेस केलेस. पण नोकरीही अशी सहज मिळत नव्हती. आण्णा त्यावरूनही बोलायचे. घरात आलास की भांडणाला सुरवात व्हायची. आण्णांवर तू राग काढू शकत नव्हतास. तो सगळा राग माझ्यावर काढायचास. तू हताश होऊ नयेस म्हणून मी तुझी समजूत घालयचे. होईल रे हेही दिवस जातील रे.तुझ्याबरोबरच मी हे स्वतःलाही समजावयाचे. तू हुशार होतास कष्टाळु होतास पण यश मिळत नव्हते. काय चुकत होते तेच कळत नव्हते. एकदा तू मला रात्री जेवल्यांनंतर बाहेर नेलेस. नाक्यावरच्या सायबर कॅफेत ईमेलवर आलेले कंपनीचे ऑफर लेटर दाखवलेस. चक्रात अडकलो होतो त्यातून एकदम सुटल्यासारखे वाटले. तेंव्हा आपल्या दोघांकडे मिळून उणेपुरे बावीस रुपये होते त्यात एक आईस्क्रीम आले आपण दोघात मिळुन खाल्ले. ते आपले सॅलिब्रेशन........ मनात घट्ट करून रहीलाय तो क्षण. कधीच पुसला जाणार नाही तो तुझ्या चेहेर्‍यावरचा आनंदाचा भाव माझ्या मनातून.
मला दिवस राहीले. लहानपणी आपली मनू हुबेहूब तुझ्यासारखी दिसायची. मला तर तुलाच खेळवल्यासारखे वाटायचे. तु अस्साच असशील दुडदुड धावत अस्साच दंगा करत असशील अस्सेच भरपूर रेशमी जावळ असेल .... मी हरखून जायचे. तिच्याशी खेळताना तुला विसरून जायचे.
नोकरीच्या निमित्ताने आपन मुम्बैला आलो. नव्या उमेदीने सांसार थाटला. नव्या घरात प्रवेश करायचा म्हणून तू मला दुकानात साडी बदलून शालू नेसायला लावलास. ताटात कुंकवाचे पाणी घेवून माझी कुंकवाची पावले घरभर उमटवायला लावलीस. कित्ती आनंदी होतास तेंव्हा. दुसरी "मनू" दिसत होतास तू मला.
नव्या जॉब साठी तुला प्रोजेक्ट जेथे असेल तेथे जावे लागत होते. सुरवातीचे प्रोजेक्ट मुम्बैतच असायचे. पण तुला जबाबदार्‍या घ्यायला आवडायचे. त्यासाठी बाहेरचे प्रोजेक्ट्स घ्यायला लागलास. तू बाहेर असलास तरी रोज फोनवर माझी , मनूची चौकशी करायचास. फोनवर चौकशी करणे वेगळे आणि प्रत्यक्ष असणे वेगळे.
सुरवातीला दोन तीन महीने त्या नंतर सहासहा महीने तु बाहेरच असायचास. मी मुम्बैत एकटीच असायचे. मनूला शाळेत नेणे आणणे तिचे हवे नको बघणे. घरातील कामे / बाहेरची कामे आता मीच करायचे. काय आणायचे काय नाही हे मीच बघायचे. तू सठीसामासी यायचास तीनचार दिवस रहायचास. असूनही नसल्यासारखाच असायचास. तु नसला की मला सुरवाती सुरवातीला घर खायला उठायचे. एकटीच असायचे. घरातील प्रत्येक गोष्टीशी तुझी एकेक आठवण निगडीत होती. तुला आवडणारी पुसतके तुझ्या कॅसेट्स, तुझे कपडे , तुझे घरात असताना सतत गुणगुणत असणे या सगळ्याची मला इतकी सवय होती की तुझ्या शिवाय मला अगदीच रिकामे वाटायचे. तू यायचास त्या दोनचार दिवसात दिवाळी वाटायची. घर खूप आनंदाने भरलेले वाटायचे. चिमणीच्या पिल्लाला घरट्यात मिळत असेल तशी ऊब मला मिळायची. तू अस्साच माझ्या शेजारी असावास असे वाटायचे. तू झोपुन गेल्यावरसुद्धा मी तुझ्या चेहेर्‍याकडे बघत बसायचे.
