Sunday 17 November 2013

एक बटा दो.... दो बटे चार (2)

असेच एकदा सिंहगडावर गेलो असताना बाबाने सूर्याजीने दोर कापल्यामुळे काय झाले ते सांगितले. मावळे त्वेशाने लढले. तुम्ही परतीचे दोर कापले की तुमची प्रगती होते. तुम्ही नवनव्या रिस्क्स घ्यायला तयार होता. हे सांगत असताना बाबाने स्पेन्सर जोन्सनच्या हु मूव्हड माय चीज चा संदर्भ आणला. इतिहासातील एका गोष्टीतून मोटीवेशन शी सांगड बाबाने सहज घातली होती. बाबाचे वाचन एकदम दांडगे. त्याला वाचलेले आठवायचे देखील. त्याचा त्याला फायदा व्हायचा. बाबाच्या वाचनामुळे मी सुद्धा लहान असतानाच वाचनाच्या प्रेमात पडले. बाबा मला खूप पुस्तके आणायचा पण त्यातली तो स्वतःच बर्‍याचदा वाचत बसायचा. "तोत्तोचान" एक होता कार्व्हर , हायडी या पुस्तकांची कितीतरी पारायणे आम्ही केली असतील कोण जाणे. एखादे जाड पुस्तक आणले की रात्रभर वाचून संपवायचा. बाबाच्या ओफिसच्या बॅगेत सुद्धा एखदे दुसरे पुस्तक असायचेच.
त्याउलट मम्मी. तीला मी रवीवारची लोकसत्ता सोडुन इतर काही वाचत बसलेले पाहिलेच नाही.तिच्या खांद्यावरच्या पर्समध्ये बाबाची बँकेची पासबुके आणि चेकबुक सोडून इतर काही पाहिले नाही. मी एकदा म्हणाले सुद्धा तसे. मम्मा म्हणाली हे चेकबुक मी साम्भाळते आहे म्हणून ठीक आहे निदान हवे तेंव्हा सापडते तरी. बाबाकडे ठेवले असते तर काही विचारायला नको.
ते मात्र खरे. सुरवातीला बाबा घरात असला की आम्ही नुसती धमाल करत असायचो. बाबा मम्माला म्हणायचा रात्रीचा स्वैपाक कशाला करतेस आपण बाहेर जाउया. मम्मा म्हणायची तुझे पैसे वर आले असतील तर मला दे. उगाच कशाला खर्च करत बसतोस. बाबा म्हणायचा अगं एरवी मी घरात नसतो. तेंव्हा तुम्ही दोघी असताच की घरात. आज मी आहे तर जाउयात बाहेर.
मम्मा म्हणायची की रोज तू बाहेरचेच जेवतोस आज घरचे जेव की.
बाबा कपाळाला हात लावून म्हणायचा की बघा कसली बायको मिळालीय.नवरा बाहेर जेवायला घेवून जातोय तर ही यायचे नाही म्हणते. तुझ्या जागी एखादी दुसरी कोण असती ना तर उड्या मारत तयार झाली असती.
मम्मा हा टाँट मस्त परतवुन लावायची. म्हणायची" मग शोध ना एखादी बाहेर जेवायला नेण्यासाठी."
बाबा निरुत्तर व्हायचा. मी खिदळत बसायचे. अशावेळेस बाबा अन मम्मा मला "खिदळपरी" म्हणायचे.
बाबा नंतर नंतर बरेच दिवस कामानिमित्त प्रोजेक्टसाठी बाहेरच असायचा. कधी ऑनसाईट तर कधी दिल्ली कलकत्ता बेंगलुर असे करत फिरायचा.
एक मात्र होते बाबा कधीही बाहेर गेला तरी तो दिवसातून एकतरी फोन करायचाच. मम्मा सुद्धा बाबाच्या फोनची आतुरतेने वाट बघत बसायची. फोन आला नाही तर कावरीबावरी व्हायची. सुरवाती सुरवातीला तर एकटीच रडत असायची. झोपताना मला त्याच्या फोटोवरुन हात फिरवायला सांगायची. मला कुशीत घेवून माझ्या केसातुन हात फिरवायची.
