Saturday 21 May 2011

गुलमोहोर

गुलमोहोराचे प्रत्येकाचे नाते काही वेगळेच असते. आंबा चिंच यांसारख्या राकट आणि जटाधारी वडीलधारे वडपिंपळ यांच्या धीरगंभीर गर्दीत एखाद्या चॉकलेट हीरोसारखे एकदम तुकतुकीत दिसणारे हे देखणे झाड काही वेगळेच भासते.
या झाडाची मोहिनी मला कधी पडली माहीत नाही.... आमच्या सातार्‍याच्या न्यू इंग्लीश स्कूलच्या आवारात गुलमोहोराची बरीच झाडे आहेत.... शाळा सुरु होण्याच्या सुमारास गोलमोहोराच्या पाकळ्यांच्या शाळेत अक्षरशः पायघड्या घातल्यासारखा सडा असायचा..... त्या केशरी पिवळ्या पाकळ्यांची शोभा काही वेगळीच वाटायची.....
शाळेत जायचे म्हणजे गुलमोहोरला भेटायला जायचे हे डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की.अजूनही एखाद्या रस्त्यावर फुललेला गुलमोहोर पाहीला की त्या कोपर्‍यावरून कोणीतरी वर्गशिक्षक येतील असेच वाटत.
golmohor2
त्या केसरी पाकळ्या पुस्तकात ठेवायचो...मग कधीतरी त्या पाकळीवरच्या रेशा न रेशा पुस्तकातल्या त्या पानावर उमटायच्या. पाकळीला एकदम कडक्क इस्त्री झालेली असायची पण त्याचा रेशमी स्पर्षाची जादू मात्र अजून टिकून असायची.
पुस्तकात ठेवलेल्या त्या पाकळ्यांमधून गुलमोहोर माझ्या कवितेत उतरला हे मला कळालेच नाही.... सांगलीच्या आमराईत भेटलेल्या गुलमोहोरावर केलेल्या एका कवितेने आपल्या कविता लोकाना आवडू शकतात..... त्या काव्यवाचन स्पर्धेत भरभरून दाद मिळवू शकतात हे जाणवले....तशी कविता मी आंब्याच्या किंवा पिंपळाच्या झाडावर लिहू शकलो नसतो.
सगळीच झाडे हिरवी असतात. पिंपळाच्या झाडाचा हिरवा रंग उगाच काहीतरी गूढ असल्याची जाणीव करून देतात.
जी एंच्या लिखाणाच्या प्रेमात होतो तेंव्हा उगाचच प्रत्येक कथा पिंपळाच्या झाडाखाली बसून वाचावी असे वाटायचे. आंब्याची ती हिरवी छटा उगाचच छापील शासकीय कागदाचा कोरदे पणा जाणवून देते.
पेरूच्या पानाची पोपटी छटा मोहवते पण पानाचा कठोरपणा लगेच दाखवते. निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकग्राउम्डवर नारळाच्या झावळ्यांचा हिरवेपणा थोडासा काळपटच वाटतो. एकदा चिनाराचे झाड पाहिले. त्याचा पसारा लक्षात येईपर्यन्त ते चिंचेचे झाडच वाटत होते..... त्याखालच्या बांधावर जर एखादी हिरवे नऊवारी कारभारीन उभी असती तर... कोल्हापुरात किंवा सातार्‍यात आहे असेच समजलो असतो चिंचेच्या हिरव्या तांबूस छटेत दात आंबवेल असा खट्यालपणा असतो. त्यात एक भारलेपणा असतो. चिंचेवर मुंजा रहातो......असे काहीतरी लहानापणी ऐकले होते...... पण मग आम्हाला दोन चिंचा खाल्या मुले होणारा खोकला त्याला का होत नाही...... किंवा पिंपळावरच्या मुंजाला खोकल्या मुळे हैराण होऊन झोप येत नसेल ना ......असे काहे प्रश्न विचारून पाठीत धपाटे खाल्याचा अनुभव गाठीशी होताच.
गुलमोहोराचे माझे नात एनक्की जुळले ते मला सांगता यायचे नाही पण ते मित्र सखा सुर्‍हूद या पलीकडचे होते. वक्त्याचे एखाद्या अलिप्ततेने ऐकणार्‍या एखाद्या जाणकार श्रोत्याचे असावे तसे.....