तू जाण्याच्या दिवशी मला खूप रडावेसे वाटायचे. पण तु नेहमी म्हणायचास " हॅपी फेसेस आर ब्यूटीफूल फेसेस" म्हणून मी रडू लपवायचे.
मी मनू एवढी असते ना तर तू जाउ नयेस म्हणून मी तुझ्या ब्यागाच लपवून ठेवल्या असत्या. एकदा तू मला सरप्राईझ म्हणून मित्राबरोबर पार्सल पाठवतो असे सांगून स्वतःच आला होतास. मला इतका आनंद झाला होता की शक्य असते तर त्या दिवशी मी तुला पळवून नेले असते आणि मोगर्याच्या फुला फुलांनी सजवून ठेवले असते बाहुलीसारखे. कुण्णाकुण्णाला दाखवले नसते..
कामानिमित्त तुझे घराबाहेर रहाणे वढतच गेले. तुझा वियोग मला बरेच काही शिकवत होता. एकट्या बाईने मुंबै सारख्या शहरात कसे वागावे , कोणाला किती अंतरावर ठेवावे ,लोकांशी कसे वागावे , स्वतन्त्रपणे निर्णय कसे घ्यावे , लोकांशी कसे बोलावे. असे बरेच काही.
आता मी पूर्वीसारखी बावरत नव्हते आत्मविश्वासाने सर्वत्र वावरत होते. तुला माझे नवे रुपडे भावत गेले. माझ्यातील आत्मविश्वास तुला मनापासून आवडायचा
तू कौतूक करायचास. घरात आता बहुतेक सगळेच मीच बघायए. तू फक्त तीनचार किंवा सहासात महीन्यातू एकदा पाहुणा म्हणून यायचास्. ते दोनचार दिवस आपण बहुतेकदा कुठेतरी बाहेरच असायचो. तुला घरचे जेवण मिळावे . तुझे आवडते भाकरी आणि कांड्याचे थालीपीठ खाता यावे म्हणून मी घरीच रहायचे ठरवायचे अन तू आपल्याला दोन चार दिवस पूर्ण रीलॅक्स मिळावे म्हणून बाहेरच रहायचा प्लॅन करायचास.
शेवटी एकदा मुम्बैतला प्रोजेक्ट मिळाला. आपण ते आई आण्णाना आणि आई बाबाना मुम्बैत बोलावून घेतले आणि सॅलेब्रेट केले. मस्त मजा आली
तुझा प्रोजेक्ट सुरु झाला. आणि घरात पुन्हा एकदा पसारा सुरु झाला. मनू ला स्वतःचे स्वतः आवरण्याची शिस्त मी लावली होती. तु मात्र ती शिस्त उधळून लावायचास. दुसरर्‍या दिवशी तीची परीक्षा असली तरी तिला नाटकाला घेवून जायचास. मी काही बोलले की म्हणायचास इतके दिवस मी इथे नसायचो आता आहे तर एन्जॉय करून घेवु देत ना मला पोरीसोबत.
तिची शिस्त पार भिरकावून द्यायचास. तीला काय दंगा करायला बाबा सोबत असल्यावर अणखी काय हवे. कपडे वगैरे तर तु आवरून ठेवायचे असतात हे विसरलाच होतास. कपडे बदलताना इस्त्रीच्या कपड्यांचा ढीग विस्कटून ठेवायचास बाथरुम मधे अंघोळ केल्या नंतर शॉर्ट्स चा "ळ" आकारातला ओला बोळा तस्सा ठेवून बाहेर यायचास. खाण्यासाठी घेतलेल्या बशा टेबलावर तश्शा ठेवून जायचास. आत्ता पर्यन्त जपलेल्या शिस्तीला तू सुरुंगच लावायचास.
मला नाही आवडायचे. मी तुला तसे सांगितले की तुला राग यायचा.