दिल्लीची असाइनमेंट घेतली होती त्यावेळेस बाबा जवळजवळ वर्षभर बाहेरच होता की ,फक्त शनिवार रविवार घरी यायचा ,त्यावेळी मम्मीच सगळं बघायची ,सगळ्या जवाबदार्‍या एकटी पेलायची ,मी तर केवढीशीच होते ,मला घेऊन बाजारहाट करायची ,घर ,शाळा ,तिचं ऑफीस ,कसं जमायचं तिला तिच जाणे ,पण कधी कसली कमतरता भासू द्यायची नाही .
हा...एक मात्र नक्की ,तिला बाबा सतत आठवायचा ,रोज रात्री झोपताना बाबाच्या फोटोकडे पहात रहायची ..खूप प्रेमाने बाबाच्या फोटोवरून हात फिरवायची ..त्याचा फोन आला नाही तर अगदी कासावीस होऊन जायची . हळुहळु मम्माला बाबाचे कामानिमित्त घरात नसणे हे पचनी पडले. ती त्यातून बाहेर पडू लागली.
बाबा बाहेर असला की मम्मा एकदम वेगळी असायची. घरात एक शिस्त नांदायची. सगळ्या वस्तु जेथल्या तेथे असायच्या.
कधी माझ्या मैत्रीणी आल्या तर एकदम पसारा व्हायचा . मम्माने एक दिवस "पसारा कमी असला की टेन्शन कमी होते" हे एकदा मस्त दाखवून दिले.कायझेन लीन मॅनेजमेन्ट ची सर्व तत्वे बहुद्धा मम्माकडूनच कोणीतरी उचलली असावीत. मम्माचे वागणे एकदम मेथॉडिकल असायचे. मम्मा घरात असताना आमचे घर म्हणने आय एस ओ सर्टीफाइड घर असायचे.
बाबा जसजसा कामानिमित्त घराबाहेर जास्त दिवस राहु लागला तशी अगोदर भित्री लाजाळू असणारी मम्मा बदलु लागली. पूर्वी मला एकटीला कुठे बाहेर जाउ न देणारी मम्मा मला क्लासच्या मित्रमैत्रीणींसमवेत ट्रीपला सहज परवानगी देवु लागली. इतकच काय तर ब्यांकेत , सोसायटीच्या मिटींगला,वगैरे कामात मम्मा पुढाकार घ्यायला लागली.
मम्मा एक वेगळाच कॉन्फिडन्स घेवुन वावरायची. मला मॅनेजमेण्ट च्या कोर्ससाठी हॉस्टेलला ठेवायचा निर्णय मम्माचाच. मम्माच्या कॉन्फिडन्स च्या माझ्यावर एक वेगळाच परीणाम व्हायला लागला. मी कॉलेजचे इव्हेन्ट करायला लागले. कुठे बोल्डली वागायला लागले. मम्मा एकदा माझ्या कॉलेजात आली होती प्रिंसीपॉलना भेटायला. काय बोलली कोण जाणे. पण राणे मॅडमना मम्माच्या कॉन्फिडन्स चे खूप कौतूक वाटले. कधीही दिसल्या की त्या मम्माबद्दल विचारायच्या. म्हणायच्या मुलीच्या जातीने कसे तुझ्या मम्मासारखे असायला हवे या मॉडर्न जमान्यात. माझी छाती अभिमानाने भरून यायची.
कधी मी लहानपणीचे फोटो काढले तर त्याफोटोतली मम्मा आणि माझ्या समोर असणारी आत्ताची मम्मा यातला फरक सहज जाणवुन यायचा. पूर्वीच्या बुजरेपणाचा लवलेशही तिच्यात दिसायचा नाही. कुठलेही निर्णय मम्मा रेंगाळत ठेवायची नाही. तड की फड. तिथल्या तिथे. अण्णा आजोबासुद्धा तिचा सल्ला घ्यायचे. त्यांचे जुन्या घराचे काही निर्णय होते ते मम्मानेच घेतले. बिल्डरशी बोलणी/ करार मम्मानेच केला. अण्णा आजोब तर "तू माझी सून असशील पण मी तुला माझा मुलगाच समजतो" असेच म्हणायचे.
