Wednesday 27 April 2011

एप्रील फळ ५

कुल्फ़ीवाला जातो ना जातो तोच दुसरा एक आवाज येतो..........हे काळी मैना काळी मैना डोंगरची काळी मैना......
मुले याची वाटच बघत असतात. काळीशार करवंदे....निरागस पण अवखळ लहान मुलाच्या खट्याळ डोळ्यांची आठवण व्हावी असेच ती पाटीत ठेवलेली मण्यांसारखी करवंदे पाहुन वाटते.
किंचित आंबट आणि गोड अशी चव...नुसती सांगुन कलणार नाही ती चाखायलाच हवीत. करवंदे चाखताना ती लाल की पांढरी आहेत त्या वरुन चिमणी आहेत की कावळा आहेत हे ठरवायचो. ज्याला जास्त कावळे तो त्या दिवशी जिंकला असे आम्हाला वाटायचे.
करवंदे खाताना एक गम्मत असते...करवंदे खावीत तर गच्चीत बसुन नाहीतर घराच्या कट्ट्यावर बसुन....करवंद हे फ़ळ सोफ़्यावर बसुन सगळे शिष्ठाचार पाळुन खाण्याचे नव्हेच. ते चाखत माखतच खायचे असते. करवंदांच्या फ़्यामिलीत जमा होईल असा चण्यामण्या नावाचा बोरांचा एक प्रकार असतो. नुसते नाव काढले तरी जिभेला पाणी सुटते. लालसर केशरी बारीक मोत्या सारखी दिसणारी किंचीत सुरकुतलेली ती फ़ळे इतकी आंबट असतात की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. त्याला मिठाची जोड असेल तर काय विचारु नका.
पण ती सुद्धा खायची एक पद्धत आहे. कागदाचा त्रिकोनी द्रोण करुन त्यात अंदाज लागणार नाहीत इतकी चन्यामन्या बोरे त्यात भरायची आणि रस्त्याने रमतगमत जात खायची. आंबटपणामुळे जीभ जास्त वेळा  टॉsssक्क करते की डोळे जास्त वेळा मिचकावले जातात अशी स्पर्धा सुरु असते.
करवंदे इतकी आंबट नसतात. पण ती त्यांच्या जादूई चवीमुळे वेड लावतात हे मात्र नक्की.
करवंदे एकेक करुन चाखत माखत खाणे आणि एकदम त्यांचा बकणा भरणे ...हे दोन्ही प्रकार अजबच आनन्द देतात. एकेक करवंद जिभेवर घोळवत खायचे.आणि दहाबारा करवंदे एकदम चावायची मजा वेगळीच. करवंदांच्या बिया चावताना च्युईंगम खाल्ल्याचेही सूख मिळते.
करवंदांबरोबरच येतात ती जांभळे.आमच्या गावात जवळच एक जांभळाचे जंगल आहे. बघावे तिकडे जांभळाचीच झाडे. अक्षरश: झोपुन तोडता येतील इतक्या खाली वाकलेल्या फ़ांद्याम्वर असतात जांभळे .
तेथे  छोटी जाम्भळे मिळतात. साल आणि बी यात अंतर फ़ारसे नसते. गर वगैरे चैन नसते.
पण ही जांभळे चवीत मात्र लाखात एक. खाताना असेच हवे तसेच हवे अशी उगाच मिजास नसते. जे मिळेल त्या भांड्यात घेउन खावी. न मिळाल्यास ओंजळीत घेउन खावी. हां पण एक आहे जेथे रस्ता जवळ असेल अशाच जागेवर बसुन / उभे राहुन खावी. लहानपणी आम्ही भावंडे ही जांभळे घराच्या खिडकीत उभे राहुन खायचो.आणि बीया जोरात रस्त्यावर उडवायचो. तोंडाने उडवुन कोणाची बी जास्त लाम्ब जाईल ते पहायचो.
दुसरी जांभळे असतात ती जरा जाड खात्यापित्या घरची. त्याना गर असतो. आम्बटपणा कमी असतो पण गोडवाही कमी असतो. ही जाम्भळे खाताना साल दातानी सोलुन आतला पांढरा नीळा गर उगाचच टिनोपालच्या जहिरातीची आठवण करुन देतात.
जाम्भळे ,करवंदे, डहाणु घोलवडकडे मिळणारे पाण्याच्या चवीचे जाम. ही सारे असतात कोकणचा मेवा त्याना आंब्याइतके कोणी फ़ारसे ओळखत ही नाही. पण ज्याना ती माहित आहेत त्याना ते कोठेही असो प्रत्येक मोसमात या मेव्याची हटकुन आठवण होतेच.
मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..

No comments:

Post a Comment