एकदा टेबलावरचा फ्लॉवर पॉट डायनिंग टेबलावर ठेवलास. फ्लॉवरपॉट डायनिंग टेबलावर ठेवू नये.इतके साधे शास्त्र सुद्धा विसरलास. मी तो फ्लॉवरपॉट पुन्हा टेबलावर ठेवला तर तु अचानक भडकलास. मला म्हणालास " मला शिस्त लावायला बघु नकोस्...कुक्कुलं बाळ नहिय्ये मी"
मी पण चिडले. इतक्या साध्या गोष्टीत तुला इतके चिडण्यासारखे काय होते तेच मला कळाले नाही....... नंतर दोन दिवस आपण एकमेकांशी बोललो नाही. तुझे वागणे मला एकदम अपरीचितासारखे वाटले. कुठेतरी आपल्यातील अंतर वाढत होते. ....कधीतरी नंतर तू मनूने मला ते आपल्या दोघातले पहिले भांडण होते अशी एक अपडेट दिली.....
त्या नंतर बारीकसारीक गोष्टीत तुला माझी शिस्त डाचायला लागली. बारीकसारीक बाबींवरून तू चिडायला लागलास. प्रोजेक्ट मधले ताण असतील म्हणून मी दुर्लक्ष्य
करत गेले. पण कुरबुरी वाढतच गेल्या. अलीकडच्या काही दिवसात तर तू आई आण्णांनासुद्धा फोन करेनासा झाला होतास.ऑफिसातल्या प्रोजेक्टच्या बद्दल माझ्याशी बोलेनासा झाला होतास. घरात सुद्धा काहीसा अलीप्त रहात होतास.
ऑफिसमधले अप्रेजल तुझ्या मनासारखे झाले नाही रेटींग कमी मिळाले याचे खापर तु माझ्यावर फोडलेस. जणू मी काही तुझा ऑफिसमधल्या कामात सारखे अडथळे आणत होते. माझं काय चुकत होतं ते मलाच कळत नव्हतं.पण हल्ली तू पूर्वीसारखा राहीला नव्हतास. वयोमानानुसार माणूस स्वभाव बदलत असतो. मी देखील शारीरीक बदलांतून जात होते. माझं मला कळत होतं.अचानकच चिडचिडी व्हायचे. नंतर जाणवायचे मी उगाचच चिडले. पण व्हायचे ते होऊन गेलेले असायचे. काही कामासाठी किंवा निरोपासाठी तुला फोन केला तर आपली त्या फोनमधे सुद्धा भांडणे व्हायची.
मला कंटाळा आला होता या सगळ्याचा. एकदा रागाच्या भरात असं सदानकदा भांडत बसण्यापेक्षा वेगळे झालेले बरे असे मी म्हणाले. तुला त्या वाक्याचा धक्का बसला असावा. काही बोलला नाहीस पण अचानक खूप हिरमुसला झालास. माझी चूक मला कळाली. तुझे माझ्यावर अतोनात प्रेम होते. माझ्याशिवाय वेगळे रहाण्याचा विचारही तु कधी करू शकला नसतास. पण मीच हे वाक्य बोलले होते. पुढचे चार दिवस तू अबोलपणे काढलीस. अन मी ही. एका पलंगावर अवघ्या सहा इंच अंतरावर झोपुनही सहा हजार मैलांच्या अंतरावर असावे एवढे अंतर आपल्यात पडले होते. अंथरुणात दोघेही टक्क जागे असूनही आपण एकमेकाना न बघितल्यासारखे करत होतो.
तू बहुतेक बराच विचार करत असावास. मी तुला कुठेतरी खोल आत डिवचले होते. तू जखमी झाला होतास. आता भांडायचे नाही असे खूप ठरवले तरीही काहीतरी झाले आणि आणि तूच तो मुद्दा पुन्हा उकरून काढलास. उत्तराला उत्तर द्यायचे म्हणून मी म्हणाले मीच अर्ज करते डायव्होर्सचा. अन मी खरोखरीच अर्ज केला. मला डायव्होर्स नको होता. पण मला तुझ्यासमोर नमतेही घ्यायचे नव्हते. का म्हणून मीच प्रत्येकवेळेस माघार घ्यायची.