सोसायटीच्या काही प्रकरणांत तर मम्माने तहसील ऑफिसात्/कलेक्टर ऑफिसात जावून स्वतः फॉलोअप करुन मॅटर तडीस लावले. तेंव्हापासून मम्मा सोसायटीच्या कमीटीची अविभाज्य भाग बनली.
आमची पहिली गाडी सँट्रो. आणली तेंव्हा मम्मा कसली खुश होती. दुसर्‍याच दिवशी बाबाने आग्रह करुन मम्माला गाडी शिकायला लावली. मम्मा गाडी चालवताना खूप घाबरायची. विशेषतः सिग्नलवर. नेहमी गाडी बंदच पडायची. मग बाबा तिकडचे दार उघडून बाहेर यायचा सिटस ची आदलाबदल करायचा. मी आणि बाबा त्यावरुन मम्माला चिडवायचो. मम्मा नंतर जिद्दीने गाडी शिकली. बाबासुद्धा तिच्याइतक्या सफाईने मुम्बैत गाडी चालवत नाही
एकदा मम्मा गाडी चालवत असताना एक टॅक्सीची गाडीच्या बंपरला धडक बसली. मम्मा काय भांडलीय त्या टॅक्सीवाल्याशी म्हणून सांगु? बाबाने घरी आल्यानंतर मम्माला अक्षरशः दंडवत घातला. म्हणाला आता कशी मस्त एकदम बोल्ड वाटतेस. माझ्यात नसते आले एवढे डेरिंग.झकास. मला अशीच बायको हवी होती. बाबा तर त्याच्या मित्राना हा किस्सा फोनवरुन अभिमानाने सांगत बसला होत. बाबाला मम्माच्या अशा बोल्डनेसचे फार कौतूक वाटायचे. म्हणायची शीक शीक जरा मम्माकडून जगातल्या प्रत्येक माणसाला अशी बोल्ड बायको हवी असते. शामळू रडुबाई. कोणालाच नको असते
हे सगळं माझ्या नकळत्या वयात माझ्या मनावर बरंच काही उमटवून गेलं.
हल्ली हल्ली बाबाचे आणि मम्माचे काय बिनसले होते कोण जाणे. बाबाने घरात पसारा केलेला मम्माला खटकायचे. तो पसारा ती बाबाला आवरायला लावायची.बाबाला ज्यावेळेस गाणी ऐकायची असत त्यावेळेस मम्माची जेवायला बसवायची घाई असायची. बाबा म्हणायचा की भांडीवाली लौकर येते म्हणुन काय आम्ही भूक नसतानाही जेवायचे. हवी तर भांडी मी घासतो. राहू दे.
मला तर बाबा अन मम्मा हे दोन धृव आहेत असे वाटायचे. एक एकदम बिन्धास्त.घरी असला की कसलीच शिस्त न पळणारा. आणि एक घरात सतत व्यवस्थितपणाचा आग्रह धरणारा. त्या दोघांच्या मधे माझा मात्र कायम दुभंगलेला पूल व्हायचा.
कबूल आहे मला ,बाबाचा वेंधळा ,हट्टी ,गमताड्या स्वभाव कुठेतरी मम्माला दुखावत/सुखावत होता ,तिच्या अपेक्षा ,तिच्या इच्छा ह्यांना काहीशी मुरड पडत होती ...बाबाच्या तर हे गावीही नसायचं ,
नकळत्या वयात माझ्यासमोर हे घडत होत ...आज कळत्या वयात ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला तर
..तर वाटत ,मम्मीची घुसमट होत होती का? बाबाचं नेहेमीच स्वताहात गुरफटून राहाण ,तिच्या अस्तित्वाची जाणीवच नसण ,ह्या गोष्टींचं तिला टेन्शन येतच असणार .......
