Saturday 21 May 2011

तीचे डोळे

" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते.
ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले.
ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते. एखाद्या चेहेर्‍यात नक्की काय जादू असते ते त्या नजरेलाच ठाऊक. टप्पोरे पाणीदार डोळे..काजळाच्या रेखीव फ्रेममधले.... आणि चेहर्‍याला जुल्फांची महीरप..... बोलके डोळे तुमच्या र्‍हदयातील बोल बोलत असतात.
एक नजर हा जादूभरा अनुभव प्रत्येकाने कधीनाकधी अनुभवला असतो. त्यामुळेच की काय प्रेमाची सर्वात जास्त गाणी डोळ्यांवरच लिहीली गेली असावीत .
प्रियकरासाठी प्रेयसीचे डोळे हे एक आटपाट नगर असते. त्यात स्वप्ने नांदतात. त्यात तो असतो ती असते आणि दोघांसाठी एक मोकळे निरभ्र चांदणं भरले आकाश असते. त्यात चांदण्या गाणे म्हणत असतात. चंद्राच्या चंदेरीप्रकाशात न्हाऊन ती परी झालेले असते. तिथे वचने खरी होऊन अवतरतात. स्वप्नभरल्या रस्त्यातून चालताना पायांच्या खाली नोकरी, पगार, स्वयंपाक ,मुले ,नातेवाईक असले खडे खड्डे खाचखळगे येत नाहीत. अगदी हवेतून चालत जाता येते.
भणंगातल्या भणंगाला सुद्धा स्वप्नांची ही श्रीमन्ती त्या नजरेमुळेच मिळते.
आसपासचे सगळे जग जणु आपलीच खबर घेत आहे असे काहीसे भास होतात. किराणा दुकानदार सुद्धा किराणाचे गहू हातात देताना अस्फुट हसतोय असे वाटू लागते.
रस्तातून जाताना कधी त्या डोळ्यांची मालकीण भेटली तर देशाची साम्राज्ञी भेटल्याचा आनन्द होतो. ती साम्राज्ञी दिसताच भरगर्दीचा रस्ता सुद्धा फुलाफुलंची बाग भासू लागतो.
कोण्या शायराने प्रेयसीच्या डोळ्याना सरोवाराची उपमा दिली आहे
पलको पर न रख्खो हमे. आखोंमे उतरने दो
किनारे से गहराई का अंदाजा नही आता.
डोळ्यांची भाषा ही इन्क्रीप्तेड असते. ती ज्याच्या साठी असते त्यालाच कळते. न बोलताही डोळे बरेच काही बोलून जातात.
लटका राग दाखवतात ते डोळेच ,पाहूनही न पाहील्यासारखे करतात ते डोळेच आणि त्याने आपल्याकडे पाहिले आहे का हे चोरून बघणारे असतात ते डोळेच. तीला चोरून पहील्याची चोरी देखील डोळेच पकडतात. आणी चोरी पकडल्यानंतर गालाअगोदर आरक्त होतात ते डोळेच.
तीचे डोळे.. हल्ली मला काही सांगत असतात.
न बोलताताच बरेच काही बोलत असतात
भर उन्हातदेखील लिंबोणीची सावली देत असतात
तीचे डोळे ..माझ्या नकळत मला पहात असतात.
मी येणार असे ऐकल्याबरोबर माझ्यासाठी वाटेवर इंद्रधनुष्य बनून रहातात

No comments:

Post a Comment