मी अर्ज केला तू निर्वीकरपणे रीलक्टंटली मला डायव्होर्स दिलास. कागदावर सह्या करण्यापूर्वी तू माझ्याशी काही बोलशील असे वाटले होते. निदान थोडासा हसशील. तूच म्हणायचास ना "हॅपी फेसेस आर ब्यूटीफूल फेसेस" ......आय वॉन्टेड यू टू बी ब्यूटीफूल.
तू खंबीर होतास निदान बाहेरूनतरी. डोव्होर्स मिळाला. नको असलेलं प्रेझेंट मिळावं तसा.
मी शून्यात नजर लावून नक्की आपण काय जिंकलं काय गमावलं याचा हिशेब लावत बसलेय. मला तो हिशेब जुळायला नकोय. हे असले हिशेब न जुळलेलेच बरे असतात. सस्पेन्स अकाउंटच्या नावाखाली निदान पुढचे काही दिवसतरी पुन्हा नजरेसमोर रहातात.
मला अजूनही आशा आहे तू हायकोर्टात जाशील. तिथे डायव्होर्सचा निर्णय माघारी फिरवायला लावशील. तू तेथे केस जिंकावी असं मला वाटतय. मी हरावे असे मनापासून वाटतय.
खरं सांगु तू माझ्यावर बॉसिंग करावे मला डॉमिनेट करावे असे वाटतय्......... मला तू पुन्हा हवा आहेस.... " धिंगाणा घालणार्‍या पावसात" नको नकोरे पावसा असा धिंगाणा घालूस ..."ही कविता उत्साहात सांगणारा साधासा "तू" पुन्हा हवा आहे.....
मला आनंदी ठेवण्याचे प्रॉमिस करणारा.....
करशील ना रे पुन्हा अर्ज......... दे ना असलं एक प्रॉमिस.
सध्यातरी शून्यात नजर लावून बसलेय...... सगळ्या एन्ट्रीज सस्पेन्स अकाउंट्स मध्ये टाकत............

आज तो जीने की तमन्ना है...........

काल डायव्होर्सपेपर वर सह्या केल्या.
एकाच वेळेस खूप मोकळं आणि खूप जड असं काहीतरी वाटलं.
आनंदापेक्षाही गिल्टी जास्त वाटलं.
वाक्यानंतर पूर्णविराम द्यावा आणि वाक्य संपावं तसा आपला वीस वर्षांचा संसार सहजीवन एका सहीने संपले .
रजीस्ट्रारच्या ऑफिसात सह्या करून परत जाताना मी सही केलेल्या पेनचे टोक मोडून टाकले. त्या पेनने काही आणखी पांढर्‍यावर काळे नको व्हायला.
कुठे जायची इच्छा नव्हती. पण गेलो. ऑफिसात क्युबिकलमधे तसाच बसलो. फेसबूक,सेमटाईम सगळीकडे सामसूम होती. कोणी बोलावले नाही. संध्याकाळी घरी जायचीसुद्धा इच्छा नव्हती. बार कडे पाय वळले दोन क्षण तेथे थांबून तसाच परत फिरलो. घराजवळच्या बागेत बसलो. एक प्रकारची सुन्नता होती. बहुतेक मीच सुन्न झालो होतो. खरेतर घटस्फोट दोघानाही हवा होता.माझी ही प्रतीक्रिया मलाच अनभिज्ञ होती. एकदा भांडताना मी म्हणालो होतो तसा खरेतर मी जोरदार पार्टीच्या मूड्मधे असायला हवा होतो.
आपला वीस वर्षांचा सहवास.आपले लग्न पाहून दाखवून झालेले अ‍ॅरेन्ज मॅरेज. लग्ना नंतर दोन्ही घरांचे सूर मस्त जुळले. दाखवण्याच्या कार्यक्रमात तू मला आवडली होतीस असे मी म्हणणार नाही. पण नावडली होतीस असेही नव्हते. पण कोणाशीतरी लग्न करायचेच आहे या भावनेने मी होकार दिला असेही नव्हते.
