Wednesday 27 April 2011

एप्रील फळ ६

आपल्या लहानपणच्या ब-याचशा आठवणी फ़ळांशी निगडीत असतात.लिची पेर पीच चेरी या पेक्षाही फ़णस चिक्कु पेरु आंबा बोरे चिंचा ही नेहमी दिसणारी आणि आपल्य इथल्या झाडांवर आढळणारी फ़ळे ती झाडे त्यावर खेळलेले खेळ हे सगळे आपले लहानपण घडवतात. जून सरता सरता फ़णसाचे आगमन होते. फ़णस म्हंटले की पटकन आठवतो तो पुलंचा अन्तू बर्वा.
कोकणातील माणसे फ़णसा सारखी असतात खूप पिकल्याशिवाय त्यांच्या गोडवा येत नाही म्हणतात. फ़णस आणि कोकण हे वेगळे करताताच येत नाही. पटकन सहजासहजी काही कोणाला मिळु द्यायचे नाही आणि दिले की भरभरुन द्यायचे हा कोकणीबाणा सुपारी;नारळा फ़णसाने कोकणी माणसाला दिला की कोकणी माणासाने त्याना दिला हे ठरवणे अवघड.राजकारण असो इतिहास असो किंवा अर्थकारण असो हा गुण सर्वत्र दिसतो.
दारातच स्वागताला उभे असणारे डेरेदार हिरवे; पानानी गच्च भरलेले फ़णसाचे झाड ही कोकणी कौलारू घरांची ओळखीची खूण. घरासमोर असणारा आड त्यावर कुर्र...की...च वाजणारा रहाट
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते. आणि घराच्या दारातच एखादी सुरुकतलेली आजीबाई गालावर तळहात दुमडुन बोटे मोडत "पुता तू होड जातलो रे" म्हणत प्रेमाने आपले मस्त गूळ पाणी देउन स्वागत करणार असे हमखास वाटते. कोकणची खरी ओळख म्हणजे फ़णस. स्वत:च्या अंगाखांद्यावर फ़णसाची बाळे वागवणारे फ़णासाचे झाड मला नेहमीच जिवती मातेची आठवण करुन देते. मूल व्हावे म्हणुन आंगाखांद्यावर दहाबारे लहान बाळे वागवणा-या जिवती मातेला नवस बोलला जातो. त्या देवीचे चित्र मी कुठल्याशा पोथीत जेंव्हा पहिल्यांदा पाहिले तेंव्हा मला फ़णसाच्या झाडाचीच आठवण झाली होती. मी माझ्या आजीला तसे सांगितलेही होते त्यावर आजी माझ्या पाठेत एक चापटी मारुन "चल पळ" म्हणुन फ़िस्सकन हसली होती.
पण फ़णसाचे झाड जेंव्हा केंव्हा पहातो तेंव्हा मला हीच आठवण होते.
फ़णसाचे प्रेमी कट्टर असतात.त्यावरुन माणसांचे विभाजन करायचे झाले तर फ़णस मनापासुन आवडणारे आणि अजिबात न आवडणारे अशा दोनच प्रकारचे लोक असतात. अधलामधला प्रकार माझ्या पहाण्यात तरी नाही.फ़णस न आवडणा-या माणसाला फ़णसा वास सहन सुद्धा होत नाही आणि फ़णसप्रेमी माणसाला तो दरवळ जागेवरुन हलुसुद्धा देत नाही.
परवा पार्ल्याच्या बाजारातुन सहज जात होतो तेथे काचेच्या पेटीआड ठेवलेल्या तो ग-याचा खजीना पाहुन मी मंत्रमुग्ध झालो. अगोदरच त्या फ़णसाच्या दरवळाने मला जागेवर थोपवुन धरले होते. गरे पाहिल्यावर मी कोठे निघालो होतो तेच विसरलो आणि ग-यांच्या दिशेने आपोआप चालु लागलो. माझ्याबरोबरचा मित्र ; त्याला फ़णसाचा दरवळ म्हणजे वास वाटतो. तो त्याने हैराण झाला होता आणि मी मिटक्या मारत त्या करकरीत ग-यांचा आस्वाद घेत होतो.
माझ्या लहानपणी असे फ़णसाचे गरे बाजारात मिळायचे नाहीत. त्यासाठी आख्खा फ़णस आणावा लागायचा. फ़णस आणला म्हणजे तो मग दोन तीन दिवस ठेवायचा किनतानात झाकुन ठेवायचा आणि पिकल्यावर त्याचा दरवळ सगळ्या घरभर सुटायचा.फ़णस घरात आणला म्हणजे त्याला टेकुन बसणे ; त्यावर हात दाबुन तळहातावर काट्यांमुळे उमटणारे खड्डे मोजणे हे आम्हा मुलांचे उद्योग. त्यासाठी आम्ही अभ्यास देखील त्या फ़णसाच्या सान्निध्यात करायला तयार असू.
