Thursday 19 January 2012

रौशनी

बी रोमन इन रोम असे कुणीसे म्हंटले आहे. त्याचा अर्थ प्रत्येकजण आपआपल्या मकदुराप्रमाणे घेतो.माझ्या पुरता तरी तो आपले गाव सोडले की थोडे शिष्ठाचार बाजुला ठेवुन द्यावे. थोडे मोकळेढाकळे वागावे असा आहे. नव्या गावात जेथे कोणी आपल्याला ओळखत नाही तिथे थोडे वेगळे कपडे वापरले नेहमीचा कपड्यातला ईस्त्रीचा कडकपणा बाजुला ठेवुन झब्बा सलवार सारखा मोकळेपणा वागण्यात येतोच. अन्यथा एरव्ही अंबाडा दोनवेण्या तेल लावुन चापुनचोपुन असणारी काकुबाई हिल स्टेशनला जीन्स घालुन बागडताना दिसली नसती. ही सगळी गणीते पुण्याला लागु होत नाहीत. पुण्यात कोठे कोण ओळखीचे निघेल ते सांगता नाही असाच एकदा पुण्याला काही कामानिमित्त गेलो होतो. काम झाले होते त्यामुळे त्या टेन्शन्मधुन मोकळाझालो होतो. बादशाही मेसाला पुन्हा एकदा बरेच वर्षानी भेट दिली इतक्या वर्षानन्तरही तीच चव होती.त्या चवी वरुन ब-याच आठवणीजाग्या झाल्या. कॊलेजचे फ़ुलपाखरी दिवस आठवले. मित्र मैत्रीणी आठवल्या .मन पुन्हा मागे गेले आणि त्याच मूड मधे बाहेर आलो. टिळक रोडवरुन सहज चक्कर मारुया म्हणुन चालत्च स प कॊलेजच्या दिशेने निघालो. समोरुन एक प्रसन्न चेहे-यांचा ताटवा किलबिलत येत होता. आपल्या वेळेत आणि आत्ता नक्की काय फ़रक झाल आहे ते न्याहळत बसलो. काय दिसतात ना या मुली... स्मार्ट... कॊन्फ़िडन्ट. एक दहा एक वर्षे उशीरा जन्मायला यायला हवे होते.असे उगीचच वाटुन गेले.एवढ्यात समोरुन एक तरतरीत चेहे-याची मुलगी आली.जीन्स टी शर्ट,एकदम मॊडर्न कॊन्फ़िडन्ट लूक; माझ्याकडे बघुन हसली. डोळ्यात ओळखीचे भाव. ते हसणे आपल्यासाठी नक्कीच नसेल. उगाच मोरु व्हायला नको म्हणुन मी मागे वळुन पाहीले. माझ्या मागे कोणीच नव्हते. मी आजुबाजुला पाहीले. बाकीचे येणारे जाणरे त्यांच्या तन्द्रीत होते. ती मुलगी पुन्हा हसली. मी पुन्हा आजुबाजुला पाहिले. ती आता माझ्याच दिशेने येत होती. मी आता थोडा गोंधळ्लो. "नमस्कार सर ओळखलेत मला?
मी कसनुसा हसलो. मी पूर्वी कॊम्प्युटर नेटवर्किंग शिकवायचो त्यावेळची कोणी विद्यार्थिनी असावी अन्यथा सर कशाला म्हणेल.चेहेरा आता थोडा ओळखीचा वाटु लागला. पण अजुन पुरती ओळख लागत नव्हती. मी थोडेसे खजीलसे होऊनच म्हणालो थोडेसे ओळखले पण नक्की नाव काय ते विसरलो
ती पुन्हा छानसे हसली आणि म्हणाली "सर विल यू बी माय स्पेन्सर"
त्या एका वाक्याने एकदम डोक्यात ट्यूब पेटली. अरे ..रौशनी तूम ? काय करते आहेस ? कशी आहेस ? काय चाललेय सध्या ? आणि पुण्यात केंव्हा पासुन आहेस? बरीच बदललीस ग.