शाळेच्या सुट्टीच्या वेळेत गुलमोहोराखाली बसून मित्रांसोबत डबा खायचो.... गुलमोहोराच्या वाललेल्या शेंगानी शिवाजी औरंगजेब युद्ध खेलायचो... एकदम तरवारी चा फील देणार्‍या त्य शेंगा आम्हा प्रत्येकाच्या दप्तरात असायच्या... कधीतरी आईने दप्तर आवरले की त्याबद्दल जाब द्यावा लागत असे.
गुलमोहराचा बुंधा हा आमचा खेळताना दप्तरे ठेवण्याचा हक्काचा भोज्जा असायचा... तोच कधीतरी क्रिकेटचा ष्टंप व्हायचा . तर कधीतरी खोखो चा खांब व्हायचा.
पाकळ्यांचा लालसर तपकिरी पायघड्या घातल्यागत सडा असायचाच त्यामुळे गुलमोहोराखाली कोणी खेळताना पडले आणि त्याला खरचटले असे कधीच झाले नाही.
का कोणास ठाऊक झाडाना जर बोलता आले असते तर आंबा वगैरे झाडे ही तुमची विचारपूस करताना काय भो कस काय लै दिवसानी दिस्लात यंदा मुक्काम हाय ना....आपल्या बांधावरल्या झाडाला यंदा झक्कास मोहोर आलाय्....रायवळ हाय पन एकडावा हातावर पिळला की साकर एक्दम जणू..... अशी विचारपूस करतील....... हिरवीगार चिंच म्हणेल बसा जरा दमला असाल.... थंड व्हा... का घाई करताय जायची. अशी भाबडी नाते जपणूक करतील असे वाटते. गुलमोहोर थोडासा अलीप्त ...पण प्रेमळ विचारपूस करेल.... तुमच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करेल्..पण जाताय म्हणालात तर थोडे थांबला असतात तर बरे झाले असते वगैरे न बोलता.... आता तुम्हाला पाच ची एस्टी मिळेल..... नाक्यावर रीक्षा असेलच असही म्हणेल.... असेच वाटते
एवढी विचित्र वाटणारी कोकणस्थी अलिप्तता सोडली तर नाते संबन्ध जोडायला गुलमोहोर हा सर्वात मस्त.......
कडकडीत उन्हात स्वतःसोब्त तुम्हालाही फुलवणारा.
गुलमोहोराच्या झाडाचा प्रॉडक्टव्हिटी नावाच्या गद्य प्रकाराशी काहीही संबन्ध नसतो. त्याची फुले कोणी देवाला वाहिल्याचे पहाण्यात काय ऐकण्यात सुद्धा नाही शुभेच्छाबुके सारखी खास जरबेरा ऑर्चीड्स गुलाबाचा नखरा असलेली राखीव जागा गुलमोहोराच्या नशीबात नसते. हे असले बंदिस्त होऊन खुलत बसणे गुलमोहोराला मानवतच नाही
म्हणूनच की काय गुलमोहोराला फुलायला ऐसपैस आभाळाभर जागा मिळते... निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकड्रॉप वर गुलमोहोर एखाद्या मुक्तहस्त चित्राप्रमाणे कलंदर पणे खुलतो.
jhad1
फांद्यांचा आटोपशीर पसारा डहाळीची नव्हाळी सदोदीत तुकतुकीत असते... पानांचा मंत्रचळ लावणारा रेखीव पिसारा.... आणि त्याच्या मोरपिसाच्या आकाराच्या पाकळ्या .... हे सगळे इतके आखीव रेखीव असते की एखाद्या आईने तिच्या सात आठ वर्षाच्या मुलाला न्हाऊ घालून नीट भांग वगैरे पाडून ठेवलाय्.आणि ते मूलदेखील अगदी पाटावर देवासारखे बसलय असेच वाटतय.
गुलमोहोराच्या झाडाचा हा रेखीवपणा सदैव जाणवत असतो....