शिवाय एखाद्या गोष्टीला आपण लावलेली शिस्त कोणीतरी उधळून लावतय हे तिला खटकत असाणार.
बाबाला सुद्धा आपल्या मोकळ्या वागण्यावर कोणी अंकुश ठेवलेला आवडत नसणार. तरी सुद्धा त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. बाबा कोठल्याही गावाहुन येताना त्या गावची स्पेश्यालिटी घेवुन यायचा. मम्मा बाबा घरात नसला तरीही त्याचे कपात आवरुन ठेवायची, त्याला लागणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींचीकाळजी घ्यायची. कधीकधी मम्मा बाबाचे स्वतःचा मुलगा असावा असे लाड करायची. तो येणार असला की त्याचा आवडता गाजर का हलवा बनवायची.
मी हॉस्टेलमध्ये असल्यामुळे हल्ली हल्ली त्यांच्यात काय बिनसले ते माहीत नाही.
पण अचानक डायवोर्स ची बातमी कळाली. ती सुद्धा कामवाल्या रखमाबाइकडून. मी उलट रखमालाच झापले.
पण ती बातमी खरी होती. बाबा घरी यायचा तेंव्हा अबोल असायचा. पानात पडेल ते मुकाट्याने खायचा. माझ्याशी दंगामस्ती , गाणी ऐकणे वगैरे बंदच. नवख्यामाणसाला सुद्धा जाणवेल इतके तंग वातावरण असायचे घरात.
मी बाबाशी याबद्दल एकदा बोलले. त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले ती नजर मला अनोळखी होती.आतून दुखावल्या सारखी. मला भितीच वाटली. तेच मम्माच्या बाबतीत. ती म्हणाली तुला आत्तातरी समजुन घ्यायची गरज नाहिय्ये.
मम्मा देखील आतुन रडत असावी अशा आवाजात म्हणाली. आणि तीने मला घट्ट मिठी मारली." बेटा तू खूप शीक मोठी हो.... मात्र कितीही मोठी झालीस तरी मम्माला विसरु नकोस.... आणि बाबाला तर कधीच नको तो खूप चांगला आहे."
मला कळालेच नाही. आणि नंतर ती स्फुन्दून स्फुन्दून रडायला लागली. मी कसेबसे तीला शांत केले.
बाबाला दुसर्‍या दिवशी फोन वरुन विचारले.त्याने हॅल्लो हॅल्लो हॅल्लो.म्हणत ऐकु न आल्याचा बहाणा करत फोन कट करून टाकला. मला खूप एकटे एकटे वाटायला लागले. मी मग आण्णा अजोबाना फोन केला. ते फोनवर बेटा बेटा बेटा.मोठ्या माणसानी काहिही केले तरी आपल्यावर त्याचा परीणाम होउ द्यायचा नाही. तु युनिव्हर्सिटी च्या परीक्षेच्या तयारीला लाग म्हणत त्यानी विषयांतर केले.
एकदा शनिवार रवीवार जोडून सोमवारी सुट्टी आली. मी थेट अण्णा अजोबांकडे गेले. मला आलेली बघताच अण्णा आजोबा घरातुन बाहेर पडले आज्जीने मला गळामिठी मारली. मल पुन्हा एकदा लहान पिल्लु बाळ झाल्यासारखे वाटले.
सुट्टीत आज्जोबांकडे आम्ही सगळे यायचो ते आठवले. बाबा मला रहाटाने विहीरीतील पाणी ओढून द्यायचा आणि आम्ही थंडे थंडे पानीसे नहाना चाहिये गाणे गात ते शिरशीरी आणणारे गार पाणी डोक्यावरुन घेत खिदळत आंघोळ करायचो.
आज्जी मस्त आलं घातलेला चहा बनवुन द्यायची. मग दुपारी भैरोबाच्या टेकडीवर जायचो. मम्मा घरात आज्जीसोबत घरातच थांबायचे. अन सम्ध्याकाळे मस्त कुळीथाचे पिठले करुन द्यायची.