त्यावर ती खळखळुन मोकळे हसली. हो सर बरीच बदलले. पण तुमच्यात जराही बदल नाही.
त्या वाक्याने माझे मन पाच एक वर्ष मागे गेले. त्यावेळी मी कॊम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग चे क्लासेस घ्यायचो. कॊलेजेस मध्ये मुलाना नवे करीअर चे नवे ऒप्शनस काय आहेत याची माहिती द्यायचो. निमशहरी ग्रामीण भागातील विद्यार्थाना बहुतेक वेळा नव्या सन्धी काय असतात तेच माहित नसते, त्या साठी काय शिकायचे ,नवे तंत्रद्न्यान कोठे शिकायला मिळेल तेच कळत नसते. त्यामुळे सरधोपट शिक्षणाकडेच त्यांचा कल असतो. नव्या शिक्षणा बद्दल कळाले तरी त्यासाठी शहरात जाउन रहाणे,कोर्सेस फ़ी हे सगळे परवडवण्या पलिकडचे असते.
इच्छा असुनही बुद्धीमत्ता असुनही ही मुले स्पर्धेत मागे पडतात. त्यातुन एक न्यूनगंड निर्माण होतो. मनात पक्का झालेला तो न्यूनगंड काढुन टाकणे साधे सोपेकाम नसते.
एका कॊलेजच्या प्रिन्सिपॊल नी मला ही गोष्ट सांगितली त्यांच्या मनात असे काही करता येते का यासाठी मला कॊलेज वर एक कार्यक्रम घेण्यास सांगितले. पॊझिटिव्ह थिंकिंग वर एक दीड तासाचा कार्यक्रम करायचा होता. मुलाना बोलते करणे त्यांच्या मनातले न्यून घालवण्यासाठी मी कुठेतरी वाचलेली पण एक सत्य गोष्ट सांगायचो. स्पेन्सर ची गोष्ट
शिक्षण घेतले तर केवळ स्वत:चेच नव्हे तर पुढच्या पिढ्यांचे आयुष्य कसे बदलते याची गोष्ट. जशी वाचली तशीच त्या कथा नायकाच्या तोंडुन जशी येईल त्या स्टाइल मधे सांगायचो......
आम्ही चौघे भावंडे ज्यावेळेस एकत्र जमतो तेंव्हा एकच विषय दरवेळेस निघतो. बाबाना तो माणुस भेटला नसता तर.
आम्ही चौघे भावन्डे दोन भाऊ दोन बहिणी चौघेही उत्तम शिकलेले दोघे भाऊ डॊक्टर मी कमर्शियल आर्टीस्ट तर धाकटी बहीण वकील चौघांची सांसारीक, आर्थिक स्थिती उत्तम
आमचे बाबा एक शेतमजुराच्या घरात जन्मलेले. त्याकाळी कापसाची शेती हा श्रीमन्तांचा मुख्य व्ययसाय होता. निग्रो गुलामांच्या काबाडकष्टावर धनदांडगे व्हायचे आणि निग्रोना मात्र एका वेळच्या अन्नासाठीही मोताद करायचे ही रीत होती. आमचे बाबा धरुन घरात आठ मुले.बाबा सर्वात धाकटे. गावात निग्रो मुलाना शिकवण्यासाठी साधारण दहावी पर्यन्त शिकत येईल इतपत एक शाळा होती. फ़ारशी मुले नसायचीच शाळेत.बहुतेक जण कोठेतरी शेतावर मजुरी करायला जायचे घर चालवायला हातभार लावायचे.माझी आजी; तिला आपल्या एकातरी मुलाने शिकावे असे वाटायचे. तीचे सारे आयुष्य शेतमजुरी करण्यात गेले.एका तरी मुलाने शिकावे असे तिला मनोमन वाटायचे. तिने बाबाना शिकवायचे असे ठरवले. निग्रो मुलगा शिकला म्हणजे वाया गेला अशी सगळ्या गावाची समजुत. बहुतेकानी आजीलातेच सांगितले. पण आजी त्याना बरोबर उत्तर द्यायची. ती म्हणायची माझी सात मुले शेतात राबतातच की एखादा मुलगा वाया गेला असे समजु त्यात काय.तिच्या या असल्या बोलण्यापुढे लोक हारायचे.