आपण त्यावेळेस भांडारकर रोडवरच्या हॉटेलात कॉफीसाठी गेलो. तेथे क्लबसँडविच खाताना तू बिंधास्त सँडविचचा एकेक दोन्ही हातात धरून मजेत खात होतीस. तुझे ते नि:संकोच मोकळे वागणे मला आवडले. खरे बोलायचे तर एकदम क्लीक झाले.
त्या नंतर फिरायला जुहू वर गेलो गेटवर गेलो तेथे तुझी वागणे एकदम साधे नि:संकोच होते.थोडेसे मॅच्युअर थोडेसे अवखळ.
मी बोलका ,तू थोडिशी अबोल , मला वाचनाची आवड मित्रांची आवड तुला भरतकाम मेहेंदी ची आवड
मी नाटकाबद्दल बोलायचो. तू फुलझाडांबद्दल. तू देवभोळी.. मी नास्तीक....आपल्या आवडीनिवडी कुठेच जुळत नव्हत्या. मला त्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. लग्ना अगोदर मी एक छोटासा ट्रेक केला होता त्याबद्दल भरभरून लिहीले होते. उत्तरादाखल तुझे पत्र आले त्यात तू माझ्या घरातल्या सर्वांची चौकशी केली होतीस.
पत्रात शेवटी काय लिहावे ते ठरवता आले नसेल बहुते म्हणुन फुलापानांची नक्षी चितारली होतीस.परवापरवा पर्यन्त ते पत्र मी जपून ठेवले होते.
आपले लग्न झाले. मला लग्न साधेसे करायचे होते तुला नातेवाइकांच्या गराड्यात थाटामाटाने वाजतगाजत करायचे होते. धुमधडाक्यात सनईचौघडे वाजले.
फोटोचे अल्बम व्हिडीऑ कॅसेट कितीदातरी पाहिली.तू पूजा करतानाचे देवघरातल्या निरांजनाच्या प्रकाशातले तुझे ते सोनेरी स्वप्नील भाव , धाकटा दीर तुझे पाय धुताना तुझ्या चेहेर्‍यावरचे बावरलेले भाव....लग्नात हार घालायच्या वेळचे तुझे ते कावरेबावरे भाव. रीसेप्शन्च्यावेळच्या वेळेस. मी अल्बम मधे पुन्हापुन्हा पहायचो. तू प्रत्येकवेळेस अधीकच आवडायला लागलीस.
एक गोष्ट जाणवली नव्हती ती आता जाणवतेय. प्रत्येक फोटोत माझ्यापेक्षा तूच जास्त महत्वाची होतीस.
लग्नानंतर लगेचच मी नोकरी सोडली आनि व्यवसाय सुरू केला. तू मला एका शब्दाने विचारले नाहीस. उलट आश्वासक नजरेने मी योग्यच केले अशी पावती दिलीस,
रडखडत चाललेल्या व्यवसायातही तू साथ देत होतीस. जे मिळेस त्यात समाधानी असायचीस. तुझी तक्रार नसायची. "होईल रे... हळूहळू होईल" तू म्हणायचीस.
तुला जेंव्हा पहिल्यांदा दिवस गेले तेंव्हा तू हळूच मला बिलगलीस आणि कानात मोठ्याने सांगितलेस "साला तू तो बाप बन गया......" आणि त्या नंतर मीच लाजलो होतो.
मुलगी झाली ती अगदी हुबेहूब माझ्यासारखी दिसत होती याचा तुलाच जास्त आनंद झाला होता.
तीला खेळवताना . मुलीला घास भरवताना, तीला ए बी सी डी शिकवताना प्रत्येकवेळेस तू मला नव्याने गवसत गेलीस.
व्यवसाय करण्याचा निर्णय चुकला किंवा मी चुकत गेलो. म्हणावे तसे यश मिळत नव्हते ..यश कशाला अपयशच म्हणना.........