कधी मम्मा आणि आज्जी सोबत विठ्ठलाच्या देवळात काकड आरतीला जायचो.बाबा आम्हाला चिडवायचा.लोक थंडीत काकडतात म्हणून सकाळच्या आरतीला काकडाअरती म्हणतात.
मम्मा बिचारी देवाचे अगदी मनापासून करायची. अर्थात ती कुठलेली काम करायची ते मनापासूनच. आज्जीच्या डोळ्यात तीचे कौतूक मावत नसायचे.
ममाची गोष्टच वेगळी तिच्या हातच्या स्वैपाकाची चव म्हणजे भन्नाटच. आणि ती तो पदार्थ ताटात देताना सुम्दर पद्धतीने द्यायची. साधे पोहे केले तरी ती त्यावर थोडेसे फरसाण खोबरे कोथिंबीर वर लिंबाची फोड अशी द्यायची.
पिवळे धम्मक पोहे त्यावर पांढरे शुभ्र खोबएर हिरवी कोथिंबीर आनि ती तजेलदार लिंबाची फोड एकदम पिक्चरस वाटायचे.
एकदा बाबाने पोहे केले होते. पोह्यांचा रंग कुठे पांढरा तर कुठे एकदम जर्द पिवळा असा काहितरीच होता. मम्माने हसत हसत ते पोहे दुरुस्त केले ममा वॉज अ‍ॅज युज्वल अ‍ॅट हर बेस्ट. ती आहेच तशी. कुठलाही आणि कितीही बिघडलेला पदार्थ द्या ती त्याचे झकास स्नॅक्स मध्ये रुपांतर करायची. तिच्या हातच्या चवीचा मला मात्र तोटा व्हायचा. शाळेतला डबा माझ्यापेक्षा मैत्रीणीच जास्त फस्त करायच्या.
त्या सुट्टीत माझ्याशी भरपूर गप्पा मारणारे अण्णा आजोबा बहुतेक वेळ घराबाहेरच होते. का कोण जाणे ते काहितरी माझ्यापासून लपवत असावेत.
सोमवारी संध्याकाळी आण्णा आजोबा मला बसला सोडायला आले होते. म्हणाले बेटा गणपतीला प्रार्थना कर . सगळं नीट होउ देत म्हणावे. टाटा करताना स्वतःचे डोळे रुमालाच्या टोकाने टीपत होते. ते असे कधीच करत नाहीत. बिचारे खूप हळवे झालेत आताशा.
मग एक दिवस बाबानेच साम्गितले की त्याने डायव्होर्स चा निर्णय घेतलाय. मी मम्मा कडे पाहीले. ती नजर चुकवत होती. बाबाला काही विचारयचा प्रयत्न केला त्याने देखील नजर चुकवली.
मी मात्र समजत राहीले की हे खोटं आहे . बाबा आपली थट्टा करतोय. पण ती थट्टा नव्हती.
युनिव्हर्सिटीच्या परीक्षा आल्या तशी मी अभ्यासात गुंग झाले. घरचे विचार कमी झाले.
परीक्षा संपली. बाबाचा फोन नाही. मम्माचा फोन नाही. मी घरी फोन केला तर कोणी उचलला नाही. काय कळत नव्हतं काय होत होतं
कशासाठी घेताहेत हे डायव्होर्स? का माझं छोटसं घरटं मोडताहेत? घरट्यावर केवळ ज्यानी ते निर्माण केलं त्यांच हक्क नसतो तर ते ज्यांच्यासाठी निर्माण केल त्यांचाहे तेवढाच हक्क असतो.
मग नक्की अशी काय चूक झाली असेल ? कोणाची झाली असेल? टाळी एका हाताने वाजत नाही. दोघेही तितकेच जबाबदार असतील. प्ण दोघांच्यात माझं काय? मम्मा मुळे मी कॉन्फिडन्ट बनले. बाबामुळे मी आनंद घ्यायला शिकले.