गावात क्वीन नावाच्या एका श्रीमन्त बाईची शेती होती. बहुतेक गावकरी तिच्याच शेतात मजुरीला जायचे. बाबा आठवी पास झाले.मुलाला शेतावर कामाला पाठवा त्याला शिकवुन वाया कशाला घालवता म्हणुन क्वीन बाईचा आजोबाना सांगावा आला. आजोबा तयारही झाले.पण आजी खमकी तिने साफ़ सांगितले की मी या मुलाला शिकवणारच.जाउदे वाया गेला तर. आजीच्या आग्रहापुढे आजोबा नरमले. बाबा दहावी पास झाले. यापुढे शिकायची गावात सोय नव्हती. आजी ने बाबांच्या हातात एक कापडाची पुरचुंडी ठेवली म्हणाली मी माझ्या मजुरीच्या पैशातुन साठवलेली ही रक्कम घे ही मुला शहरात जा चांगल्या शाळेत नाव घाल शीक मोठा हो.
बाबा शहरात आले. शिकण्यासाठे शाळेत नाव घातले.आजीने त्यांना दिलेली ती शेतमजुरी करुन साठवलेली ती पुरचुंडी तरी कितीशी पुरणार? लौकरच संपली. बाबानी एक छोटी मोठी कामे करुन शिक्षन चालु ठेवले. निग्रो मुलाना नोकरी तरी कसली मिळणार. रात्री काम आणि दिवसा शिक्षण.....बाबाना रात्री लोकांच्या घरातले हीटर नीट चालु रहावे हे बघण्याचे काम मिळाले होते. लोकाना उबदार घरात छान झोप मिळावी म्हणुन बाबा रात्री कोळसाफ़ोडुन लोकांच्याघरातले फ़ायर प्लेस नीट रहावे म्हणुन जागुन हाडे फ़ोडणा-या थंडीत रस्त्यावरुन फ़िरावे लागत असे.
सततचे झोपाळु डोळे आणि वर्गात पेंगत असणारा हा मुलगा सर्वाना चेष्टेचा विषय होता,.अधुन मधुन हातातली पुस्तकही झोपेमुळे बाकावरुन खाली पडायची
बारावी झाली पुढचे शिक्षण कठीण. प्रवेश घायला पैसे नाहीत.आता काय करायचे बाबांपुढे हा मोठा प्रश्न होता.आता पुन्हा आलो तेथे जायचे शिक्षणाला रामराम ठोकुन मिळेल ते काम पत्करायचे.हा विचार करतच बाबा शिक्षण संस्थेच्या ऒफ़ीसमधे पोहोचले. ऒफ़ीसच्या नोटीसबोर्डवर त्याना एक जहिरात दिसली. "सूट्टीच्या कालावधीसाठी रेल्वे मध्ये नाईट अटेन्डन्ट हवे आहेत. ईच्छुकानी अर्ज भरावेत अशी काहिशी एक नोटीस बोर्डावर लावली होती. बाबानी त्या साठी अर्ज केला. त्याना ती नोकरी मिळाली.
रात्री प्रवास करण्या-या रेल्वे प्रवाशाना काय हवे नको ते बघायचे त्यांची सोय करायची असे ते कामाचे स्वरुप होते.
