Sunday 17 November 2013

आज तो जीने की तमन्ना है...........

काल डायव्होर्सपेपर वर सह्या केल्या.
एकाच वेळेस खूप मोकळं आणि खूप जड असं काहीतरी वाटलं.
आनंदापेक्षाही गिल्टी जास्त वाटलं.
वाक्यानंतर पूर्णविराम द्यावा आणि वाक्य संपावं तसा आपला वीस वर्षांचा संसार सहजीवन एका सहीने संपले .
रजीस्ट्रारच्या ऑफिसात सह्या करून परत जाताना मी सही केलेल्या पेनचे टोक मोडून टाकले. त्या पेनने काही आणखी पांढर्‍यावर काळे नको व्हायला.
कुठे जायची इच्छा नव्हती. पण गेलो. ऑफिसात क्युबिकलमधे तसाच बसलो. फेसबूक,सेमटाईम सगळीकडे सामसूम होती. कोणी बोलावले नाही. संध्याकाळी घरी जायचीसुद्धा इच्छा नव्हती. बार कडे पाय वळले दोन क्षण तेथे थांबून तसाच परत फिरलो. घराजवळच्या बागेत बसलो. एक प्रकारची सुन्नता होती. बहुतेक मीच सुन्न झालो होतो. खरेतर घटस्फोट दोघानाही हवा होता.माझी ही प्रतीक्रिया मलाच अनभिज्ञ होती. एकदा भांडताना मी म्हणालो होतो तसा खरेतर मी जोरदार पार्टीच्या मूड्मधे असायला हवा होतो.
आपला वीस वर्षांचा सहवास.आपले लग्न पाहून दाखवून झालेले अ‍ॅरेन्ज मॅरेज. लग्ना नंतर दोन्ही घरांचे सूर मस्त जुळले. दाखवण्याच्या कार्यक्रमात तू मला आवडली होतीस असे मी म्हणणार नाही. पण नावडली होतीस असेही नव्हते. पण कोणाशीतरी लग्न करायचेच आहे या भावनेने मी होकार दिला असेही नव्हते.
आपण त्यावेळेस भांडारकर रोडवरच्या हॉटेलात कॉफीसाठी गेलो. तेथे क्लबसँडविच खाताना तू बिंधास्त सँडविचचा एकेक दोन्ही हातात धरून मजेत खात होतीस. तुझे ते नि:संकोच मोकळे वागणे मला आवडले. खरे बोलायचे तर एकदम क्लीक झाले.
त्या नंतर फिरायला जुहू वर गेलो गेटवर गेलो तेथे तुझी वागणे एकदम साधे नि:संकोच होते.थोडेसे मॅच्युअर थोडेसे अवखळ.
मी बोलका ,तू थोडिशी अबोल , मला वाचनाची आवड मित्रांची आवड तुला भरतकाम मेहेंदी ची आवड
मी नाटकाबद्दल बोलायचो. तू फुलझाडांबद्दल. तू देवभोळी.. मी नास्तीक....आपल्या आवडीनिवडी कुठेच जुळत नव्हत्या. मला त्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. लग्ना अगोदर मी एक छोटासा ट्रेक केला होता त्याबद्दल भरभरून लिहीले होते. उत्तरादाखल तुझे पत्र आले त्यात तू माझ्या घरातल्या सर्वांची चौकशी केली होतीस.
पत्रात शेवटी काय लिहावे ते ठरवता आले नसेल बहुते म्हणुन फुलापानांची नक्षी चितारली होतीस.परवापरवा पर्यन्त ते पत्र मी जपून ठेवले होते.
आपले लग्न झाले. मला लग्न साधेसे करायचे होते तुला नातेवाइकांच्या गराड्यात थाटामाटाने वाजतगाजत करायचे होते. धुमधडाक्यात सनईचौघडे वाजले.
फोटोचे अल्बम व्हिडीऑ कॅसेट कितीदातरी पाहिली.तू पूजा करतानाचे देवघरातल्या निरांजनाच्या प्रकाशातले तुझे ते सोनेरी स्वप्नील भाव , धाकटा दीर तुझे पाय धुताना तुझ्या चेहेर्‍यावरचे बावरलेले भाव....लग्नात हार घालायच्या वेळचे तुझे ते कावरेबावरे भाव. रीसेप्शन्च्यावेळच्या वेळेस. मी अल्बम मधे पुन्हापुन्हा पहायचो. तू प्रत्येकवेळेस अधीकच आवडायला लागलीस.
एक गोष्ट जाणवली नव्हती ती आता जाणवतेय. प्रत्येक फोटोत माझ्यापेक्षा तूच जास्त महत्वाची होतीस.
लग्नानंतर लगेचच मी नोकरी सोडली आनि व्यवसाय सुरू केला. तू मला एका शब्दाने विचारले नाहीस. उलट आश्वासक नजरेने मी योग्यच केले अशी पावती दिलीस,
रडखडत चाललेल्या व्यवसायातही तू साथ देत होतीस. जे मिळेस त्यात समाधानी असायचीस. तुझी तक्रार नसायची. "होईल रे... हळूहळू होईल" तू म्हणायचीस.
