Sunday 31 July 2011

१८५७ अ हेरीटेज वॉक (४)

उपासमार पाउस आणि सैन्यातील बेदीली ( बख्त खानाला सेनापती मानायला हिंदू सैनीक तयार नव्हते) या मुळे स्वातन्त्र्य लढा देणार्‍या सैन्याला हार पत्करावी लागली होती. त्यांचे मनोधैर्य अधीकच खचले.
१८५७ च्या दिल्लीच्या लढाईत नजफगडची लढाई हा ब्रीटीश सैन्याचा पहीला मोठा विजय होता. या मुळे ब्रीटीशांचे मनोधैर्य उंचावले गेले.
ही घटना दिल्लीतील १८५७ च्या घडामोडीत टर्निंग पॉईन्ट मानता येईल. या लढाईचे आणखी एक महत्व म्हणजे असे की पंजाबहून येताना ब्रीगेडीयर जॉन निकोल्सन ने स्वतःसोबत आणलेले सीज मशिनरी. कोणतीही तटबंदी उडवून लावणारी यंत्रणा. यात६०० गाड्या भरून आणलेला दारुगोळा २४ पौंडी आणि १८ पौंडी गोळे फेकणार्‍या तोफा तसेच ८ इंची गोळे फेकणार्‍या उखळी तोफा.
प्राथमिक तयारी म्हणून निकोल्सन ने ६ आणि ७ सप्टेंबरलाच एक तुकडी तोफांसहीत रीज मध्ये तैनात केली. या तुकडीने मोरी गेटजवळ तोफांचा मारा चालू केला. बंडखोर ( भारतीय क्रान्तीकारक) इथे चकले त्याना वाटले की हल्ला या दिशेनेच होणार आहे
दुसरी तुकडी कश्मिरी गेटच्या रोखाने सिव्हील लाईन्स मध्ये तैनात केली. या तुकडीने कश्मिरी गेट जवळ ११ सप्टेंबर रोजी लढाई छेडली.
तिसरी तुकडी ओल्ड कस्टम हाऊस जवल तैनात केली. चौथी तुकडी उखळी तोफा घेवून खुदीसा बाग जवळ तैनात केली.१४ सप्टेंबर रोजी निकराचा हल्ला करायचा असे ठरले त्यानुसार निकोलस ने तीन छोट्या तुकड्या खुदीसाबाग च्या आसपास आणल्या. खुदीसाबाग मध्ये बादशहाचे उन्हाळी निवासस्थान होते. दुसर्‍या तुकडीने कश्मिरी गेट च्या भिंतीवर हल्ला चढवला. गनपावडर आणि वाळूच्या पिशव्या लावून त्यानी स्फोट घडवला यात कश्मिरी गेटच्या भिंतीचा काही भाग पडला.
1
दरम्यान जी तुकडी किशनगंजच्या बाजूने ( काबूल गेट) लढत होती त्या तुकडीचा कमाम्डर मेजर रीड जखमी झाला. बंडखोरानी त्याचा पाठलाग केला आणि त्या तुकडीतील ब्रीटीश फौजेला पळ काढावा लागला. निकोलसन हा मात्र शहर ताब्यात घ्यायचे या इर्ष्येने पेटला होता त्याने एका गल्लीतून काबूल गेट वर पुन्हा हल्ला चढवला. या वेळेस बंडखोरांकडे किल्ल्याच्या भिंतीवरील महत्वाची ठाणी होती. तेथे त्यानी बंदूका देखील तैनात केल्या होत्या त्यानी गल्लीतून येणार्‍या ब्रीटीश शिपायांवर हल्ला चढवला. यात खूप ब्रीटीश सैनीक जखमी झाले. स्वतः निकोल्सन सुद्धा जबर जखमी झाला. जवळजवळ ११७० सैनीक जखमी झाले होते.
यावेळेस आर्कडेल विलसन ने सैनीकाना तात्पुरती माघार घेण्याचे तसेच जवळच्या चर्चचा आसरा घेण्याचेआदेश दिले. ते ऐकताच अक्षरशः मरणासन्न अवस्थेतील निकोलसनने विलसनला मारण्याची धमकी दिली.इतरानी मध्यस्ती केली विलसन कश्मिरी गेटच्या जवळ तळ ठोकून बसला. ब्रीटीश सैन्य आता विस्कळीत झाले होते बरेचसे अधिकारी /सैनीक जखमी झाले होते.