एकदा रात्री बाबा ते काम आटोपुन त्यांच्या नेहमीच्या दरवाजाजवळच्या झोपण्याच्या जागेवर झोपायच्या तयारीत होते तेव्हड्यात त्यांच्याजवळ एक गोरा माणुस आला. त्याच्या बायकोला खोकल्याची ढास लागली होती. त्याला दूध गरम करुन हवे होते. बाबानी तातडीने हीटरवर दूध गरम करुन त्या माणसाच्या कम्पार्टमेन्ट कधे नेउन दिले.थोड्या वेळाने तो गोरा माणुस बाबांच्या झोपायच्या जागेजवळ आला. त्याने बाबांना काय करतोस कुठे असतोस अशी विचारपूस केली. ज्या काळी गो-या माणसाशी बोलताना होय साहेब किंवा धन्यवाद मॆडम या व्यतिरिक्त निग्रोंचे बोलणे व्हायचे नाही त्या काळात हे असे वागणे म्हणजे अप्रुपच होते.
जाताना त्या माणसाने आख्खी पाच डॊलरची नोट टीप म्हणुन बाबांच्या हातावर टेकवली. गाढवा...मूर्ख या उपाधी शिवाय दुसरे काहीच पदरी न पडण्याच्या काळात पाच डॊलर ची टीप म्हणजे खूपच काहितरी जगावेगळे होते. ती त्याने चुकून दिली असेल असेच बाबाना वाटले.
ती सुट्टी संपली अधुन मधुन मिळालेली थोडीफ़ार टीप आणि दोन महिन्यांचा पगार मिळुन बाबांजवळ थोडे पैसे जमले होते कॊलेजची एक सेमिस्टर तरी निदान पूर्णवेळ अभ्यासावर लक्ष्य़ देउन अभ्यास करावा असे बाबाना खूप वाटायचे.या वेळी ते शक्य होईल असे वाटत होते . बाबानी घरी न जाता कॊलेजमधे शिकायचे ठरवले. ऎडमिशनचा फ़ॊर्म भरला. आणि घरी आले दुस-या दिवशी कॊलेज मधे गेल्यावर बाबाना वर्गात कॊलेजचा शिपाई बोलवायला आला. प्रिन्सीपॊल ने बोलावणे धाडले होते. बाबा प्रिन्सीपॊलकडे गेले. प्रिन्सीपॊलने बाबाना विचारले " तुम्ही र्सुट्टीत रेल्वे चा जॊब करत होतात?"
."हो"
"तिथे तुम्हाला कोणी स्पेन्सर नावाचे गृहस्थ भेटले होते?" बाबाना आठवत नव्हते कोण स्पेन्सर " नीट आठवुन बघा स्पेन्सर....तुम्हाला पूर्ण पाच डोलर्स ज्यानी टीप म्हणुन तुम्हाला दिली होती"
बाबाना आता ते स्पेन्सर नावाच गृहस्थ पूर्ण आठवले त्याना विसरणे शक्यच नव्हते.त्यानी प्रिन्सिपॊल ना काय सांगितले होते कोणास ठाउक "ते पाच बहुतेक डॊलर परत तर नसतील हवे त्याना ? बाबांच्या डोक्यात सत्तर विचार एकाच वेळेस येउन गेले. "हो सांगावे की सरळ नाही म्हणावे"
"हो... हो भेटले होते. त्यांचे काय ". बाबानी चाचरतच म्हंटले.
त्यानी तुमची कॊलेजची दोन वर्षाची पूर्ण फ़ी भरलीआहे" तुम्ही जाऊ शकता.
बाबाना नक्की काय प्रतिक्रिया द्यावी तेच उमजत नव्हते.
बाबा शिकले ते एक उत्तम वकील झाली लग्नानंतर आम्हा चार भावन्डांचा जन्म झाला. आमची उत्तम शिक्षणे झाली दोघेही भाऊ डॊक्टर मी कमर्शियल आर्टीस्ट तर धाकटी बहीण वकील.
आम्ही चौघेही जेंव्हा एकत्र भेटतो तेंव्हा आमच्या बोलण्यात अएकच विषय असतो.
