Saturday 21 May 2011

ए देवबप्पा

ए देवबप्पा
ऐकू येते का रे काही तुला
त्या आरतीच्या गोंगाटात
टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात
लोक काय काय मागत असतात
अन गार्‍हाणी सांगत असतात
कुणाला काय हवे असते
रुपं देही धनं देही
पुत्रं देही सर्व कामांशा देही मे
गात असतात किती ते तुझे गोडवे
अन म्हणतात की जो गाईल ही आरती
मिळेल त्याला सर्व हवे ते
पण खरे सांग एकदा
खरेच ऐकु येते का रे तुला?
सांग ना.....
ए देवबप्पा
दिसते कारे काही तुला
गाभार्‍याच्या बाहेरचे
त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून
किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे
त्या रोषणाईच्या झगमगटात?
किती डोळे लागलेले असतात
आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात
ताटकळत उभे असतात दर्शनासाठी
तुझ्यावर केलेल्या रोषणाईने
खरेच दिसते का रे काही तुला?
सांग ना...
ए देवबप्पा
वास तरी येतो का कसला
उदबत्ती धुरात आणि अत्तराच्या घमघमाटात?
मला खात्री आहे नैवेद्याच्या सुद्धा
तुला कधी वासच येत नसेल
इतक्या आशेने लोक येतात
पेढे बर्फी लाडू अन अन काय काय ती पंचपक्वान्ने घेऊन
कंटाळलाही असशील रोज रोज तेच तेच खाऊन
दाराबाहेरची ही....गर्दी पाहून
तुलाच भीती वाट असेल बाहेर येण्याची
चेंगरून जाऊ भक्तांच्या दाटीत;
किंवा गाभार्‍या पाशी नेणार्‍या लांबलचक रांगेची.
दक्षीणा दिली नाही तर पुजारी आत येऊच देणार नाही अशीही
किंवा मग बाहेर आलो तर पहावे लागेल
ते ते सारे जे आतून दिसत नाही
ते ते सारे जे आतून ऐकू येत नाही
आणि ते जे आतून कधीच जाणवत नाही
धक्केच बसतील ...
देवळापुढचे कचर्‍याचे ढीग पाहून
नारळाची कवचले , खरकट्या पत्रावळ्या , भिकार्‍यांचे थवे
डिस्को भक्तीगीतांचा गोंगाट.....
अजून थोडा पुढे आलास तर....
................ नको तू पळूनच जाशील इथून
त्या पेक्षा आहेस तिथेच बरा आहेस
निदान तुझ्या नावामुळे
गावातली बाजारपेठ फुलून जाते दर गुरवारी
एवढे तरी समाधान असू दे त्या गावकर्‍यांसाठी
साखर फुटाणे विकणार्‍या कमळीसाठी
गुलाल नारळ पेढे विकणार्‍या कोण्या म्हमद्या साठी
लैला बनून देह विकणार्‍या कोण्या चिंगीसाठी
.................विजुभाऊ

No comments:

Post a Comment