इकडे क्रांतीकारी सैन्य सततचे अपयश , उपासमार यामुळे हताश झालेले होते . नाही म्हणायला अफगाणी मुजाहिदीन लहानमोठे हल्ले चढवत होते. पण त्यात सुसूत्रता नव्हती . हळूहळू ब्रीटीश सैन्याने बंडखोर( क्रान्तीकारी) सैन्यावर विजय मिळवायला सुरवात केली. १६ सप्टेंबर ला बंडखोरांकडील दारुखाना त्यानी कब्जात घेतला. १८ सप्टेंबरला जामा मशीद ताब्यात घेतली. लाल किल्ला देखील ताब्यात घेतला .
2
( तोफ गोळ्यानी झालेल्या जखमा अंगावर अजूनही मिरवणारे कश्मिरी गेट)
२० सप्टेंबरला हुमायूनच्या मकबर्‍यात लपून बसलेल्या बहादूरशहा: जफर आणि त्याच्या तीन मुलाना ताब्यात घेतले .
3
( २० सप्टेंबर ला कॅपटन विल्यम हडसन ने बहादूरशहा जफर ला ताब्यात घेतले. फोटो आं.जा. वर उपलब्ध)
दुसर्‍या दिवशी खूनी दरवाजाजवळ बहादूरशहाच्या तीनही मुलाना फाशी दिली गेले . त्या तिन्ही मुलांची डोकी बहादूर शहा जफर ला नजर करण्यात आली.दिल्लीतील बंड मोडून गेले होते.२१ सप्टेंबर ला दिल्ली ( शहाजहानाबाद) पूर्णपणे ताब्यात घेतले. भारतीय स्वातन्त्र्य संग्रामाच्या दृष्टीने हा एक मोठा मानसीक आघात होता.
या घटनेचा परीणाम भारतातील इतर ठीकाणच्या लढायांवर झाला.
अंगावर टाकलेली जबाबदारी पूर्ण झाल्या नंतर दोन दिवसानी २३ सप्टेंबरला जॉन निकोलसनचा मृत्यू झाला.
4
(असे सांगतात की कडव्या शिस्तीचा भोक्ता असलेला निकोल्सन हा विक्षीप्त म्हणून प्रसिद्ध असला तरीही त्या सैनीकांत तो फार आदरणीय होता. त्याच्या कबरीवरची फुले उचलुन बंडखोर शीख / जाट सैनीकानी इंग्रजांविरुद्ध न लढण्याची शपथ घेतली )
( क्रमशः)

१८५७ अ हेरीटेज वॉक (3)


1
( हाच तो बाडा हिंदु राव ( फोटो अंतरजालावरून साभार) सन १८५८ )
2
हा फ्लॅग टॉवर येथे ११ मे रोजी बंडखोर सर्वप्रथम एकत्रीत झाले. ( फोटो आंतरजालावरून) १८५८
मिर्झ मुघल ने दिल्ली ( शहाजहानाबाद ) शहरात शांतता आणण्याचा प्रयत्न केला पण त्याची पोहोच फक्त लाल्ल किल्ल्याच्या भिंतींच्या आतच मर्यादीत होती . शहराच्या बाहेर गुज्जरानी लोकांकडून पैसे वसूल करायला सुरवात केले. दिल्ली शहरातील लोकांची अवस्था मात्र फारच बीकट झाली. लोक चिडून जो जो अभारतीय ( युरोपीय) दिसेल त्याला लुटू लागले.
इकडे ब्रीटीशानी सैन्याची जमवाजमव सुरु केली . ब्रीटीशांचे बरेचसे अधिकारी दिल्लीतेले उन्हाळ्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी सुटीवर गेलेले होते . लोकाना जमा करण्यात टेलीग्राफ मशीनचा या साठी फारच मोठा उपयोग झाला. २७ मे पर्यन्त त्यानी कर्नाल येथे असलेल्या काही सैनीकी तुकड्या दिल्लीत हलवल्या.
८ जून ला बदली की सराय येथे त्यांची बंडखोरांसमवेत पहिल्ली चकमक झाली. त्यात गुरखा पलटणीने बंडखोराना हुसकावून लावले. बंडखोरांचा बराचसा दारुगोळा या छोट्या चकमकीत कामी आला.