बाबाना तो माणुस भेटला नसता तर?...आपणही कुठेतरी आज शेतमजुरी करत बसलो असतो...............................

मी सांगितलेली ही गोष्ट मुलाना नेहमीच आवडायची . ईच्छा असेल तर मार्ग मिळतो मदत मिळतेच. ही आशा मनात जागवुन त्यांना नवे विचार करायला प्रवृत्त करायचे हा माझा उद्देश.तो कार्यक्रम आटोपुन मी कॊलेज मधुन बाहेर पडलो.
दुसरे दिवशी ऒफ़ीसमधे गेलो एक काळीसावळी पण तरतरीत चेहे-याची मुलगी माझी वाट पहात होती.
केबीन मधे आल्यावर मी विचारले काय काम आहे.
"सर विल यु बी माय स्पेन्सर?
मला कळेना ती नक्की काय म्हणते आहे.
सर काल तुम्ही ती स्पेन्सर ची गोष्ट सांगितली. मला खूप शिकायचे आहे.
मी तुम्हाला विचारते... विल यु बी माय स्पेन्सर? त्या पोरीच्या डोळ्यात काही वेगळेच भाव होते. स्वप्नाळुपणा ,एक विश्वास, आशा आणि कसलीशी चमक होती.
तीचे वडील एका करखान्यात कॆज्युअल लेबर म्हणुन काम करत होते. तीन भावन्डे ही सगळ्यात मोठी. खूप शिकायचे काहितरी व्हायचे हे स्वप्न. नवे शिक्षण घेउन उत्तम नोकरी मिळेल हे माहित होते पण शिकण्यासाठी पैसे लागतात. वडीलांच्या पगारात काय होऊ शकते हे तिला माहीत होते.
ती बी एस सी करत होती. आपण चांगले शिकावे ब-यापैकी नोकरी मिळवावी आणि भावंडांना पण शिकवावे.असे काहिसे तिचे स्वप्न होते.
कोर्सेस्ची फ़ी कमी करणे माझ्या हातात नव्हते पण संस्था चालकाना सांगुन फ़ी थोड्या थोड्या थोड्या हप्त्यात भरण्याची सवलत द्या किंव्हा सहकारी पतसंस्था मधुन शिक्षणासाठी कर्ज मिळवुन द्या म्हणुन मी सांगु शकत होतो.मी त्याबद्दल तिला सांगितले. ती दुसरे दिवशी वडिलाना घेउन आली. त्या संस्थाचालकाने फ़ी हप्त्याहप्त्यात घेण्याची तयारी दाखवली.
फ़ीचा एखाद दुसरा हप्ता मागे पुढे व्हायचा. पण तिने शिक्षण पूर्ण केले. त्या नन्तर ती मला पुन्हा भेटली नाही.
कधितरी स्पेन्सर ची गोष्ट कुठे सांगितली की मला रौशनी ची आठवण यायची. काय करत असेल कुठे असेल की तिचे लग्न होऊन कुठेतरी अडाणी घरात चूल मूल करत असेल ?
तिच्या त्या "विल यू बी माय स्पेन्सर " या वाक्याचे कधितरी हसु ही यायचे
ती रौशनी मला अचानक ध्यानीमनीही नसताना भेटली.रौशनी आता पूर्ण बदलली होती तिचे रुपडे पालटले होते. तेंव्हाची लाजळु अबोल रौशनी;आता तिचा मागमुसही नव्हता.चेहे-यावर एक आत्मविश्वास झळकत होता.
काय ग कुठे असतेस अन अशी गायब कशी झाली होतीस.
सर मी बी एस सी झाले आणि त्या कोर्स च्या मुले मला एक जॊब ऒफ़र आली.चाकणला एका  कम्पनीत नेटवक्र ऎडमिनिस्ट्रेटर म्हणुन काम करते सध्या मी.