माझ्या आर्थीक परीस्थितीबद्दल तुझी तक्रार नव्हती. मी कधी कुरकुर केली तर तू म्हणायचीस "आपल्याला जे मिळतय ते सुद्धा बर्‍याच जणांसाठी स्वप्न असते......." व्यवसायातील अपयशाने मी वैतागायचो. राग तुझ्यावर काढायचो.........तुला त्रास होत असेल माझ्या वागण्याचा............ एकदा मी तुला विचारले होते..तू म्हणालीस " आपल्याला जेंव्हा जेंव्हा खूप त्रास होतो तेंव्हा समजावे की देव आपली परीक्षा घेतोय...." तुझे उत्तर मला बरेच काही शिकवून गेले
व्यसायात यश मिलत नाही म्हणुन तू मला नवे शिक्षण घेण्याचा आग्रह केलास. मी काही कोर्सेस केले. बरेच दिवस नोकरी मिळाली नाही. कधी बोलली नाहीस पण तुझ्या चेहेर्‍यावर उदासी जाणवायची .ज्या दिवशी नोकरी मिळाली. त्या दिवशी नाक्यावरच्या सायबरकॅफेमधे तुला नोकरीचे ऑफरलेटर दाखवले. तुझा खुललेला चेहेरा......आपण एक आईस्क्रीम घेतले दोघानी मिळून खाल्ले. ते आपले सॅलेब्रेशन.
नोकरीसाठी मी बरेच दिवस घराबाहेरच असायचो. आपले बोलणे फोनवर व्हायचे. कधीकधी दोन दोन महीने कधी महिनाभर बाहेरच असायचो. मी येतोय म्हणायचा अवकाश.तू वाट बघायचीस. कधी येण्याची तारीख बदलली म्हणालो की नाराज व्हायचीस.
एकदा असाच तुला सरप्राईज म्हणून मी तुला दिल्लीहून मित्रासोबत एक पार्सल पाठवतोय एअरपोर्टवर घ्यायला जा म्हणुन फोन केला. आणि मी स्वतःच आलो. तू माझ्या मित्राला शोधत होतीस आनि मी समोर दिसलो...... जत्रेत चुकलेल्या लहान मुलाला आईवडील दिसावेत तितका तुला हर्ष झाला होता. कितीतरी वेळ तू हसत होतीस आणि शेवटी तर भोवतालच्या गर्दीची पर्वा न करता तू मला घट्ट मिठी मारलीस. आणो रडायला लागलीस............वेडी.
नोकरीच्या निमित्ताने मला वारंवार घराबाहेर रहावे लागत होते. आता बहुतेक तुला एकटे रहायची सवय लागली असावी. तुझा आग्रह म्हणुन मी मुद्दाम स्थिर / मुम्बैत रहता येईल असा प्रोजेक्ट घेतला. असा प्रोजेक्ट मिळाला म्हणून तू किती आनंदली होतीस. माझ्या आणि तुझ्या आईवडिलाना मुद्दाम आपल्याकडे बोलावून घेतलेस. ते दोनतीन आठवडे आपल्या घरात दिवाळी असावी असा जल्लोश होता.
तुला माझ्या नसण्याची सवय झाली होती. प्रत्येक निर्णय स्वतन्त्रपणे घ्यायची सवय झाली होती.
माझेसुद्धा निर्णय तूच घ्यावे असा तुझा आग्रह असायचा. घरातली प्रत्येक वस्तु तुझ्या निर्णयाने आलेली होती. पैपाहुणे तुझ्या आग्रहाने यायचे. सुरवातीचा बुजरेपणा जावून तुझ्यात एका नवा आत्मविश्वास आलेला पाहून मला खूप बरे वाटायचे . घरात बहुतेक निर्णय तूच घ्यायचीस.कुठे काय ठेवावे कुठे काय ठेवू नये इतकेच काय माझ्य टेबलावर कुठे काय असावे हे देखील तूच पहायचीस.
एव्हरी थिंग वॉज सो मच इन प्लेस........... दॅट यू वॉन्टेड मी ऑल्सो टो स्टे इन प्लेस.......... शोभेच्या बाहुल्यासारखा.
मी कोणाशी काय बोलावे. मी कुठे काय खरेदी करावे. तुझ्या कोणत्या नातेवाईकाना काय म्हणावे .काय वाचावे.......कोणते कपडे घ्यावे हे तूच ठरवायचीस.