तुला जेंव्हा पहिल्यांदा दिवस गेले तेंव्हा तू हळूच मला बिलगलीस आणि कानात मोठ्याने सांगितलेस "साला तू तो बाप बन गया......" आणि त्या नंतर मीच लाजलो होतो.
मुलगी झाली ती अगदी हुबेहूब माझ्यासारखी दिसत होती याचा तुलाच जास्त आनंद झाला होता.
तीला खेळवताना . मुलीला घास भरवताना, तीला ए बी सी डी शिकवताना प्रत्येकवेळेस तू मला नव्याने गवसत गेलीस.
व्यवसाय करण्याचा निर्णय चुकला किंवा मी चुकत गेलो. म्हणावे तसे यश मिळत नव्हते ..यश कशाला अपयशच म्हणना.........
माझ्या आर्थीक परीस्थितीबद्दल तुझी तक्रार नव्हती. मी कधी कुरकुर केली तर तू म्हणायचीस "आपल्याला जे मिळतय ते सुद्धा बर्‍याच जणांसाठी स्वप्न असते......." व्यवसायातील अपयशाने मी वैतागायचो. राग तुझ्यावर काढायचो.........तुला त्रास होत असेल माझ्या वागण्याचा............ एकदा मी तुला विचारले होते..तू म्हणालीस " आपल्याला जेंव्हा जेंव्हा खूप त्रास होतो तेंव्हा समजावे की देव आपली परीक्षा घेतोय...." तुझे उत्तर मला बरेच काही शिकवून गेले
व्यसायात यश मिलत नाही म्हणुन तू मला नवे शिक्षण घेण्याचा आग्रह केलास. मी काही कोर्सेस केले. बरेच दिवस नोकरी मिळाली नाही. कधी बोलली नाहीस पण तुझ्या चेहेर्‍यावर उदासी जाणवायची .ज्या दिवशी नोकरी मिळाली. त्या दिवशी नाक्यावरच्या सायबरकॅफेमधे तुला नोकरीचे ऑफरलेटर दाखवले. तुझा खुललेला चेहेरा......आपण एक आईस्क्रीम घेतले दोघानी मिळून खाल्ले. ते आपले सॅलेब्रेशन.
नोकरीसाठी मी बरेच दिवस घराबाहेरच असायचो. आपले बोलणे फोनवर व्हायचे. कधीकधी दोन दोन महीने कधी महिनाभर बाहेरच असायचो. मी येतोय म्हणायचा अवकाश.तू वाट बघायचीस. कधी येण्याची तारीख बदलली म्हणालो की नाराज व्हायचीस.
एकदा असाच तुला सरप्राईज म्हणून मी तुला दिल्लीहून मित्रासोबत एक पार्सल पाठवतोय एअरपोर्टवर घ्यायला जा म्हणुन फोन केला. आणि मी स्वतःच आलो. तू माझ्या मित्राला शोधत होतीस आनि मी समोर दिसलो...... जत्रेत चुकलेल्या लहान मुलाला आईवडील दिसावेत तितका तुला हर्ष झाला होता. कितीतरी वेळ तू हसत होतीस आणि शेवटी तर भोवतालच्या गर्दीची पर्वा न करता तू मला घट्ट मिठी मारलीस. आणो रडायला लागलीस............वेडी.
नोकरीच्या निमित्ताने मला वारंवार घराबाहेर रहावे लागत होते. आता बहुतेक तुला एकटे रहायची सवय लागली असावी. तुझा आग्रह म्हणुन मी मुद्दाम स्थिर / मुम्बैत रहता येईल असा प्रोजेक्ट घेतला. असा प्रोजेक्ट मिळाला म्हणून तू किती आनंदली होतीस. माझ्या आणि तुझ्या आईवडिलाना मुद्दाम आपल्याकडे बोलावून घेतलेस. ते दोनतीन आठवडे आपल्या घरात दिवाळी असावी असा जल्लोश होता.
तुला माझ्या नसण्याची सवय झाली होती. प्रत्येक निर्णय स्वतन्त्रपणे घ्यायची सवय झाली होती.
माझेसुद्धा निर्णय तूच घ्यावे असा तुझा आग्रह असायचा. घरातली प्रत्येक वस्तु तुझ्या निर्णयाने आलेली होती. पैपाहुणे तुझ्या आग्रहाने यायचे. सुरवातीचा बुजरेपणा जावून तुझ्यात एका नवा आत्मविश्वास आलेला पाहून मला खूप बरे वाटायचे . घरात बहुतेक निर्णय तूच घ्यायचीस.कुठे काय ठेवावे कुठे काय ठेवू नये इतकेच काय माझ्य टेबलावर कुठे काय असावे हे देखील तूच पहायचीस.
