Saturday 21 May 2011

रूपक 1

एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत
झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच . माकड अशी एखादी संधी मिळते का पहायला एका उंच झाडावर जाऊन बसले.जंगलाचा सगळा परीसर त्या झाडावरुन दिसत होता.
एक संधी आणि आपले नाव सुवर्णाक्षरात......
माकड इकडे तिकडे पहात होते. तेवढ्यात त्याला एक सिंह; शिकार करून सावज खाऊन विश्रान्ती घेत झोपलेला दिसला. माकडाला आयती संधी मिळाली
झाडावरुन उतरुन ते तडक त्या झोपलेल्या सिंहाजवळ गेले. आणि माकडाने त्या झोपलेल्या सिंहाच्या कानाखाली एक जोरात वाजवली.
काहितरी करण्याच्या जोषात माकडाने सिंहाच्या कानाखाली वाजवली खरी पण नन्तर त्याला वस्तिस्थितीची जाणीव झाली. आपण काय करुन बसलो हे माकडाला जाणवले.त्याने ओळखले की आता आपले काही खरे नाही. हा सिंह; चिडलेला सिंह आपल्याला नक्कीच ठार मारणार.माकडाने तेथुन लगेच पळ काढला
सिंहाची झोप ताडकन उडाली त्याने डोळे उघडुन पाहीले. कानाशीलात काहितरी जोरात लागले हे त्याला कळाले. पळुन जाणा-या माकडाला पाहुन त्याला काय झाले हे त्याला कळाले. माकडाने सिंहाच्या ,जंगलच्या राजाच्या कानाखाली वाजवावी याचेच त्याला आश्चर्य वाटले.
क्षणभर माकडाच्या धाडसाचे कौतूक ही वाटले. पण मग नन्तर त्याने विचार केला की हे माकड जंगलात जाईल झाला प्रकार सर्वाना सांगेल.
मग जंगलच्या राजाची अब्रूच गेल्यासारखे होईल. कोणालाच आपले भय रहाणार नाही. या माकडाला आत्ताच मारुन टाकायला हवे.
सिंह माकडाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करु लागला.
माकड पुढे पळु लागले सिंह त्याच्या मागे. माकड पुढे सिंह मागे. माकड पुढे सिंह मागे. आता काही आपण वाचत नाही असा विचार करुन माकड जंगलातून आणखी जोरात पळु लागले.
माकडाला मारुन टाकलेच पाहीजे असा विचार करुन सिंह तेवढ्याच जोरात माकडामागे धावु लागला. माकड वाट सापदेल तसे धावत होते सिंह त्याच्या मागे धावतच होताच माकड पुढे सिंह मागे आडवेतिडवे या झाडा आडुन जा त्या पाय वाटेने जा इकडुन तिकडून धाव जीव मुठीत धरुन माकड पळत होते. आणि माकडाला जिमन्त सोडायचे नाहीच हे ठरवुन सिंह त्याच्या मागे पळत होता.
इकडे तिकडे आडवे तिडवे पळुन पळुन माकड आता दमुन गेले होते. लपायला जागा शोधत होते. तेवढ्यात त्याला जंगलात वाटेवर पडलेले एक कसले तरी जुने वर्तमानपत्र सापदले. वर्तमान पत्र उघडुन त्याच्या आडोशाने माकड एका झाडाच्या बुन्ध्याला टेकुन बसले.
माकडाच्या मागेमागे असलेला सिंह तिथेही पोहोचलाच. त्याने पाहिले की कोणीतरी वर्तमानपत्र वाचत बसलेला आहे.आपण त्यालाच विचारु यात असा विचार करुन सिंहाने विचारले सुद्धा " दादा या बाजुने कोणी एखादे माकड जाताना पाहिले तुम्ही?"
या प्रशनाला उत्त्तर म्हणुन माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो खालमानेने परत फ़िरला. म्हणाला "ऒ ! तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
ओशो रजनीशांची एक खासीयत आहे काही सांगताना ते विनोदाचा बरेचदा वापर करतात
एखादा विनोद सांगायचा आणि त्याचा रूपक म्हणुन वापर करून एखादा मर्मबोध करायचा.