कंपनी सरकारच्या सैन्याने जनरल बर्नार्डच्या अधिपत्याखाली आता दिल्ली रीज चा ताबा घेतला होता. रीज हा यमुनेच्या ( काबूल गेट) जवळील साधारण १२०० यार्डाचा खडकाळ पट्टा आहे. दिल्लीचा उन्हाळा आणि रीज मधील वातावरण हे या रोगदायक होते. तरीही जनरल बर्नार्डने लढा चालूच ठेवला.१३ जून ला त्याने आपल्या सैन्याला हल्ला चढवायच आदेश दिला. काही गैर समजामुळे संपूर्ण तुकडी पोहोचु शकली नाही ऐन लढाईत हल्ल्याचा आदेश मागे घेण्यात आला.यातच
इकडे दिल्लीत रोज नवनवे बंडखोर सैनीक येत होते. त्यांच्या संख्येत भर पडत होती नव्या आलेल्यात बरेचसे अफगाणी मुजाहिदीन होते.बंडखोर आता प्रबळ होत होते. त्यानी हिंदुराव च्या वाड्यावर हल्ले चढवायला सुरवात केली.
१९ जून ला आणि २३ जून ला दोन मोठे हल्ले करण्यात आले तीनही बाजूने हल्ले चढवुन इंग्रजी फौजेची कोंडी करण्यात आली. कसेबसे हे हल्ले परतवून लावण्यात आले. रीज्मधील अवस्था फारच बीकट होती. हल्ले आणि आजारपण यामुळे ब्रीटीश सैन्य जेरीस आलेले होते. यातच जनरल बर्नार्ड कॉलरा मुळे मृत्युमुखी पडला.त्याचा कार्यभार घेणारा जनरल रीड हा सुद्धा आजारी होता. त्यामुळे आर्केड विल्सन ला मेजर जनरल च्या हुद्द्यावर बढती देवून नियुक्ती करण्यात आली. तो देखील अशक्त झाला होता. त्याच्या दिमतीला असलेला नेव्हील चेंबरलीन हा तरुण अधिकारी १४ जुलै ला गंभीर जखमी झाला. याच सुमारास पंजाब हून १४ ऑगस्ट ला ब्रीगेडीयर जॉन निकोल्सन ताज्या दमाच्या नव्या ४२०० सैनीकांची कुमक घेवून दिल्लीस आला. घाबरट आणि थकलेल्या आर्केड विल्सन च्या उलट निकोलसन हा फारच धाडसी आणि कणखर होता.
मिर्झा मुघल च्या अपयाशामुळे बहादूरशहा त्याच्यावर नाराज होता त्याने बरेलीहुन मोठी लूट आणलेल्या बख्त खान या कंपनी सरकारच्या गोलंदाजाला सैनापती घोषीत केले. १ जुलै ला दिल्लीत पोहोचलेल्या बख्त खानाने ९ जुलै ला एक मोठा हल्ला चढवला पण तो अपयशी ठरला. त्यानंतर तो छोटे मोठे हल्ले करतच राहीला बंडखोर सैन्याचे मनोधैर्य वारंवार येणार्‍या अपयशांमुळे हेलकावे खात होते त्यातच प्रत्येक हल्ल्या गणीक त्यांचा दारुगोळा कमी कमी होत होता. बख्त खानाने दिल्लीच्या उत्तरेकडे यमुना नदी ओलांडून ब्रीटीश फौजेवर पिछाडीवरून हल्ल चाढवायचा बेत आखला. २४ ऑगस्टला त्याने ८००० सैनीक आनि १३ तोफा घेवून पालम मार्गे नजफगड च्या दिशेने भर पावसात ला कूच केले पण ब्रीटीश सैन्याने पालम येथील यमुनेवरचा पूल अगोदरच उध्वस्त करून ठेवला होता. पावसाने आणि भुकेने सैन्याची अवस्था आणखीनच बीकट करून ठेवली बख्त खानाचीयोजना त्याने १० दिवस अगोदर अमलात आणली असती तर चित्र वेगळे दिसले असते. १४ ऑगस्ट ला आलेल्या जॉन निकोलसनने २४ ओगस्ट ला बख्त खान निघाला आहे हे कळतात २५ ऑगस्टला नजफगड कडे कूच केले.यावेळी चीफ मॅजीस्ट्रेट थिओफेलस मेट्कॅफ ( हाच १० मे च्या हल्ल्यात मरता मरता वाचला होता) निकोलसन ला मार्गदर्शन करत होता.
