Sunday 17 November 2013

एक बटा दो.......दो बटे चार..... (1)

क बटा दो.दो बटे चार छोटी छोटी बातो मे बट गया संसार.
नही बटेगा नही बटेगा मम्मी डॅडी का प्यार ओ मम्मी डॅडी का प्यार.........
एफ एम वर गाणं लागलय. माझं आवडीचं.लहानपणापासून अगदी आवडीचं. प्यार म्हणजे काय हे न कळायच्या वयात कुठल्या तरी पिक्चर मध्ये कोण्या लहान मुलानी म्हंटलेले गाणं. मी समाजाच्या कार्यक्रमात त्यावर डान्स देखील केला होता.
बाबाने त्याचे चिक्कार फोटो काढून ठेवले होते.. हे गाणं लागलं की मी नेहमीच एकदम खुशीत असायचे. आज मात्र वाटतय कशाला लागलं हे गाणं. त्यातले शब्द मला खिजवताहेत. जणू काही माझा पराभव बघून हसताहेत.
बाबाचा फोन आला होता. तो काही बोलला नाही. पण फोन त्याचाच होता. मी हॅलो हॅलो करत बसले पलीकडून बोलतच नव्हते. का कोण जाणे पण तो बाबाच होता. बाबाला ती बातमी कळाली असावी. त्याने मला कोर्टात येवु नकोस म्हणून सांगितले होते. मम्मीने सुद्धा तसेच सांगितले होते. मी हॉस्टेलवरच राहीले.
तो फोन आल्यानंतर मी कितीतरी वेळ फोन कानालाच लावून खुर्चीत तशीच बसून राहीले. पाय मणामणाचे असावेत इतके जड झाले होते. अवतीभवती सगळे खोल खोल जात होते...श्शी.......
स्वतःवर इतका राग येत होता. की सगळी रूम पेटवून द्यावी , खाली जाउन कोणालातरी चाकूने भोसकून काढावेसे वाटत होते. समोर येइल त्याला सणासण्ण थोबाडीत मारावे बोचकारुन काढावेसे वाटत होते. मी यातले काहीच न करता तश्शीच बसून राहिले. चेहेर्‍यावर हात ठेवून हमसून हमसून रडत राहीले. किती वेळ गेला माहीत नाही.... मी सुन्न झाले होते.
कोणीतरी माझ्या डोक्यावरुन हात फिरवत होते..... "ए काय झाले. मनु मनु.काय झाले काय झालं रडायला" सुप्रीया मला उठवत होती. बिचारीला बहुतेक सगळं न विचारताच समजलं असावे. तिने माझ्याकडे पाहिले..... अन तीही माझ्या गळ्यात पडून रडू लागली.........
काही वेळ गेला असेल सुप्रीया ने मला सावरले. मला म्हणाली काही बोलु नकोस.
सुप्रीया....... मम्मी बाबानी घटस्फोट घेतला. ते सेपरेट झालेत. बोलताना माझा आवाज मलाच अनोळखी वाटत होता. कुणीतरी त्रयस्थाने बोलल्या सारखे.
ते वेगळे झाले तरीही ते तुझे मम्मी बाबाच आहेत अजून. तुझे त्यांचे रीलेशन चेंज झाले नाहिय्ये.
सुप्रीया बरेच काहीतरी बोलत होती. माझी समजूत घालत होती. मला भातुकलीची भिंत मोडल्यासारखी वाटतय.
सुन्न / वाईट / सुटका / राग /दु:ख / सगळ्या भावना एकाच वेळेस येताहेत. अगदी जीवापाड जपलेलं खेळणं कोणीतरी मोडून टाकावं तसं.
मम्मी अन बाबा माझे सर्वस्व होते.. त्याने असे का केले. बॅडमिम्टन च्या मॅचमधे सपाटून हरल्या सारखे वाटतय.