आणि त्या दोघामुळे मी सहवास म्हणजे काय हे शिकले.
बाबाचा फोन आला बाबाचा फोन आला होता. तो काही बोलला नाही. पण फोन त्याचाच होता. मी हॅलो हॅलो करत बसले पलीकडून बोलतच नव्हते. का कोण जाणे पण तो बाबाच होता. बाबाला ती बातमी कळाली असावी. त्याने मला कोर्टात येवु नकोस म्हणून सांगितले होते. मम्मीने सुद्धा तसेच सांगितले होते. मी हॉस्टेलवरच राहीले.
तो फोन आल्यानंतर मी कितीतरी वेळ फोन कानालाच लावून खुर्चीत तशीच बसून राहीले. पाय मणामणाचे असावेत इतके जड झाले होते. अवतीभवती सगळे खोल खोल जात होते...श्शी.......
काय चुकले असावे दोघांचे
बाबाचं नेहेमीच स्वतात गुरफटून राहाण ,मम्माच्या अस्तित्वाची जाणीवच नसण ,ह्या गोष्टींचं मम्माला टेन्शन येतच असणार ....... मम्माची शिस्त बाबाला खटकत असणार......
पण हे सगळं सामंजस्याने नाहीका सोडवता येणार. कोर्ट कशाला हवं त्यात? आणि कोर्ट तरी काय विचार करणार तो फक्त त्या दोघांचाच? माझं आस्तित्वच नाही?
डोकं सुन्न झालय ...नक्की चूक कोणाची आहे ? का केलं असेल असं ? माझा का विचार केला नाही ? मी कुणाकडे रहायचं ? मम्मी ?? कि बाबा??
प्रश्न प्रश्न ...डोक्यात कुणीतरी धार धार शस्त्राने वार करतय ...तरीही मी अजून कोलमडले नाहीये .कदाचित ...कदाचित हे वार झेलायची सवय लावून घेतलीय मी .....
आज पोरकं झाल्याचं फिलिंग येतंय ...मम्मी ..बाबा दोघाही नावाला आहेत असं वाटतंय .....
मला नेहेमीच दोघेही हवे होते ...दोघांच्या कुशीत शिरून झोपायचं होत ...हो ,अगदी आजही ....माझे प्रोब्लेम्स ,माझी सिक्रेट्स मला दोघांसोबत शेअर करायची आहेत. .. बाबा अन मम्माबरोबर पुन्हा एकदा कोकणच्या ट्रीपला जायचंय.
ए बाबा... मला तुझ्या कुशीत शिरुन ती अर्धी राहिलेली राजकुमार अन रानमांजराची गोष्ट ऐकायचीय.
माझ्या गोष्टीत तु राजा असतो अन मम्मा राजकन्या. राजकुमार राक्षसाला हरवतो आणि मग तो राजकन्येशी लग्न करुतो दोघे नंतर सुखात रहातात. माझ्या गोष्टीचा शेवट असाच हवाय....
मम्मा यू आर आयडीयल वुमन फॉर मी........तशीच रहा...... राजकुमार आणि राजकन्येला हरलेलं पहाणं नकोय मला......
तुला एक गाणं ऐकवायचं आहे. एक बटा दो दो बटे चार छोटी छोटी बातों मे बट गया संसार.......
पर्‍याना म्हणे शाप असतो एकटे रहाण्याचा....... तुमच्या खिदळपरीला सुद्धा असेल असाच एखादा शाप.
कुठलीही गोष्ट जोडता येते पण सांधलेला तडा आपलं आस्तित्व दाखवतच रहातो त्यावर कितीही रंगरंगोटीही केली तरी.
माझ्या लाइफ़चा एक अविभाज्य हिस्सा ...आज विभागालाय नव्हे मीच विभागली गेलेय.....पुन्हा जोडता येईल का मला हे नातं ?? की माझीही घुसमटच ........
.

No comments:

Post a Comment