दुपारी ४ च्या सुमारस मॅटकॅफ ला बंडखोर सैनीकांच्या हालचालींचा स्पष्ट सुगावा लागला ४ तोफा निमच कारावान सराय ( तात्पुरते निवासस्थान) मधे होत्या तर इतर होत्या ९ तोफा पालम आणि सराय च्या दरम्यान होत्या. निकोल्सन ने त्याचे सैन्य दोन भागात विभागले एका तुकडी चे नेतृत्व करीत त्यानी नजफगडवर हल्ला चढवला अवघ्या २० यार्डावरून त्याने भारतीय सैन्यावर तोफांचा भडीमार केला बख्त खानाचे बराच प्रतीकार केला यात ब्रीटीश सैन्याचे कित्येक सैनीक घायाळझाले एकअधिकारी मृयुत्युमुखी पडला. पण बख्त खान निकोलसनची आगेकूच थांबवु शकला नाही. भारतीय सैनीकाना ( बंडखोराना) माघार घ्यावी लागली . बख्त खानाच्या सगळ्या तोफा ब्रीटीशांच्या हातात पडल्या.
उपासमार पाउस आणि सैन्यातील बेदीली ( बख्त खानाला सेनापती मानायला हिंदू सैनीक तयार नव्हते) या मुळे स्वातन्त्र्य लढा देणार्‍या सैन्याला हार पत्करावी लागली होती. त्यांचे मनोधैर्य अधीकच खचले.
१८५७ च्या दिल्लीच्या लढाईत नजफगडची लढाई हा ब्रीटीश सैन्याचा पहीला मोठा विजय होता. या मुळे ब्रीटीशांचे मनोधैर्य उंचावले गेले.
3
( तोफ गोळ्यांच्या मार्‍यामुळे उध्वस्त झालेले काश्मिरी गेट आणि त्याची तटबंदी ( चित्र आं.जा वरून) १८५८
(क्रमशः )

१८५७ अ हेरीटेज वॉक (२)

हा माउन्ट स्टुअर्ट एल्फिन्स्टन वल्लीच होता. तो खरेतर एक स्कॉटीश व्यापारी होता.
इस्ट इंडीया कंपनीशी संबन्ध आल्यानंतर तो मुंबई इलाख्याचा गव्हर्नर बनला.एत्याचा पुतण्या लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन देखील मुम्बईचा गव्हर्नर झाला.( त्याच्याच नावे मुम्बईतले इल्फिन्स्टन रोड स्टेशन आहे) एल्फिन्स्टन सर्कल ( सध्याचे हर्निमान सर्कल) हे सुद्धा याच्याच नावाचे
भारतातील नेटीवाना शिकवण्यासाठी केलेल्या ब्रीटीश शिक्षण पद्धतीचा जो पाया मानला जातो त्या एल्फिन्स्टन कोड चा जनक हा माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन कॉलेजला याचेच नाव दिले गेलेले आहे.
मुम्बैच्या मलबार हील वर बांधला गेलेला पहीला बंगला या माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टनचा होता. त्या नंतर तिथे बर्‍याच इंग्रज अधिकार्‍यानी बंगले बांधले.आणि मलबार हील हे एक प्रतिष्ठीत ठिकाण बनले.
सातार्‍याची गादी दत्तक विधानाच्या प्रश्नावरून इस्ट इंडीया कंपनीने खालसा करायचे ठरवले. त्या वेळच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजाना अजिंक्यातार्‍यावर कैदेत ठेवण्यात आले.
छत्रपतिंची बाजू ब्रिटीश पार्लमेंट मध्ये मांडावी म्हणून रंगो बापुजी गुप्ते इंग्लंडला देखील जावून आले.
पण तेथे त्यांचे काहीच चालले नाही.