एव्हरी थिंग वॉज सो मच इन प्लेस........... दॅट यू वॉन्टेड मी ऑल्सो टो स्टे इन प्लेस.......... शोभेच्या बाहुल्यासारखा.
मी कोणाशी काय बोलावे. मी कुठे काय खरेदी करावे. तुझ्या कोणत्या नातेवाईकाना काय म्हणावे .काय वाचावे.......कोणते कपडे घ्यावे हे तूच ठरवायचीस.
आपलं एकदा भांडण झालं टेबलावरचं फ्लॉवरपॉट कुठे ठेवावा यावरून.........कधी जाणवलं नव्हतं पण ते आपल्या सहजीवनातलं पहील भांडण होतं..... आतापर्यन्त मी जे म्हणायचो त्याला तुझी मान्यता असायची. मतभेदच नसायचे....... आता ते छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा व्हायचे. दहावी नंतर मुलीला कोणत्या साईडला घालावे या वरून तू बरेच मुद्दे मांडलेस. तीने आर्ट्स घ्यावे ही माझी इच्छा तर सायन्स घ्यावे ही तुझी. प्रत्येक मतभेदाचा शेवट तुझ्या वाक्यानेच व्हावा हा तुझा आग्रह. वादविवाद नकोत म्हणून मी बर्‍याच निर्णय प्रक्रीयेतून स्वेच्छानिवृती घेतली.
ते सुद्धा तुला आवडले नाही. तुला आता बहुतेक वादविवादाची आवड निर्माण झाली असावी. ........... मी एकदा हे तुला विचारलेसुद्धा.तु म्हणालीस त्यात काय मोठेसे इतकी वर्ष एकटीनेच काढलीत ना.......... आता थोडे जास्त बोलले तर बिघडले काय.
वया परत्वे असेल किंवा कसे......... पण तुझा स्वभाव आता खूप बदलला होता. पूर्वीचा शांतपणाजावू त्याजागी चिडचिडेपणा आला होता. मी हल्ली तुझ्याशी बोलत नाही / भांडण लवकर संपवतो . बरेच दिवसात आपन बाहेर जेवायला गेलो नाही / बाहेर हॉटेलात कशाला पैसे खर्च करायचे त्यापेक्षा घरातच जेवू ....... मी माझ्या आईला आपल्या वादविवादाबद्दल फोन केला / फोन केला नाही. मी मुद्दा कोणत्याही पद्धतीने मांडला तरी तुझ्याकडे वावविवादासाठी दुसरी बाजू तयार असायची.
सततच्या भांडणांमुळे माझ्या कामावर परीणाम व्हायला लागला. ऑफिसात मी फार रीलक्टंट वागू लागलो. परीणाम माझ्या नोकरीतल्या रेटींगवर झाला. मी तसे तुला सुचवलेसुद्दा........ ते तुला पटले नाही. भांडणे चालूच राहिली. दिवसाला किमान चार मुद्द्यांवरून.......... मोबाईल वरूनसुद्धा.
सततच्या भांडणाला कंटाळून असह्य झाले तेंव्हा मी आपण वेगळे राहू म्हणालो.ते सुद्धा तुला मान्य नव्हते. तुझे म्हणणे" लोक काय म्हणतील. मुलीचे शिक्षण व्हायचय लग्न व्हायचय".
मी भांडणे बंद केले त्याचाही तुला राग यायचा.. मी शेळपटासारखा गप्प का बसतो म्हणून भांडायचीस.
हे सगळे सहन करणे माझ्या शक्तीच्या पलीकडले होते. मी संत नाही. शेवटी मी तुझीच युक्ती वापरली तू भांडायला लागलीस की कानात बोळे घालून बसू लागलो. तू वैतागलीस. वेगळे व्हायला तयार झालीस.
कोर्टात डायव्होर्स फाईल केला. मॅरेज काउन्सीलरला आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत फक्त घटस्फोट हवाय असा अर्ज केला.
सह्या करण्यापूर्वी मला तुझ्या बरोबर एक आईस्क्रीम खायचं होतं......... ते जुनं सॅलेब्रेशन आठवून.
एकदाच्या सह्या झाल्या. तू मला मी तुला परके झालो.
घटस्फोटाची केस तू दाखल केलीस. जिंकलीस.मला ना जिंकण्याचा आनंद ना हरण्याचा खेद.
एक शून्यता घेवून बसलोय हातात.
पण खरं सांगू शून्यावर कितीही शून्य मांडली तरी त्याची किम्मत शून्यच रहाते.
कोर्टात त्यांचा निर्णय बदलावा यासाठी मी अर्ज करणार नाहिय्ये. मला तुला जिंकण्याचा पुन्हा एकही चान्स द्यायचा नाहिय्ये. तेवढे तरी मी करू शकतो. करणार आहे.
बाकी विचार उद्या करेन म्हणतो .......... मनाने जिवंत असलो तर.

No comments:

Post a Comment