हे झाड भारतीय नाहिय्ये.... मादागास्कर बेटावरून कधीतरी कोणीतरी हे झाड इथे आणले....... आणि वड पिंपळ बाभळ उंबर ही खडखडीत नाव कुठे गुलमोहोर हे नजाकतदार नाव. तशीच नजाकत पानांच्या रचनेत ही. एकदम आखीव रेखीव........ पिंपळासारखी वळणदार वेलबुट्टी नसेल पण फारशी आकर्षकक नसलेली पाने रेखीवपणे मांडली तर जे भौमितीक सौंदर्य जाणवते त्याला तोड नाही
pane
पण जाऊ दे ना.... एकदा असेच कोणीतरी म्हणाले की सौंदर्य ही केवळ बाह्य गोष्ट नव्हे..... वरवरची नव्हे ........ सौंदर्य हे अंतरंगात असते......... त्यावर दुसरा उत्तरला हो बरोबर आहे तुझे.. सुंदर स्त्रीचे र्‍हदय सुंदर असते. एवढेच काय तीचे यकृत ,प्लीहा लहान आतडे सुद्धा सुंदर असते.........
जाउ दे. इतकी चिरफाड कशाला करायला हवी.
गुलमोहोर जगात बहुतेक देशात आढळतो... उष्ण, समशीतोष्ण कटीबंधात तर हमखास...
असो.......
एखाद्या कौलारू घराशेजारच्या गुलमोरामुळे घराचे सौंदर्य कितीतरी पटीने वाढते. का कोणास ठाऊक ते घर एकदम आपलेसे वाटू लागते. गुलमोहोराच्या झाडाची सावली वड चिंच पिंपळासारखी डेरेदार नाही. पण पानापानांच्या नक्षीतून झिरपत जाणारा तो उन पावसाचा खेळ भर उन्हातही एक वेगळाच अनुभव देतात
शाळेत असताना आम्ही अजून एक खेळ खेळायचो....... गुलमोहोराच्या पाकळ्यां नखाला लावायच्या... बरोब्बर पाच पाकळ्याचे फूल आणि त्यातही गम्मत म्हणजे एकच पाकळी वेगळ्या रंगाची...... आणि मधोमध असलेला तो तुरा
tura
ती मधोमध असणारी पांढरी ठीपकेवाली पाकळी चवीला किंचीत आंबट लागते
pakli
हे सुद्धा गुलमोहोरच करू जाणे.... एकच पाकळी वेगळी.......
गुलमोहोराच्या झाडाचा अयूर्वेदात काय उपयोग आहे हे मला माहीत नाही.... बहुधा काही फारसा महत्वाचा नसेल.........
या झाडाला फारशी सावली नाही.... त्याची फळे फारशी उपयोगी नाहीत्....त्याची पाने फारशी उपयोगी नाहीत..... कचराच जास्त होतो... फांद्या /लाकूड फारसे उपयोगी नाही तरिही रॉयल पॉईन्शियाना म्हणजे गुलमोहोर जगातल्या पहिल्या पाच देखण्या झाडांत गणला जातो... तो जगभर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. फ्लॅम्बॉयन्ट ट्री , मोराच्या फुलांचे झाड झाड , जंगलातली आग .......
आश्चर्य वाटते असे नक्की काय आहे की जे इतर झाडांत नाही आणि गुलमोहोरात आहे...... बहुधा लोकांच्या मनाशी सलगी करण्याची जादू..... ती तर नावापासूनच आहे... गुलमोहोर म्हणले की उगाचच ती उर्दू शायरी आठवते.... ताजमहालावर॑ची फार्सी वेलबुट्टी आठवते.
प्रत्येक सर्‍हदय माणसाचे गुलमोहोराचे एक अनामिक नाते असते.... नसेना का गुलमोहोराचे झाड फारसे उपयोगी........ नसतो का आपला एखादा मित्र्...फारसा उपयोगी न पडणारा.... थोडासा फटकून रहाणारा ...स्वतःला शिष्ठ समजणारा. पण त्याच्याशी आपली मैत्री कायम रहाते....
एखाद्या हळव्या क्षणी या मित्राने आपल्याला हवा असलेला तो कसलासा खांदा देऊ केलेला असतो...........
गुलमोहोराचे तसेच काहीसे आहे......... माझे गुलमोहोराचे नाते काय आहे कोण जाणे पण आहे हे नक्की......