१८५७ च्या बंडाची बीजे या घटनेत रुजली गेली. रंगो बापुजी गुप्तेनी दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव नानासाहेब आनि तात्या टोपे यांची गाठ घेवून एक सशस्त्र सेना बांधण्याचा घात घातला. सातारा सांगली बेळगावकोल्हापूर भागातून तरुणांची भरती देखील सुरू केली. पण ब्रीटीशाना तो बेत कळाला . भरती केलेल्या पैकी बरेचसे तरूण ब्रीटीशानी पकडून ठार केले. रंगो बापुजी गुप्ते ठाण्याला जांभळी नाक्यावर
( रंगो बापुजी गुप्ते चौक) एका लग्नाला येणार आहेत हे कंपनी सरकारला कळाले . त्यानी पोलीस पाठवले . रंगो बापुजी तेथून वेशांतर करून पळाले त्या घटने नंतर ते कोणालाच दिसले नाहीत. कंपनी सरकार कडे या घटनेची नोंद आहे Missing July 5, 1857
सती प्रथा बंद करणे संस्थाने खालसा करणे इस्ट इंडीया कंपनी बद्दल भारतीयांच्या मनात आकस होताच.
२९ मार्च १८५७ मीरतला झालेल्या मंगल पांडेने त्याच्या अधिकार्‍यावर हल्ला केला. मंगल पांडेवर खटला दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली १८ एप्रील ला ठरवलेली फाशी कंपनी सरकारने १० दिवस अगोदरच अमलात आणली. त्याचा सहकारी जमादार इश्वरी प्रसाद ला २२ एप्रील ला फाशी दिली.
आग्रा अंबाला अलाहाबाद मीरत येथे कंपनी सरकारचे फार मोठे सैनीक तळ होते. २४ एप्रीलला लेफ्टन्ट कर्नल जॉर्ज कार्मिशेल स्मिथ ने त्याला पलटणीला फायर ड्रील ची आज्ञा दिली. सैनीकांच्या मनात काडतुसांत वापरल्या जाणार्‍या चरबीवरून असंतोष खदखदत होता. ९० पैकी ८५ जणानी फायर ड्रील करण्यास नकार दिला.
त्या सर्वांचे कोर्टमार्शल केले गेले त्या सर्वाना १० वर्षाचा कारावास ठोठावला गेला. सैनीक तळावरील सर्वांसमोर त्यांचे गणवेश उतरवले गेले. जेल मध्ये जाताना त्या ८५ सैनीकानी इतर सर्वांच्या बघेपणाबद्दल निषेध केला मीरत शहरात अशांतता पसरली .दुसर्‍या दिवशी गावात काही ठीकाणी जाळपोळ झाली काही सैनीकानी कैदेतील सैनीकाना बळाचा वापर करून सोडवण्याचा कट रचला जातोय अशी माहिती ब्रीटीश अधिकार्‍याना दिली पण त्यानी त्याकडे दुर्लक्ष्य केले. रवीवार असल्याने बरेचसे अधिकारी साप्ताहीक सुट्टीवर होते. संध्याकाळी सैनीक बंड करून उठले. त्याना शांत करण्यासाठी म्हणून केलेल्या गोळीबारात कंपनी सरकारचे स्वतःचेच लोक मारले गेले.
जमावाने संध्याकाळी बाजारात सुट्टीवर असलेल्या काही अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात पन्नास लोक ठार झाले.
मीरत त्यानंतर शांत झालेच नाही. १० मे च्या दिवशी धनसिंग कोतवालाने कैदी सैनीकांना सोडवण्यासाठी जेलचे दरवाजे खुले केले. त्या ८५ सैनीकांसोबतच जवळ जवळ ८०० कैदी पसार झाले.
कंपनी सरकारचा अधिकारी मेजर जनरल हेवीट हा म्हातारा आणिआजारी होता.त्याने स्वतःच्या सैनीकाना काहीच आज्ञा दिल्या नाहीत. सैनीक कसेबसे स्वतःचे रक्षण करू शकले.
दुसर्‍या दिवशी बंडखोर सैनीकांचा बीमोड करायला आलेल्या सैनीकाना आढळले की बंडखोर सैनीकाने दिल्लीच्या दिशेने कुच केले आहे.
११ मे ला बंडखोर सैनीकांची पहिली तुकडी दिल्लीला पोहोचली. त्यानी दिलीच्या किल्ल्यात प्रवेश केला ८२ वर्षाच्या बहादूर शहा जफरला खिडकीतून हाक मारली आणि बंडाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. बादशहा ने साधे शिपाईगडी म्हणून त्यांना फारसे महत्व दिले नाही.पण राजवाड्यातील काहीनी बंडाला पाठिंबा दिला. दुपारपर्यन्त बंडाची बातमी शाजहानाबाद शहरभर ( शहाजहानाबाद : लाल किल्ला + आसपासचा परीसर) )पसरली.