आपलं एकदा भांडण झालं टेबलावरचं फ्लॉवरपॉट कुठे ठेवावा यावरून.........कधी जाणवलं नव्हतं पण ते आपल्या सहजीवनातलं पहील भांडण होतं..... आतापर्यन्त मी जे म्हणायचो त्याला तुझी मान्यता असायची. मतभेदच नसायचे....... आता ते छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा व्हायचे. दहावी नंतर मुलीला कोणत्या साईडला घालावे या वरून तू बरेच मुद्दे मांडलेस. तीने आर्ट्स घ्यावे ही माझी इच्छा तर सायन्स घ्यावे ही तुझी. प्रत्येक मतभेदाचा शेवट तुझ्या वाक्यानेच व्हावा हा तुझा आग्रह. वादविवाद नकोत म्हणून मी बर्‍याच निर्णय प्रक्रीयेतून स्वेच्छानिवृती घेतली.
ते सुद्धा तुला आवडले नाही. तुला आता बहुतेक वादविवादाची आवड निर्माण झाली असावी. ........... मी एकदा हे तुला विचारलेसुद्धा.तु म्हणालीस त्यात काय मोठेसे इतकी वर्ष एकटीनेच काढलीत ना.......... आता थोडे जास्त बोलले तर बिघडले काय.
वया परत्वे असेल किंवा कसे......... पण तुझा स्वभाव आता खूप बदलला होता. पूर्वीचा शांतपणाजावू त्याजागी चिडचिडेपणा आला होता. मी हल्ली तुझ्याशी बोलत नाही / भांडण लवकर संपवतो . बरेच दिवसात आपन बाहेर जेवायला गेलो नाही / बाहेर हॉटेलात कशाला पैसे खर्च करायचे त्यापेक्षा घरातच जेवू ....... मी माझ्या आईला आपल्या वादविवादाबद्दल फोन केला / फोन केला नाही. मी मुद्दा कोणत्याही पद्धतीने मांडला तरी तुझ्याकडे वावविवादासाठी दुसरी बाजू तयार असायची.
सततच्या भांडणांमुळे माझ्या कामावर परीणाम व्हायला लागला. ऑफिसात मी फार रीलक्टंट वागू लागलो. परीणाम माझ्या नोकरीतल्या रेटींगवर झाला. मी तसे तुला सुचवलेसुद्दा........ ते तुला पटले नाही. भांडणे चालूच राहिली. दिवसाला किमान चार मुद्द्यांवरून.......... मोबाईल वरूनसुद्धा.
सततच्या भांडणाला कंटाळून असह्य झाले तेंव्हा मी आपण वेगळे राहू म्हणालो.ते सुद्धा तुला मान्य नव्हते. तुझे म्हणणे" लोक काय म्हणतील. मुलीचे शिक्षण व्हायचय लग्न व्हायचय".
मी भांडणे बंद केले त्याचाही तुला राग यायचा.. मी शेळपटासारखा गप्प का बसतो म्हणून भांडायचीस.
हे सगळे सहन करणे माझ्या शक्तीच्या पलीकडले होते. मी संत नाही. शेवटी मी तुझीच युक्ती वापरली तू भांडायला लागलीस की कानात बोळे घालून बसू लागलो. तू वैतागलीस. वेगळे व्हायला तयार झालीस.
कोर्टात डायव्होर्स फाईल केला. मॅरेज काउन्सीलरला आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत फक्त घटस्फोट हवाय असा अर्ज केला.
सह्या करण्यापूर्वी मला तुझ्या बरोबर एक आईस्क्रीम खायचं होतं......... ते जुनं सॅलेब्रेशन आठवून.
एकदाच्या सह्या झाल्या. तू मला मी तुला परके झालो.
घटस्फोटाची केस तू दाखल केलीस. जिंकलीस.मला ना जिंकण्याचा आनंद ना हरण्याचा खेद.
एक शून्यता घेवून बसलोय हातात.
पण खरं सांगू शून्यावर कितीही शून्य मांडली तरी त्याची किम्मत शून्यच रहाते.