शाळेत असताना वाड्यात रहायचो........... तिथेही भरपूर झाडे होती..पण गुलमोहोर नव्हता जेंव्हा वडीलानी घर बांधले तेंव्हा झाडे कोणती लावायची हे विचारल्यावर प्रत्येकाने गुलमोहोराचेच नाव घेतले...... त्या नन्तर आंब्या फणसाचे
गुलमोहोराच्या झाडाची आणखी एक गम्मत लक्षात आली का......... पिंपळावर मुंजा ...ब्रम्हसम्नध असतो..... चिंचेवर खवीस असतो... वडाच्या झुलणार्‍या पारंब्यावर हडळ असते....... बाभळीसारख्या काटेरी झाडावर सुद्धा झुटिंग असतो....... पेरूच्या झाडावर चेटकीण असते... नारळाच्या झाडावर पिसे की कायसे असते................ ही सगळी झाडे आमची हक्काची खेळण्याची झाडे....... पण रात्रीची शिफ्ट ही या मंडळीनी वाटून घेतलेली असते....
चिंचेचे झाड तर रात्री भितीदाय्क वाटते......... दुपारी काहीतरी आर्या वगैरे सांगणारी पिंपळाची सळसळ रात्री काही वेगळीच भाषा बोलत असते....
आमच्या घराशेजारच्या गुलमोहराच्या फांद्या रात्री वार्‍यानी कर्र कर्र वाजायच्या.....पण ती कर्र कर्र कधीच भीतीदायक वाटायची नाही......... उलट "आहे रे मी सोबतीला ..."अशीच काहिशी असायची.
उंबराच्या झाडाखाली दत्ताचे जागृत देवस्थान असते.... पिंपळाखाली शनी मारुती.... चिंचेशेजारी गणपती अशी देवानीही झाडे वाटून घेतलेली असतात.
गुलमोहोराचे झाड मात्र या सगळ्यापासून अलीप्त असते.......... जणु ते सांगत असते तुम्ही कोणत्या का देवाला भजत असाल...... मी तुमचा खीसा हलका करणार नाही ....तुमच्याशी गूज गोष्टी करेन........ मनावरचा ताण मात्र निष्चीतच हलका करेन.
jhad
आमच्या सातार्‍याला एक रस्ता आहे फारसा रहदारीचा नाही... मात्र नव्या धाटणीची स्वतन्त्र घरे असलेला आहे... एक दोन हॉस्पीटल..एक शाळा.... दुकाने वगैरे जवळजव़ळ नाहीतच असा........ अगदी निनावी.... केंव्हा कोण जाणे कोणाच्या तरी लक्षात आले की त्या दोन अडीच किलोमीटर्च्या रस्त्यावर गुलमोहोराची १०० पेक्षा जास्त झाडे आहेत...... लोकानी स्वतः होऊनच त्या रस्त्याचे नामकरण केले "गुलमोहोर पथ"
ते नाव आपोआप लोकांच्या तोंडी रुळले...
मग तेथे संध्याकाळी पायी फिरायला जाणारी मंडळी वाढली.....
तेथे हमखास दरवर्षी गुलमोहोर दिन साजरा केला जातो......... त्या निमित्ताने लोक एकत्र येतात....चित्रांचे प्रदर्शन ..काव्य संध्या वगैरे साजरे होतात...... ... विषय अर्थातच गुलमोहोर हाच असतो.
चित्रे कविता बहुधा रोमॅन्टीकच असतात. जणु गुलमोहोराला दु:ख ,भूक, इतर विषयांचे वावडे असावे...
हे मी बोलूनही दाखवले....की गुलमोहोराला फक्त प्रेमकवितेतच स्थान का दिलय....
त्या गुलमोहोर डे ला एकजण काव्यवाचनात एक जण त्याची कविता वाचत होता...
"पहाटे तुझ्या कुशीतून .....गुलमोहोराला पहावं"
शेजारी बसलेले मधूसूदन पत्की हळूच पुटपुटले... "वाटलं तर मोहोरावं नाहीतर गुल व्हावं"
कसे कोण जाणे पण हे पुटपुटणं सगळ्याना ऐकू गेलं..... गुलमोहराच्या दालनात विनोदाची भर टाकून गेलं

2 comments: