Monday 13 June 2011

माझा झंपक पणा

त्या दिवशी सेशन जरासे लांबलेच. लोकांचे प्रश्न जसे संपतच नव्हते.
सगळे आटोपुन पुण्यातून निघायला रात्रीचे साडेनऊ वाजले.
स्वारगेटवर येऊन बस पकडली.
बसने कात्रज पार केले कंडक्टरने तिकिटे सर्वाना दिली गेल्याची खात्री केली आणि स्वतःचे हिषोब संपवुन गाडीतले दिवे बंद केले.
सेशन जोरदार झाला होता थोडे थकल्यासारखे झाले होते पण एखादे सेशन मनासारखे झाल्यानन्तर जो उत्साह असतो तसाच उत्साह वाटत होता.त्यामुळे झोप लागायचा प्रश्नच नव्हता.
काही वाचायचे तर अंधारात वाचायचे कसे. मी सेशनची उजळणी करत बसलो. एका श्रोत्याने एक मस्त प्रश्न विचारला होता. मी थोडासा अडखळलोच होतो त्यावर .
बोलताना मी म्हणालो होतो की आपली प्रत्येक गोष्ट ही रूटीन बनलेली असते. जेवण , कपडे , मित्र , पुस्तके या सर्वांचा एक पॅटर्न ठरुन जातो आणि सगळ्या गोष्टी साचेबंद होतात. आपल्या जगण्यात थोडे वेगळेपण असले तर जीवनाचा आनन्द घेता येतो.
त्या श्रोत्याने विचारले साचेबंदपणा कसा काय म्हणता? मग रोज जेवण घ्यायचे नाही काय. रोजच्या जेवणात आपण कुठे तेचतेच खातो. ते वेगळेवेगळे असतेच की.
आपण टीव्ही बघतो. तो वेगळेपणाच असतो.
तो म्हणत होता त्यात तथ्य होते.
तुमचे बरोबर आहे पण आपण जो विचार करतो त्याच्यात ही साचेबंदपणा आलेला असतो. उदा मनोरंजन सुद्धा आपण एका ठरावीक प्रकारचेच अपेक्षीत ठेवतो .
जेवताना आपल्याला जे पदार्थ नक्की माहित असतात तेच चाखतो. आवडते आणि नावडते देखील. रोज एका ठरावीक वेळेसच जेवतो. बरीच कुटुंबे शनिवारी संध्याकाळी हॉटेलात जातात. फ्रीक्वेन्सी थोडी कमी पण तरीही फ्रीक्वेन्सी ना.
बोलण्याच्या नादात मीथोडा पुढे गेलो आणि म्हणालो सेक्स/ कामजीवन हे सुद्धा आपल्यासाठी एक रूटीन बनलेले असते. मी कित्येक जोडपी अशी पाहिली आहेत की जी ठरावीक फ्रीक्वेन्सीने कामजीवन उपभोगतात. त्याचा ही मग कंटाळा येतो. खरे तर त्या रुटीनचा ठरावीक चाकोरीचा कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आयुष्य नीरस वाटू लागते.
माणूस हे यंत्र नव्हे. पण आपण कामजीवन यंत्रवत जगतो.
त्या श्रोत्याने एकदम विचारले....त्यात बदल कसा आणणार? आणि सगळे हसले.
मी म्हणालो की आपण जे जगतो त्यातला साचेबंदपणा सोडण्यासाठी जे करतो त्यात बदल हवा
म्हणजे.....?
म्हणजे की आपण आनन्द ज्या पद्धतीने उपभोगतो त्यात थोडा बदल हवा. बाह्य साधने बदलण्यापेक्षा आपण आपल्या वृत्तीत बदल करायला हवा.
उदा: आपण विनोदसुद्धा एका ठरावीक पद्धतीचेच ऐकतो त्याचा पॅटर्न ठरलेला असतो. गम्मत करतो त्याचाही पॅटर्न ठरलेला असतो. कधितरी आपण आपल्या वयाला शोभेल असे न वागता लहान मुलांसारखे वागून पाहूयात त्यांच्या सारखी गम्मत करुयात. आपले जगण्यातले रूटीन मोडले की जगणे आनन्ददायी ठरते.
त्यानन्तर थोड्याशा इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. कार्यक्रम आटोपल्यानन्तरही लोकांचे नेहमीप्रमाणे स्वतःच्या समस्यांशी निगडीत खाजगी प्रश्न झाले.
आणि मी निघालो.
विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधला माझ्या उत्तरांमधला आता साचेबंदपणा येत चालला होता.
काहीतरी वेगळे करुन बघायचे म्हणजे तरी काय?
मी माझ्याच विचारांत होतो. त्या अंधारात अचानक मला माझ्याकडे कोणीतरी रोखून टक लावून बघतय अशी जाणी झाली. मी इकडे तिकडे पाहिले.
बहुतेकजण एस्टीच्या तालावर मानाहलवत गाढ झोपले होते.
लोकाना बघता बघता माझे लक्ष्य समोरच्या सीटवरच्या दोन बायकांकडे गेले. ड्राव्हरच्या मागच्या उलट्या सीटवर बसलेल्या असल्या त्या दोघीना बसमधले सर्व चेहेरे दिसत असावेत. त्यांचे डोळे विलक्षण तेजाने चमकत होते. कुत्र्या मांजरांचे डोळे चमकतातना तसे काहिसे.
मला बहुते भास झाला असावा. मी पुन्हा त्यांच्या कडे पाहिले.त्या दोघींच्या माना हलत होत्या पण डोळे मात्र चमकत होते.
या बाया डोळे सताड उघदे टाकून झोपल्यात की काय मी मनात म्हणालो.
मनातले कुतुहल स्वस्थ बसु देईना. मी नीट निरखून पाहिले.
त्या दोघी झोपलेल्याच होत्या. त्यांच्या मिटलेल्या पापण्यांवर बसमधल्या निळ्या लाईटचा उजेड पडून त्या चकाकत होत्या.
मला मी घेतलेल्या कुशंकांचे हसू आले ....
घरी पोचलो. आणि त्या चमकत्या पापण्यां आठवतच हसत झोपलो.
सकाळी भल्या पहाटेच जाग आली. बहुधा पाच वाजले असावेत. अचानक एक भन्नाट आयडीय सुचली.
गम्मतीत थोडे नाविन्य आणले तर?
मी माझ्या मुलीची गम्मत करायची ठरवली.
तिच्या वॉटरकलरच्या बॉक्समधून पांढरा रंग ब्रशने माझ्या पापण्याना लावला. त्यावर दोन्ही पापण्यांवर काळी भरीव वर्तुळे काढली.
आता पापण्या मिटल्यावर त्यावर रंगवलेले वटारलेले डोळे दिसत होते. आरशात एकेक डोळा बंद करून खात्री करून घेतली.
हॉल मध्ये जाऊन झोपलो. थोड्या वेळाने माझी मुलगी येईल आणि ती मला उठवयाला येळ त्यावेळी धमाल गम्मत येईल अशा विचारत मी डोळे मिटले.
थोड्या वेळाने माझ्या वडीलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. मी जागा झालो वडील ते उभे होते त्या जागीच मोठ्याने ओरडत होते . ते खूप घाबरले होते. त्याना दरदरून घाम फुटला होता. मी त्यांच्या जवळ जायला लागलो तसे ते भूत पाहिल्यासारखे अजूनच जोरजोराने ओरडू लागले.
माझ्या रंगवलेल्या वटारल्या डोळ्यांचा तो परीणाम होता.
मी लहान असतो तर नक्की धपाटे खाल्ले असते या असल्या मस्करी साठी.
घरातले सगळे गोळा झाले ते आमच्या दोघांचे अवतार बघून खोखो हसू लागले.
आई ने डोक्याला हात लावला म्हणाली. झंपकच आहेस तू. इवढा मोठा झालास तरी अजून लहान मुलांसारखा राहिलास.
तो झंपकपणा आज आठवला तरी सगळेच जण कितीही मरगळलेलो असलो तरी एकदम रीफ्रेश होतो.