दुपारी चंदरवाल मधील काही गुज्जरानी कम्पनी सरकरच्या सर न्यायाधीशांच्या घरावर हल्ला चढवला. ब्रीटीश तसेच स्थानीक ख्रिश्चन हे सुद्धा त्यांच्या रोषाचे रोख होते.
खरे तर त्याकाळी दिल्ली हे इस्ट इंडीया कंपनीचे तसे काही फारसे मोठे ठाणे नव्हते.मुघल बादशहा ची जी काही सत्ता उरली होती ती फक्त लाल किल्ला आणि त्या भोवतालच्या भिंतीच्या आत.
kashmiri gate
( लाल किल्ल्याच्या आतील शहरात जाण्यासाठी असलेले हे काश्मिरी गेट. आपण पहातोय ती किल्ल्याच्या आतील बाजू. बंडखोर या बाजूला होते पलीकडील बाजूस कम्पनी सरकारचे सैन्य होते. लढाई जवळजवळ जून १८५७ ते सप्टेंबर १८५७ अशी चार महिने चालली होती)
kashmiri gate2
कंपनी सरकारचा कारभार मुख्यतः कलकत्त्याहून चालायचा. दिल्लीत कंपनी सरकारच्या फक्त ३ पलटणी ( रेजीमेन्ट्स) होत्या. त्या देखील उत्तरेकडच्या कश्मिरी गेट जवळ. कंपनी सरकारच्या गार्ड्स नी हे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यन्त उशीर झाल होता.
दुपारी शहरात एक मोठा स्फोट होऊन आगडोम्ब उसळला. कंपनी सरकारचा मॅगझीन डेपो ( बारूद खाना) जेथे होता तेथील अधिकार्‍यानी आपला प्रतीकार अपूरा पडतो आहे हे जाणवल्यानंतर दारुगोळा बंडखोर सैनीकांच्या हाती पडू नये म्हणून जिवाची जोखीम असतानाही दारूखान्याला आग लावून दिली होती.
barud khana
( हाच तो दारुखाना . कंपनी सरकारने त्या वेळेस असणार्‍या अधिकार्‍यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले आहे. वर दिसणार्‍या मोठ्या पाटीवर अ८५७ सालच्या घटनेचा उल्लेख "बंड" असा आहे.भारत सरकारने त्याखाली एक छोटी करेक्षन नोट लावून त्यात भारत आणि पाकिस्तान सरकारानी या बंडाला स्वातन्त्र लढा म्हंटल्याचे त्यात नमूद केलेले आहे. पण मूळ लेख असलेली पाटी तशीच ठेवली आहे हे विशेष)
नंतर जवळजवळ ३००० बॅरल गनपावडर चा साठा असलेले एक मॅगझीन सैनीकांच्या हाती लागले. तेसुद्धा फारसा प्रतीकार न होताच. आता पर्यन्त विना नेतृत्व उठाव करणार्‍या बंडखोर सैनीकांची ही मोठी सरशी होती.
१२ मे ला बहादूरशहा लाल किल्ल्यात बर्‍याच वर्षानी दरबार भरवला . इतिहासकार विल्यम दालरिंपल लिहीतो की त्या वेळेस बहुतांशी इस्ट इंडीया कंपनीच्या सेनेतून पळून गेलेले बरेचसे सैनीकच त्या दरबारात हजर होते. त्यानी बहादुरशहा जफरला अगदीच घरगुती वागणूक दिली. काहिनी तर त्याला फारसा मानही दिला नाही. ( विल्यम डालरिंपल लिहितो की त्यावेळेस बहादुरशहा जफरचे वय ८१ वर्ष होते) बहादूरशहा दिल्लीत चाललेली लुटालूट फारशी पसंत नव्हती .त्याने या दरबारात बंडाला जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा केली. १६ मे रोजी बंडखोर सैनीक आणि लालकिल्ल्यातील नोकरानी ५२ युरोपीय लोकांना पकडून आणले .बहादूरशहाचा विरोध असतानाही त्या सर्वाना लालकिल्ल्यातील एका पिंपळाच्या झाडाला लटकावून फासावर चढवण्यात आले.