एकदा सुट्टी घेउन मी तुम्हाला भेटायला यायचे ठरवले पण काहि ना काही गोष्टीनी ते लांबतच गेले.
माझे वडील आता रीटायर झाले. आम्ही सगळे आता पुण्यात रहातो.दोन्ही भावाना डिप्लोमाला ऎडमिशन मिळाली.त्यांचे सगळे मीच बघते.हे सांगताना तिच्या सांगताना आपण काही विषेश केले आहे ,सगळ्या घराला रौशन केले आहे हे तिच्या ध्यानीमनी ही नव्हते.
रौशनी पूर्ण बदलली नव्हती तिच्या मनातले सूप्त अंकुर आता पालवले होते.
यात मी काय केले होते फ़क्त तिला एक संधी मिळावी म्हणुन प्रयत्न माझ्याकडुन झाले असतील एवढेच. पण तोही माझ्या व्ययसायाचाच एक भाग होता.
कधीतरी कोणत्यातरी कार्यक्रमात मी अजुनही स्पेन्सर ची ती गोष्ट सांगतो पण आता रौशनीच्या गोष्टीसह.
कोणाच्या मनातला स्पेन्सर जागाही होत असेल कदाचित त्यामुळे. एखा्द्या रौशनीला सगळ्या घराला रौशन करायला मिळत असेल

Monday 16 January 2012

उमजत नाही

मित्रानो हे मी इथे का लिहितोय कोणं जाणे.
नक्की काय वाटते हे शब्दात सांगणे अवघड आहे. कदाचित मिडलएज क्रायसीस की काय असू शकेल.
साला माझ्या जनरेशनची ही जनरल गोची आहे. जे व्हायचे असते ते कधी होता आले नाही. जे झालो आहोत ते जस्टीफाय करत येत नाही. वयाच्या चाळीशी उलटली की हे हिशोब सुचायला लागतात. भाषेचा अभ्यास करायचा होता पण आइवडीलांनी जबरदस्तीने इंजीनिअरिंग करायला लावले. माझ्या फुटकळ विरोधाला दाद वगैरे काही द्यायची त्याना जाणीवच नसावी. आर्ट्स करून काय करणार आहेस बेकार पडलेल्या वकीलांच्या फौजेत आणखी एक भर.( जागेच्या केस मध्ये असलेल्या वकीलांचे मात्र कसा हुशार आहे म्हणून कौतूक ) नाहीतर उगाच कुठल्यातरी ढेकण्या कॉलेजमध्ये क्लॉक अवर वर मास्तरकी करत बसशील. भाषा वगैरे काय नंतर शिकता येईल. कर इंजीनिरिंग. ( स्वतः कधीकाळी आय आय टीत प्राध्यापक होते त्याचे जाम कौतूक) वगैरे वगैरे.
नाटक करायला जाम आवडायचे. बासरी /पेटी वाजवताना मजा यायची. नाटकात काम करायची झिंग यायची.
स्पर्धेत बक्षीसे मिळाली की आपण भलते ग्रेट आहोत हे कळाल्यामुळे ती रात्र अजिब्बात झोप यायची नाही.
एका वर्षी तर एकाच वेळेस दोन एकांकीका एक नाटक यात काम करत होतो. अधूनमधून आपण लिहीलेल्या एकंकीका कविता लोकाना भरपूर आवडतात हा सूखद धक्का बसायचा.
ते काही असो नाटक हा शब्द उच्चारला तरी घरी शिव्या या शिवाय काहीच ऐकायला मिळले नाही.
नाटकाबद्दल बोलणे हा गुन्हाच मानला होतां नाटक वगैरे काय आयुष्याला पुरणार आहे का. त्यापेक्षा चांगले शिकलास तर नोकरी मिळेल. तुझ्यासाठी कुठे शब्द टाकणार नाही.
