Wednesday 27 April 2011

एप्रील फळ १

एप्रिल फळ.......... हो एप्रिल फळ च
हे कळ फलकामुळे झाले नाही
मला एप्रिल फळ असेच म्हणायचे आहे
एप्रिल महीना म्हणजे वसंत आगमन........सर्वत्र फुलांचे सडे असतात्.नुकत्याच आलेल्या कोवळ्या पालवीमुळे झाडे रंगीबेरंगी झालेली असतात. प्रत्येक झाड जणु यजमान होउन वसंताचे स्वागत करतोय अशा मूड मधे असते. कोठे कोठे कोकीळा मजेत गात असते. अंब्याच्या मोहोराचे आता कैर्या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अदृश्य घण्टा वाजवुनसारी सृष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे.
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच.
झाडावरची थोडीशी उबदार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.
आंब्याचे जेवढे लाड होत नसतील तेवढे कैरीचे होतात......
शिवरात्रीलाच त्या कैरी बाळांची चाहुल लागते.....मोहोराच्या फुलांच्या ममधोमध  दडलेली ती छोटीछोटी बाळे टपोरी मोत्यापेक्षाही गोड दिसतात............. ...आंब्याच्या झाडाचेही पहिलटकरीणी सारखी डोहाळे पुरवले जातात.
खते दिली जातात .....मग फवारणी केली जाते...गारा लागु नयेत म्हणुन पानांचा आडोसा केला जातो...द्रुष्ट लागु नये म्हणुन काळ्या बाहुल्या बांधल्या जातात्.....लिम्बु उतरले जाते.... कोणी धटिंगणाने दगड मारु नये म्हणुम जागता पहरा बसतो.....
दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदार गवताचे पांघरुण घातले जाते......
घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सक्त पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले इतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावात एकच विषय्........कैरी.... आणि कैरीच.
कोणाच्या घरी जा..........रस्त्यात कोणाला भेटा. वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशीच तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते. वर्तमान पत्रात रकाने च्या रकाने भरुन येउ लागतात्....एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्..एरवी आंब्याच्या झाडाकडे मुलाना फिरकु न देणारे मोठे एकदम उदार होतात आणि पडलेल्या कैर्या धुंडाळण्याच्या मोहीमेवर छोट्याना पाठवतात.
छोटे सुद्धा नाचत नाचत या मोहीमेवर येतात्.....अगदी तोरणा सर केल्याच्या आवेशात आणलेला तुट्क्या फुट्क्या कैर्यांचा ढिगारा मिरवत आणतात्....या कैर्यांवर हक्क फक्त त्यांचा असतो....त्यांचे काय करायचे हे सर्वस्वी त्यानी ठरवायचे असते.

कधी नव्हे ते मिळालेले स्वातन्त्र्य भरपुर उपभोगुन घेतले जाते. फुट्क्या कैर्यांचे फुटीच्या प्रमाणानुसार वाटे केले जातात...
चांगल्या कमी फूटलेल्या कैर्या मोठ्या ताई कडे जातात्...ती कैर्या धुते. त्यांचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करते....त्याना बर्यापैकी मोठ्या पातेल्यात किंवा तांब्यात घेउन त्यात मीठ साखर टाकली जाते....त्यावर मेतकूट आणि नक्षी पेरावी तशी कोथिम्बीर पेरली जाते....
पातेले ताटलीने झाकुन मग ते नवरात्रात घागर फुंकताना झेलावी तसे हलवले जाते......आतापर्यन्त मोठ्यांच्या ही तोंडाला पाणी सुटलेले असते.......
आई मग छान चिवडा करते.....फुटलेल्या छोट्या कैर्या थेट चिवड्यात रवाना होतात्....पातळ पोह्यांच्या चिवड्याबरोबर चाखत माखत खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याला त्यावेळी विचारले की अमृताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल.
थोड्या लहान कैर्यांचा ताबा आई घेते..
मिक्सर मधे वाटुन ती त्याची फर्मास चटणी बनवते.....ती उद्याच्या हळदीकुंकुवासाठी खास राखुन ठेवते..........फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. पडलेल्या कैर्यांसोबत आंब्याच्या डहाळ्या आलेल्या असतातच...... आई घरातल्या छोट्याना मग आंब्याचे तोरण करायचे मोठ्या जबाबदारीचे काम देते.....फडताळतुन सुतळ्या चे तुकडे निघतात....आंब्याची पाने स्वच्छ पुसली जातात्.. एकसारखी पाने घेउन त्यांचे देठ दुमडुन तो पानातुन आरपार केला जातो...मोठ्या ऐटीत आंब्याचे पान न पान तोरणात विराजमान होते....
संध्याकाळी घरातले सगळे जेवताना एकत्र येतात्.....दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणेच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........
महाराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो.
छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो

No comments:

Post a Comment