आठवायला लागलं तेंव्हापासून मी बाबा सोबत खूप खेळायचे. लहानपणच्या बहुतेक फोटोत मी बाबाच्याच खांद्यावर नाहीतर कडेवर आहे.बाबा माझ्या बरोबर नेहमीच असायचा अगदी मी पहिल्या दिवशी कॉलेजला गेले तेंव्हापर्यन्त.
शाळेतल्या मैत्रीणींसोबत ज्या गप्पा व्हायच्या त्या सुद्धा मी बाबासोबत शेअर करायचे. अन बाबासुद्धा माझ्या सोबत बिन्धास्त असायचा. घार बाबा असला की घराचे नुसते खेळायचे ग्राउंड व्हायचे.मम्मा अक्शरशः वैतागायची. तीला घर आवरता आवरता नाकी नऊ यायचे.
माझ्या कपाटात एक फोटो आहे. मस्त पांढरा शुभ्र परी सारखा ड्रेस मध्ये. बहुतेक चौथीत असेन. परीसाठी मला कपाळावर चंदेरी चांदणी लावायची होती. ती चांदणी आणायला बाबाला दिवसभर वेळ मिळाला नसावा.त्याने माझ्या समोर मॅगी च्या पॅक मधली फॉईल कात्री ने कापून मस्त चांदणी बनवली. म्हणाला बघ कुणाकडेच नसेल अशी चांदणी. मी ती चांदणी लावून अ‍ॅन्युअल डे चा नाच केला. त्यावेळचा फोटो आहे. बाबाचे डोके भन्नाट चालते. विशेषतः अशा अडचणीच्या वेळेस.
बाबा तसा जाम जॉली. एकदम खुशीत असायचा. मी लहान असताना त्याच्या ऑफिसात जायचे. तेथे खूप कागद असायचे.
तिथला पेपर वेट मला खूप आवडायचा. त्यातली झाडांची नक्षी काही वेगळीच वाटायची. बाबा तो काचेचा पेपर वेट डोळ्या समोर धरुन त्यात निळे जांभळे सप्तरंग दाखवायचा. भुगोलाचे पुस्तक बाबाचे आवडएत पुस्तक. पण तो त्यातल्या अभ्यासाला सिंदबादच्या गोष्टींची जोड द्यायचा. अभ्यास न होता नुसतीस धम्माल व्हायची.
मम्माची गोष्टच वेगळी . तीला प्रत्येक गोष्ट जिथल्या तेथे हवी असायची. माझी पुस्तके कम्पास स्कूल्बॅग सगळं कसं जागच्या जागी हवं असायचं.
बाबा त्या उलट. एकदम बिन्धास्त. ट्रीपला निघालो तर जिथे जायचे ठरवले आहे ते ठिकाण ऐन वेळेस बदलायचा. एकदा लोणावळ्याला जायचे ठरवले. त्याला काय वाटले कोणास ठाऊक. खोपोली आल्यावर त्याने महडच्या गणपतीला जायचे का विचारले. महड झाल्यावर पालीच्या गणपतीला जाउ म्हणाला. तेथून मग त्याने उंबरखिंड दाखवतो म्हणत गाडी थेट सरळ तिकडे नेली. शिवाजी महाराजांची ती उंबरखिंडीतली लढाई त्याने अक्षरशः जिवंत केली. कारतलबखान, त्याचे ते अफाट सैन्य , सैन्याच्या अग्रभागी असलेली रायबाघन आणि ती मावळ्यांची छोटीशी फौज. सगळे डोळ्यासमोर उभे राहीले. इतिहासाचे ते पान आमच्या समोर वर्तमान होऊन आले. मी तर जीवाचे कान करून ऐकत होते. बहुतेक त्या दिवशी बाबाच्या अंगात शिवाजी चे मावळे संचारले असावेत. घरी येताना मला बाबा शिवाजीच्या सैन्यातला अधिकारी वाटत होता...... गाडीत मी पेंगुळले तरी डोक्यात तलवारींचा खणखणाट.... आणि तोफांचे आवाज निनादत होते. शाळेत आठवडाभर मी त्याच धुंदीत वागत होते.

No comments:

Post a Comment