दिल्ली आणि शहराची परिस्थिती फारच बिघडली होती.बहादूरशहा जफर ने बंडखोर सैन्याच्या सेनापतीपदी त्याचा मुलगा मिर्झा मुघल याची नेमणूक केली. मिर्झा मुघल ला लढाईचा काहीच अनुभव नव्हता. बंडखोर सैनीक त्याला मान देत नव्हते त्याचे हुकूम मानत नव्हते. सैनीक आपल्या रेजीमेन्टच्या अधिकार्‍या शिवाय इतर कोणाचेही हुकूम मानायला तयार नव्हते.या सगळ्या गोंधळात देखील मिर्झा मुघलने शहरात ( शहाजहानाबाद) परिस्थिती नियंत्रणाखाली आणायचा प्रयत्न केला. शराबाहेर गुज्जर लुटालुट करतच होते.एकूणच अनागोंदी कळसाला पोहोचली होती. दिल्ली काबीज झाली अशी बातमी सर्वत्र पसरली. बंडखोर चहुबाजूनी दिल्लीत येवू लागले.
ग्वाल्हेरच्या राजांचे बंधु हिंदुराव शिंद्यांचे दिल्लीत ब्रीटीश रेसीडेन्ट शी फारच मित्रत्वाचे संबन्ध होते. ब्रीटीशानी हिंदुरावांच्या वाड्याचा आश्रय घेवून तेथून लढा चालू ठेवला. त्यांचा वाडा म्हणजे किल्लाच बनला होता.
ब्रीटीशानी सैन्याची जमवाजमव सुरु केली. टेलीग्राफ मशीनचा या काळात फारच उपयोग झाला.
त्याचे स्मारक म्हणून कंपनी सरकारने जेथे टेलीग्राफचे ओफिस होते तेथे एक टेलीग्राफ मेमोरीयल बांधले आहे. त्यावरील शिलालेखात एक नोंद आहे The electric Telegraph that saved India
Telegraph Memorial (क्रमशः )

१८५७ अ हेरीटेज वॉक (1)

भारताच्या नव्या जन्माची ही कथा. खरेतर या कथेला सुरुवात होते ११ मार्च १६८९ पासून
मराठी साम्राज्याचा समूळ नायनाट करायचा निर्धार करून औरंगझेब महाराष्ट्रात उतरला खरा.पण त्याला ते तितकेसे जमले नाही ते त्याच्या अंगलटच आले. ११ मार्च ल औरंगझेबाने छ. संभाजी महराजाना हालहाल करून ठार मारले. छ. संभाजी महाराजांच्या मुलाला शाहू महाराजाना कैदेत ठेवले. चिडलेल्या मराठ्यांनी मग औरंगझेबाला स्थिर बसूच दिले नाही त्याला हर प्रकारे त्रास देणे सुरू केले. सन १६९७ सालात छ. राजाराम महाराजानी तह करण्याचा प्रयत्न केला पण तो औरंगझेबाने धुडकावून लावला.
इस १७०७ मध्ये औरंगझेब मरण पावला त्या नंतर त्याच्या वंशजांच्यात मुघल राजवटीच्या वारसांमध्ये राजा होण्याची चुरस सुरु झाली.
औरंगझेबाने भारताचा बराचसा मोठा भूभाग एकछत्री करभाराखाली आणला होता.
आज ज्याला आपण अफगाणीस्तान , पाकिस्तान , बंगलादेश आणि भारत म्हणून ओळखतो या सर्व भूभागावर औरंगझेबाचे साम्राज्य पसरले होते. औरंगझेबाने पसरवलेले हे एवढे मोठे साम्राज्य कोण पेलणार हा एक प्रश्नच होता.त्याच्या मुलांच्यात ना त्याच्या एवढी बुद्धीमत्ता होती ना कुवत.
साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली चिरडून जाऊ लागले.
मराठ्यानी छ. शाहु महाराजाना स्वतन्त्र केले आणि मराठे आणी दिल्लीच्या गादीची मराठा सत्तेची थेट वैर यात्रा अल्पकाळ तरी थांबली.
