Wednesday 27 April 2011

एप्रील फळ ४

मे संपता संपता पावसाची चाहुल लागते.आकाशात वारंवार नजरा जाऊ लागतात. आई वहिनी आत्या वगैरे महिला वर्ग लोणचे करणे आम्बोळ्या कुरडया, पापड सालपापडाचे वाळवण इत्यादी बेगमीच्या कामात मग्न असतात. मुलानाही शाळेचे वेध लागलेले असतात. सूट्टी संपता संपत नसते लोळत पडण्याचाही कंटाळा आलेला असतो. पत्ते , बुद्धीबळे , कॆरम अस्ताव्यस्त विखुरलेले असतात.
काय करावे हा मोठाच प्रश्न असतो. आईला वाळवण घालायच्या कामात मदत करायला परवानगी नसते. ती करताना काम कमी आणि खादाडी जास्त असते हे आईही ओळखुन असते.
अशात एकदम दूरून एक मस्त आरोळी ऐकु येते...........आssssssssssल्फ़ीये कुल्फ़ी मलाsssssssय. कुल्फ़ी मलैssssssय.
पाउल जागच्या जागी थबकते. कंटाळ्यामुळे बधीर झालेले डोके एकदम चालु लागते.खीडकीतुन कुल्फ़ीवाला कुठे दिसतो याचा अंदाज घेत प्यान्टचे खिसे , टेबलाचे ड्रॊवर , पेन स्टेन्ड , गादीखाली , उशीच्या अभ्र्यात असे ठेवणीच्या गुप्त जागेत लपवलेले चिल्लर धन बाहेर येउ लागते. डोक्यावर माठ ठेवलेला कुल्फ़ीवाला दिसला की अक्षरश: भक्ताला देव भेटल्याचा आनन्द होतो.
आसपासच्या दोनचार खिडक्यातुन ओ कुल्फ़ी......थांबा अशा हाका ऐकु येतात.आणि मुले घराबाहेर पळ काधतात. घराच्या दारात्च कुल्फ़ीवाला त्याची ती माठ असलेले बाम्बुची टोपली अलगद उतरवुन ठेवतो तेंव्हा त्याचा थाट पहाण्यासारखा असतो. त्या्चा तो मिठाच्या बर्फ़ाने भरले्ला माठ. एखाद्या खालसा संस्थानाच्या कारभा-याने संस्थानचा खजी्ना दाखवावा तसा तो अलगद माठावरचे कापड बाजुला करतो त्यात बर्फ़ाच्या पाण्यात तरंगणा-या कुल्फ़ीच्या लोखंडी साचाच्या  डब्या मुले अगदी अधाशीपणे  पहात असतात.कुल्फ़ीचा साचा धरण्याची ती ढब . साचाच्या डबीवरील ते कणकेचे सील नखाने बाजुला काढले जाते.मुलांची उत्सुकता शीगेला पोहचलेली असते. साच्याचे डबीचे झाकण मोकळे होते . ती शंकु च्या आकाराची काळपट डबी तिरकी धरुन गुढग्यावर मूठ आपटत त्यातुन पांढरी शुभ्र कुलफ़ी बाहेर काढली जाते. बाहेर येणा-या कुल्फ़ीबरोबर पहाणाराचे डोळे विस्फ़ारत जातात.
अखेर शेवटी ती कुल्फ़ी वडाच्या पानावर आडवी ठेवुन चाकुने तीचे काप होऊन जेंव्हा ते वडाचे पान कुल्फ़ी सहीत हातात पडते तेंव्हा मनात कुल्फ़ीशिवाय दुसरा कोणताही विचार येत नाही.
इतकी एकाग्रता जर कोणी देवधर्मात प्रार्थनेत दाखवली तर देव ती प्रार्थना संपायच्या आतच प्रसन्न होऊन दर्शन देईल. वडाच्या हिरव्यागार पानावर ठेवलेले ते कुल्फ़ीचे पांढरे शुभ्र काप पहात रहावे असे वाटत असतानाच जीभ डोळ्यांवर आक्रमण करते आणि बघताबघता कुल्फ़ी तोंडात विरघळुन जाते.एकच कुल्फ़ी  खाउन थांबला असे जर कुणाच्या बबतीत झाले असेल तर तो मनुष्य हा जितेंद्रिय पदाला पोहोचलेलाच असला पाहिजे. हळुहळु त्या कुल्फ़ीवाल्या जवळ गर्दी जमते. मघाशी त्या पापडकुरडया जवळ फ़िरकु न देणा-या आयाबाया ती कामे सोडुन कुल्फ़ीच्या खजिन्या भोवती गोळा होतात. कुल्फ़ीवाल्याच्या माठातुन शेवटीशेवटी शोधुन शोधुन कुल्फ़्या काढल्या जातात. माठातल्या कुल्फ़्या संपल्या की मगच कुल्फ़ीवल्याला जाऊ दिले जाते.

No comments:

Post a Comment