रडतखडत धक्के खात इंजीनिरिंग पूर्ण केले. वडीलांच्या पुढे हा अभ्यासक्रम नको वगैरे बोलायची टाप नव्हती.
आपण नक्की काय करायचे आहे तेच विसरून गेलो. चार चौघांसारखी नोकरी पकडून पाहिली . प्रॉडक्षन शॉप वर मन रमायचे नाही.
लग्न झाले . पहिली काही वर्षे फुलपाखरी गेली.यथावकाश मुलेबाळे झाली. कधी नाटकाला गेलो तर इतिहास आठवायचा.
बरोबरची नाटकातली मित्र मंडळी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात स्थिरावली. काहीजणा लेख दिग्दर्शक वगैरे झाले आहेत. दोघेजण नित्यनेमाने सिरीयल्स चा रतीब पाडतात.
इंजीनिरींगची मित्र मंडळी त्यांच्या त्यांच्या नोकरीत रमली आहेत. बरेचजण परदेशी आहेत.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी कोणी कंपनी वगैरे सुरु करायचा संकल्प केलेला होता त्यांचे व्यवसाय आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतेक सगळेजण आर्थीक दृष्ट्या सद्धर आहेत.
वयाची तिशी स्थिरस्थावर नामक भ्रामक स्टेशन गाठण्याच्या घाईत संपली.
तिशी संपल्यावर कधितरी स्वतःला हा प्रश विचारला. मला जे हवे होते ते मिळाले का?
पैसे..........? अजून म्हणावे तेवढे स्थिरसावर नाही
घर.......... ? हप्ते जमवणे चालू आहे.
मुले..........? याची कधी खूप आवश्यकता आहे असे वाटलेच नाही. ( रजनीशांचे वाक्य आठवते.यू आर अ बायप्रॉडक्ट ऑफ युवर पेरेंट्स लस्ट)
सहचारीणी ........? पहीली काही वर्षे सहचारीणी होती... पण ती क्षणांची पत्नी आणि अनंतकाळची माता असते हे मुले झाल्या नंतर उमजते. तिच्यातली सहचारीणी आपण कुठे मारून टाकली हे कळालेच नाही.
कामातला आनंद..........? पाट्या टाकतोय. निर्मितीचा आनंद कधी जाणवलाच नाही.
हे सगळे हिशेब लावताना आयुश्याच्या या टप्प्यावर असताना एक वेगळाच एकाकीपणा जाणवतो. आपण फार कोणी नाही तर फक्त ओझ्याचे बैल आहोत याची पदोपदी जाणीव होते. हे ओझे अर्थातच आपणच निर्मिलेले.
इतकी वर्षे जगून काय केले तर काहीनाही. पुलंच्या अपूर्वा मध्ये एक वाक्य आहे "गड्या तू वंशाचा दिवा नाहीस तर फक्त दुवा आहेस " अर्थात ते करून तरी काय केले. कोण्या आदीमानवाने सुरू केलेला वंश पुढे चालूठेवला.
इतक्या वर्षात काहीही केले नाही. इतराना सोडा स्वतःला देखील कधी निर्मळ आनंद मिळेल असा प्रयत्न केला नाही.
इतरांसाठी सोडाच स्वतःसाठी ही कधी जगलो नाही. या पुढे जगता येईल याची शाश्वती नाही.
गाडील जुंपलेल्या बैलाला स्वतःची इच्छा असून काहीच उपयोग नसतो. पाठीवर फक्त फटकेच मिळतात. त्या फटक्याना भिऊन ओझे वहात चालत रहाणे हेच त्याच्या हातात असते.
जगण्यासारखे काही राहिले नाही आणि काही राहण्यासारखे कधी जगलो नाही ही त्याची स्वतः करून घेतलेली शोकांतीका असते.
आयुष्याचे हिशेब मांडायला आता भिती वाटते. नक्की कशासाठी जगतोय हेच उमजत नाही.
ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी कशासाठी मेलो हे उमजेल.