Sunday 5 June 2011

पायर्‍यांची विहीर

विहीरीला पायर्‍या असतात.
मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली.
तीला पायर्‍या होत्या .त्याना पायर्‍या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो.
काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्‍यांची विहीर बघायला गेलो. आणि एक भूलोकीचा चमत्कार पहातोय असेच वाटले.
इस १४९९ मध्ये कोण्या रुडाबाईने दुश्काळी काम म्हणून बाम्धून घेतलेल्या या विहीरी चे बांधकाम एक चमत्कारच आहे.
गेली पाचशे वर्षे हा चमत्कार इथल्या लोकानी साम्भाळून ठेवलेला आहे.
गुजरातमध्ये दुश्काळ पडलेला होता. जनतेला रोजगार मिळावा म्हणून वीरसिंह वाघेला राजाच्या राणीने ही विहीर बांधवून घेतली. थोडिशी जैन शैलीची थोडीशी हडप्पन शैलीची ही विहीर.
पाच मजले असलेली विहीर असे म्हम्तले तर आपल्या डोळ्यासमोर काहीच उभे रहात नाही.
त्या जागेवर जाईपर्यन्त काहीच कळत नाही. बाहेर लावलेला बोर्ड पाहूनही काही खुलासा होत नाही.
adalaj waw 1
आपण एका देखण्या प्रवेशद्वारातून पायर्‍या उतरायला लागतो
2
पुढे येणारे दृष्य काय असेल याची अजूनही कल्पना येत नाही
3
आणि शब्द सापडणार नाहीत असे एक भव्य शिल्प दिसायला लागते
4
पाच मजले जमिनीखाली असलेले हे बाम्धकाम म्हणजे कल्पनेचा एक सुंदर खेळ आहे.
भर उन्हातून जाणार्‍या वाटसरुना साधू सन्यासाना घटकाभर विसावा घेता येईल ताजे तवाने होता येईल या उद्देशाने रुडाबाईने ही विहीर बांधली
इथे बाम्धकामुळे उन सावलीचा एक मजेशीर खेळ सुरू होतो.
आणि त्यामुळे जमिनीखाली पाच मजले असूनही हवा आणि उजेड खेळते रहातात
5
स्ट्रक्चरल सौंदर्य म्हनजे काय याची अनुभूती घेत आपण खाली उतरत रहातो
6
भिंतीवरील नक्षी ,आणि भुमिती ची मजा एकाच वेळेस घेता येते
7
आणि मग बांधकामा मधले एक एक चमत्कार बघायला मिळतात.
8
त्याकाळच्या इंजिनीयरिम्गची कमाल. स्प्रिंगप्रमाणे गोलाकार स्पायरल वळणे घेत खाली उतरणारा हा दगडी जिना. एकावर एक रचलेल्या दगडांची टोके एकमेकात फसवून चुना न वापरता केलेले हे बांधकाम अती अद्भुत आहे.
9
वावाटसरूला स्वच्छा पाणी मिळावे म्हणून रचलेली ही विहीर
10
इथून लवकर पाय निघत नाही.
11
या विहीरीत हजारभ सैन्य सहज सामावू शकायचे.
या वविहीरीचे बांधकाम वीस वर्षे चालले होते. कडक उन्हाळ्यातही विहीर आटत नाही.
एका दंतकथे नुसार सुलतान बाघेराने राजा वीरसिंह वाघेलाचापराभव केला आणि रुडाबाईसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला
रुडाबाईने विहीरीचे बांधकाम पूर्ण करू दे . ते झाल्यावर लग्न करेन असे वचन दिले.
सुलताना ने जेंव्हा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तेंव्हा रुडाबाईने ( रुडा या जुन्या गुजराथी शब्दाचा अर्थ " चांगली") त्या विहीरीत जीव देऊन आपली आयूष्ययात्रा संपवली.
सुलतानाने चिडून विहीर बांधणार्‍या कारागीरांचा वध केला.

Wednesday 1 June 2011

वर्तमान

काल मी तेथे फुलांच्या देशात होतो
फुलपाखरांना पहाताना तुला शोधीत होतो
गवसले तेथे एक गुढ काय मला
ते पाहून पुन्हा पुन्हा बेभान होत होतो.
सांगता न येते ते मला काय होते
रंध्रातुनी माझ्या आनंदे वहात होते.
प्रत्येक फुलात तूच तूच होतीस
ऐसा गोड आभास अनुभवत होतो
मी गात गाणे देवाला आळवीत होतो
र्‍हदयातील भावना तुला कळवीत होतो
सखये रोज तुला मी तेथे ऐसाच भेटत असतो
आठवणींच्या पुस्तकातले वर्तमान जगत असतो