ही त्यांची आवडती ष्टाईल.
ह्या विनोदाचा रूपक म्हणुन ते कसा सुंदर वापर करतील / ते कसा सांगतील बघा ...
अगोदर विनोद पूर्ण सांगतील आणि मग आधुन बधुन त्या विनोदातली वाक्ये घोळवत रहातील.
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे.
आपण सुद्धा या माकडासारखे असतो. वर्तमानात जगायच्या ऐवजी आपण जेंव्हा या जगात नसू तेंव्हा लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करत असतो. काही उपयोग आहे का?
पण आपल्याला नेहमीच वाटते असते की आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले जावे म्हणून.
मग विचार करु लागतो........वर्तमानाच नाही तर भविष्यकाळाचा ज्यात आपण असणारसुद्धा नाही त्या भविष्याकाळाचा विचार. मन हे खूप अजब असते. वर्तमानाचाच आधार घेउन ते तुम्हाला इतरत्र रमवत असते. स्वत:चे जाळे विणत असते तुम्हाला त्यात अडकवत असते.
जरा ओळ्खा या मनाला.
म्हणते की काहितरी असे कर जे तुला शक्य नाही का तर लोकानी त्यासाठी तुझे नाव घ्यावे.त्याने तुला आत्ता काहीही मिळणार नाही. आणि जेंव्हा लोक नाव घेतील तेंव्हा ते ऐकायला तू असणार सुद्धा नाहीस.
आपण थोडेसे त्या सिंहासारखे असतो. झोपलेले.... स्वप्नात मग्न. वर्तमाना कडे पूर्ण पाठ फ़िरवुन..भूतकाळाच्या गतवैभवात रममाण होऊन झोपलेले असतो. वर्तमान नावाचे काही असते हे विसरुन स्वत:च्या साम्राज्यात रममाण असतो. एखादे माकड येते आपल्या कानाखाली देते. आपली स्वप्ने नगरी चक्काचूर होते स्वप्ने विखुरली जातात.. एखादे माकड आपली स्वप्नांची दुनिया उलटी करुन जाते. एखादा क्षुल्लक प्रसंग आपल्या ताळ्यावर आणुन ठेवतो.हवेत उडणारी पावले जमिनीवर टेकवतो.
आपल्याला राग येतो. ताळ्यावर आल्याच्या नव्हे ....तर आपण स्वप्नात होतो हे लोकाना समजले याचा
त्या क्षुल्लक कारणाच्या मागे आपण हात धुऊन पूर्ण शक्तिनिशी लागतो.
आणि तद्दन फ़ालतू का होईना ध्येय अगदी हातापाशी जवळ आलेले असताना एखाद्या किरकोळ कारणासाठी शेपुट फ़िरवुन माघार घेतो.
लोक काय म्हणतील या बाऊ ला घाबरुन आपल्याला जमत असलेले कामही अवघड करुन ठेवतो.
सिंहाने वर्तमानपत्र बाजूला करुन बघितले असते तर माकड सहज हाती लागले असते.
माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो परत फ़िरला म्हणाला "ऒ तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
सत्य हे असेच असते. ते एखाद्या पातळ पडद्याआड दडलेले असते. आपण तो पडदा बाजूला करायचे कष्ट घेतच नाही.
कुणाच्या तरी एखाद्या क्षुल्लक शब्दाला महत्व देऊन "संपलंच की सगळं" म्हणत माघार घेतो. सत्य हे आपल्या समोरच असते. फ़क्त आपण त्या भोवतालचे लोकाचार , समाजमन , शिष्ठाचार , जात, धर्मग्रन्थ हे असले भ्रामक पडदे बाजूला सारत नाही. सत्य पडद्या आडच रहाते.आपण मात्र त्याच्या अगदी जवळ जाउन माघारी फ़िरलेलो असतो...... पराभूत होऊन.
:::::::स्वामी विजुभौ
( डीस्क्लेमर: प्रस्तूत रूपक हे ओशो रजनीशानी कधीही कोणत्याही व्याख्यानात सांगीतले नव्हते. हे लिखाण हे विजुभौंचे विचार आहेत.)

No comments:

Post a Comment