कोर्टात त्यांचा निर्णय बदलावा यासाठी मी अर्ज करणार नाहिय्ये. मला तुला जिंकण्याचा पुन्हा एकही चान्स द्यायचा नाहिय्ये. तेवढे तरी मी करू शकतो. करणार आहे.
बाकी विचार उद्या करेन म्हणतो .......... मनाने जिवंत असलो तर.

रूपक ३

प्रेमचंदांची एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली... दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत  गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट. शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय.... अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली. दार थडाथडा आउअटू लागले. बोचरी थंडी आणि वारा आत येऊ लागला... पहिल्या मित्राने दुसर्‍याला सांगितले.... जरा दार बंद करतोस का. दुसरा म्हणाला ...मी दमलोय वणवण भटकून. शिवाय सकाळपासून अन्नाचा कण नाही गेला पोटात. "माझी काय वेगळी परिस्थिती आहे " पहिला म्हणाला " आपण दोघे ही बरोबर होतो की" "पण मी आजारी आहे तू उठून दार लाव की" "माझी पाठ गेलीय कामातून" "माझ्या पायात गोळे आले आहेत" दोघेही स्वतः किती शिणलोय हे सांगत होते. कोणाचेच पारडे खाली जात नव्हते. " मी लहान पणी किती खस्ता खाल्या...... धाकट्या भावंडांचे सर्व मलाच करावे लागायचे. आईचे प्रेम कधी मिळालेच नाही" "मी सुद्धा ते केलय सावत्र आईचा छळ सोसलाय" दोघांच्या व्यथा सारख्याच होत्या. शेवटी दोघानी ठरवले की ज्याने जास्त दु:खे भोगली असतील तो झोपेल आणि दुसरा उठून दार लावेल " मी लहान पणी फार दु:ख भोगले आहे दारुड्या बापाचा पाठ मोडेस्तोवर मार खाल्लाय" पहिला म्हणाला. "आणि मी सावत्र आईचा" दुसरा म्हणाला. " मी जेवत असताना समोरचे ताट भिरकावून दिले होते बापाने. मारहाणीत त्याने माझा हात मोडला" " सावत्र आईने मला तापल्या तव्याचे चटके दिले होते" ".....@#......." "!!!......----" दोघे ही मित्र आपापली दु:खे सांगत होते. दोघांचीही दु:ख्खे तुल्यबळ होती. कोणीच हार जायला तयार नव्हते. दोघानीही अगदी आठवत होते त्या वयापासून आठवत होती ती सगळी दु:खे उगाळून झाली. पहिल्या मित्राला हळूहळु राग येऊ लागला. बाकी काही नाही निदान इतरांपेक्षा आपल्या कडे अभिमान बाळगावा असे काहितरी होते तेच कोणीतरी हिरावून नेत आहे असे त्याला वाटू लागले. रागाच्या तिरीमीरीत तो ऊठला त्याने दुसर्‍याला लाथाबुक्क्यानी बदडून काढले. मित्राला मारताना संतापाने तो रडत होता. मारून मारून पहिला मित्र दमला. दुसरा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला आता माराच्या वेदनाच जाणवत नव्हत्या. भान आल्यावर पहिल्या मित्राला दुसर्‍याची अवस्था जाणवली. तो खजील झाला. त्याने दुसर्‍याची माफी मागितली. त्याला कुठे लागलेखुपले आएह का ते पाहिले. त्याची पाठ चेपू लागला. दुसरा मित्र ग्लानीत क्षीण हसला. पहिल्या मित्राला त्या अवस्थेत मित्राचे हसणे पाहून नवल वाटले. "फार मारले न मी तुला" पहिला खजील होत म्हणाला " हरकत नाही ...तू संतापाने मारलेस्.........जाऊदेत. सूखे नव्हतीच कधी आयूष्यात. दु:खेच होती. तु प्रत्येक दु:खाच्या बाबतीत आप्ण समसमान होतो. पणआज मी त्या बाबतीत तुझ्यापेक्षा वरचढ ठरलोय मित्रा.आता मला हे सांगता येईल की माझ्या जीवलग मित्राकडून मार खाल्लाय. निदान हे दु:ख तुला मी मिळू देणार नाही.