Monday 16 January 2012

उमजत नाही

मित्रानो हे मी इथे का लिहितोय कोणं जाणे.
नक्की काय वाटते हे शब्दात सांगणे अवघड आहे. कदाचित मिडलएज क्रायसीस की काय असू शकेल.
साला माझ्या जनरेशनची ही जनरल गोची आहे. जे व्हायचे असते ते कधी होता आले नाही. जे झालो आहोत ते जस्टीफाय करत येत नाही. वयाच्या चाळीशी उलटली की हे हिशोब सुचायला लागतात. भाषेचा अभ्यास करायचा होता पण आइवडीलांनी जबरदस्तीने इंजीनिअरिंग करायला लावले. माझ्या फुटकळ विरोधाला दाद वगैरे काही द्यायची त्याना जाणीवच नसावी. आर्ट्स करून काय करणार आहेस बेकार पडलेल्या वकीलांच्या फौजेत आणखी एक भर.( जागेच्या केस मध्ये असलेल्या वकीलांचे मात्र कसा हुशार आहे म्हणून कौतूक ) नाहीतर उगाच कुठल्यातरी ढेकण्या कॉलेजमध्ये क्लॉक अवर वर मास्तरकी करत बसशील. भाषा वगैरे काय नंतर शिकता येईल. कर इंजीनिरिंग. ( स्वतः कधीकाळी आय आय टीत प्राध्यापक होते त्याचे जाम कौतूक) वगैरे वगैरे.
नाटक करायला जाम आवडायचे. बासरी /पेटी वाजवताना मजा यायची. नाटकात काम करायची झिंग यायची.
स्पर्धेत बक्षीसे मिळाली की आपण भलते ग्रेट आहोत हे कळाल्यामुळे ती रात्र अजिब्बात झोप यायची नाही.
एका वर्षी तर एकाच वेळेस दोन एकांकीका एक नाटक यात काम करत होतो. अधूनमधून आपण लिहीलेल्या एकंकीका कविता लोकाना भरपूर आवडतात हा सूखद धक्का बसायचा.
ते काही असो नाटक हा शब्द उच्चारला तरी घरी शिव्या या शिवाय काहीच ऐकायला मिळले नाही.
नाटकाबद्दल बोलणे हा गुन्हाच मानला होतां नाटक वगैरे काय आयुष्याला पुरणार आहे का. त्यापेक्षा चांगले शिकलास तर नोकरी मिळेल. तुझ्यासाठी कुठे शब्द टाकणार नाही.
रडतखडत धक्के खात इंजीनिरिंग पूर्ण केले. वडीलांच्या पुढे हा अभ्यासक्रम नको वगैरे बोलायची टाप नव्हती.
आपण नक्की काय करायचे आहे तेच विसरून गेलो. चार चौघांसारखी नोकरी पकडून पाहिली . प्रॉडक्षन शॉप वर मन रमायचे नाही.
लग्न झाले . पहिली काही वर्षे फुलपाखरी गेली.यथावकाश मुलेबाळे झाली. कधी नाटकाला गेलो तर इतिहास आठवायचा.
बरोबरची नाटकातली मित्र मंडळी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात स्थिरावली. काहीजणा लेख दिग्दर्शक वगैरे झाले आहेत. दोघेजण नित्यनेमाने सिरीयल्स चा रतीब पाडतात.
इंजीनिरींगची मित्र मंडळी त्यांच्या त्यांच्या नोकरीत रमली आहेत. बरेचजण परदेशी आहेत.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी कोणी कंपनी वगैरे सुरु करायचा संकल्प केलेला होता त्यांचे व्यवसाय आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतेक सगळेजण आर्थीक दृष्ट्या सद्धर आहेत.
वयाची तिशी स्थिरस्थावर नामक भ्रामक स्टेशन गाठण्याच्या घाईत संपली.
तिशी संपल्यावर कधितरी स्वतःला हा प्रश विचारला. मला जे हवे होते ते मिळाले का?
पैसे..........? अजून म्हणावे तेवढे स्थिरसावर नाही
घर.......... ? हप्ते जमवणे चालू आहे.
मुले..........? याची कधी खूप आवश्यकता आहे असे वाटलेच नाही. ( रजनीशांचे वाक्य आठवते.यू आर अ बायप्रॉडक्ट ऑफ युवर पेरेंट्स लस्ट)
सहचारीणी ........? पहीली काही वर्षे सहचारीणी होती... पण ती क्षणांची पत्नी आणि अनंतकाळची माता असते हे मुले झाल्या नंतर उमजते. तिच्यातली सहचारीणी आपण कुठे मारून टाकली हे कळालेच नाही.
कामातला आनंद..........? पाट्या टाकतोय. निर्मितीचा आनंद कधी जाणवलाच नाही.
हे सगळे हिशेब लावताना आयुश्याच्या या टप्प्यावर असताना एक वेगळाच एकाकीपणा जाणवतो. आपण फार कोणी नाही तर फक्त ओझ्याचे बैल आहोत याची पदोपदी जाणीव होते. हे ओझे अर्थातच आपणच निर्मिलेले.
इतकी वर्षे जगून काय केले तर काहीनाही. पुलंच्या अपूर्वा मध्ये एक वाक्य आहे "गड्या तू वंशाचा दिवा नाहीस तर फक्त दुवा आहेस " अर्थात ते करून तरी काय केले. कोण्या आदीमानवाने सुरू केलेला वंश पुढे चालूठेवला.
इतक्या वर्षात काहीही केले नाही. इतराना सोडा स्वतःला देखील कधी निर्मळ आनंद मिळेल असा प्रयत्न केला नाही.
इतरांसाठी सोडाच स्वतःसाठी ही कधी जगलो नाही. या पुढे जगता येईल याची शाश्वती नाही.
गाडील जुंपलेल्या बैलाला स्वतःची इच्छा असून काहीच उपयोग नसतो. पाठीवर फक्त फटकेच मिळतात. त्या फटक्याना भिऊन ओझे वहात चालत रहाणे हेच त्याच्या हातात असते.
जगण्यासारखे काही राहिले नाही आणि काही राहण्यासारखे कधी जगलो नाही ही त्याची स्वतः करून घेतलेली शोकांतीका असते.
आयुष्याचे हिशेब मांडायला आता भिती वाटते. नक्की कशासाठी जगतोय हेच उमजत नाही.
ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी कशासाठी मेलो हे उमजेल.

1 comment:

  1. साहेब, मला वाटतय की खूपच नॅगेटीव्ह आहात आपल्या आयुष्या बद्दल. लिहील्याच्या बरोब्बर उलट विचार करुन पहा कधी, जगासी आल्याच्या आनंद कशाला म्हणतात ते त्यातून उमजेल.

    ReplyDelete