वयाच्या८९ व्या वर्षी सतत ४८ वर्षे एकछत्री सत्ता उपभोगून औरंगझेब गेल्यानन्तर मुघलसाम्राज्याचा मात्र झपाट्याने अस्त होऊ लागला. दिल्लीच्या सिंहासनावर बादशहा अक्षरशः ये जा करू लागले. कोणीतरी यावे गादीवर बसावे आणि कपटाने दुसर्‍याने त्याचा काटा काढत स्वतःला राजा म्हणून घोषीत करावे हा नित्य परीपाठ झाला. मुहम्मद रंगीला असा ज्याचा उल्लेख होतो तो मुहम्मद शाह सतत कोणा ना कोणा कडुन हरतच होता . १७३९ मधे नादीर शहा दुर्राणी ने तर कळसच गाठला . मुहम्मद रंगील्याने दिल्ली दरावाज्याच्या किल्ल्या स्वतः होऊन नादीरशहा च्या ताब्यात दिल्या नादीरशा दिल्लीत घुसला त्याने दिल्ली अक्षरशः कफल्लक केली . पाहुणा म्हणून राहिला आणि जाताना दिल्लीतील ३३ हजार लोकांचे शिरकाण करत मयूर सिंहासन ,कोहीनुर हीरा ,दर्या ई नूर हीरा अशी बरीच मोठी लुट घेवुन गेला . मुहम्मद रंगील्या बद्दल लोकांच्या मनात इतका तिरस्कार होता की त्याच्या नर्तकी असलेल्या बायकोने बांधलेल्या मशीदीला लोक "रंडी की मस्जीद" म्हणून सम्बोधत.
मुघलांचे अफगाणीस्थान पासून बंगाल पर्यन्त पसरलेले राज्य आकसत जाऊन अवघ्या लाल किल्ल्याच्या भिंतीत सिमीत झाले. १६९७ साली काबूल पासून कलकत्त्या पर्यन्तच्या २४ मुलुखातून एकुण ३८,६२४,६८० इतक्या पौंडाचा महसूल गोळा करणारे साम्राज्य अक्षरशः भिकेला लागले.
१७६५ सालच्या बक्सरच्या लढाईनंतर तर तात्कालीन बादशहा शाह आलम ने इस्ट इंडीया कंपनी बंगाल बिहार आणि ओरीसा बरेच काही गमावले. लॉर्ड क्लाईव्हने मुघल साम्राज्याची नाणी देखील इस्ट इंडीया कंपनी ठरवू लागली. हिंदुस्थानात कंपनी सरकारचे बस्तान व्यवास्थीत बसवले.
छ शाहु महाराजानी पेशव्याना पंतप्रधान केले त्यांच्या निधना नंतर छ रामराजानी नाममात्र राजा रहाणे पसंत केले आणि राज्यकारभार पुर्णपणे पेशव्यांच्या स्वाधीन केला.
१७६१ च्या पानिपतच्या युद्धा नंतर मराठेशाही काही काळ दुर्बळ झाली मात्र माधवराव पेशव्यानी मराठा साम्राज्याला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवले.
पण त्यंच्या निधना नंतर मराठा साम्राज्याने एक द्रष्टा गमावला.
पेशवे शूर होते पण अंतर्गत कलहांमुळे पेशवाई देखील दुबळी होत गेली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात तर राज्य कारभार इतरांच्या हाती गेला.
त्या नंतर गादीवर आलेला पेशवा दुसरा बाजीराव हा तर पळपुटा बाजीराव म्हणूनच इतिहासात ओळखला जातो. अटकेपर्यन्त झेंडे फडकवणार्‍या पेशव्याना पुण्याहून पळून जायची वेळ आली.
अहमदनगरच्या तहानंतर तर पेशव्यांचे सत्ता जवळजवळ संपुष्टात आली.
१८१८ साली खडकी आणिकोरेगावच्या लढाईनंतर तर पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली.
इस्ट इंडीया कंपनीने पेशव्यांची रवानगी कानपूरजवळील बिठूर नावाच्या एका खेड्यात केली.
 माउन्ट स्टुअर्ट एल्स्फिन्टनने सातार्‍याच्या गादीवर छ.प्रतापसिंहांना बसवले. दत्तक वारसाच्या प्रश्नावरून १८४९ सातार्‍याची गादी खालसा देखील केली.
एका व्यापारी कंपनीची ,इस्ट इंडीया कंपनीची भारताच्या विशाल भूभागावर सत्ता प्रस्थापित झाली