फ़णस पिकुन त्याचा दरवळ घरभर झाला की मग त्यानन्तर तो फ़णस कापण्याचा सोहळा सुरु व्हायचा. सोहळाच म्हणायचा तो. खोबरेल तेलाची वाटी तर्हेतर्हेच्या सू-या आणि दोन पराती पाअतेली घेउन माझे धाकटे काका फ़णस कापायला बसायचे. पूजेला जसे सोवळे नेसावे लागते तसे फ़णस कापण्यासाठी सुद्धा त्यांचा एक खास पायजमा असायचा. त्यावर किनतान टाकुन ते फ़णस कापायला बसत. शस्त्रास्त्रांना धार लावताना अगोदर पाणी लावतात तसे सूरीला खोबरेल तेल लावले जायचे. आणि मग ती सूरी फ़णसातून आरपार जायची. अर्ध्या कापलेल्या फ़णसाला मग ते काका नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट हातानी फ़ाडले असेल त्या श्टाईल मधे दोन हातानी फ़णस उकलायचे. आम्हा मुलाम्चे सगळे लक्श्य त्यातून डोकावणा-या त्या सोनेरी चंदेरी खजिन्याच्या मोहोरांच्या तुकड्यांकडे असायचे.फ़णस उकलल्यानन्तर त्यातुन गरे वेगळे काढले जात. घरातल्या देवाला दोनचार गरे दाखवुन मग ते सगळ्यानी खायचे हा शिरस्ता.फ़णसाचे गरे एका पातेल्यात ठेवले जायचे सुरवाती सुरवातीला तर गरे पतेल्यात पडायच्या आतच ते पोटात पडायचे. दुस-या पातेल्यात नुस्त्या बीयाच असायच्या.नन्तर नन्तर तर आख्खे गरे संपल्यावर अगदी गरे असलेल्या रेशा सुद्धा शोधुन खाल्या जायच्या
आई; थोरली काकु; आत्या वगैरे महिला मंडळ " अरे गरे खाऊ नका पोट फ़ुगेल"वगैरे पोकळ सल्ले द्यायच्या पण आम्ही त्याला अजिबात दाद द्यायचो नाही.उलट "शाळेत कालच ;गरे खा गरे पोटाला बरे" हे बडबडगीत शिकलो आहोत ते काय उगाच" असे म्हणुन दाखवायचो. " शिवाजी महराजानी अफ़्जलखानाचे पोट फ़ाडुन त्याचा कोथळा बाहेर काढला" हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे.
फ़णसात दोन प्रकार काप्या आणि बरक्या.यातले कोणत्या झाडाला कोणते फ़ळ लागेल ते कोणीच सागु शकायचे नाही. आमच्या गावात भोरकर वाडा म्हणुन एक जुना वाडा होता तेथे फ़णसाची दोनतीन मोठी झाडे होती. मोसमात नेहमीच या झाडाना फ़णस लगडलेले असायचे.घरी फ़णस आणायचा तर त्या झाडावरचा एखादा फ़णस बूक करावा लागायचा त्या फ़णसावर अक्षरश: ज्याने तो फ़णस बूक केलेला आहे त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या डकवल्या जात. मला फ़णसानी लगडलेले ते झाड बघायला खूप आवडायचे झाडावर लगडलेला फ़णस हातानी चाचपडुन बघण्यातली गम्मत काही वेगळीच.एव्हढे मोठे फ़ळ झाडावर पहायल काहितेरी वेगळेच वाटायचे."अबबबबबबब केवढा फ़णस आई; आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोट्ठे नाही " या पाडगावकरांच्या गाण्या ची खरी गम्मत तो मोठा फ़णस पाहिल्यावर कळायची.
फ़णसावर थापट्या मारुन तो काप्या की बरका ते ठरवले जायचे.त्यावर थाप मारुन येणार्या ठप्प ठप्प किंवा थब्ब थब्ब आवाजावरुन ते कळायचे. देशावरच्या माणसाला काप्या फ़णस आवडतो तर अस्सल कोकणी माणसाला बरक्या.
काप्या फ़णसाचे गरे देशावरच्या घाटी माणसासारखेच फ़ारसे अंगाला लावुन न घेणारे; सुट्टे सुट्टे, करकरीत, थोडे कमी गोड असतात तर बरक्या फ़णसाचे गरे कोकणी माणसा सारखेच गोडीत अवीट ; पण हातात धरु म्हणता सुळ्ळकन हातातुन निसटुन खाणाराची फ़जीती करणारे.
फ़णासाचे गरे आयुर्वेदात रुचकर ; पौष्टीक असे काहीसे वर्णीले आहेत. पण खाणारा माणुस फ़णसाचे गरा तोंडात टाकतो तेंव्हा अजानतेपनी डोळे मिटतो. वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. अंतरात्मा तृप्त होतो.आणि हतिम बीन ताई च्या गोष्टीत सांगितलेल्या प्रमाणे "एकबार देखा है दूसरी बार देखने की चाहत है" या उक्तीनुसार आणखी एकदा ती तृप्ती अनुभवावी म्हणुन दुसरा गरा उचलण्यासाठी त्याचा हात दुस-या कोणाचेतरी नियंत्रण असावे त्याप्रमाणे हात गरे ठेवलेल्या भांड्याकडे आपोआप वळतो..

No comments:

Post a Comment