Saturday 14 December 2013

डिसेंबर (1)

ऐन डिसेंबरात आभाळ दाटून आलंय. ते तसे नेहमी एखाद्या दिवशी होतंच. "डिसेंबर" खरं तर मासानां मार्गोशीर्षोहमः म्हणावा असा. डिसेंबर म्हणजे नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली असते. सुट्टी संपवून शाळा कॉलेजे रुळावर येत असतात. गॅदरिंग चे वेध लागलेले असतात. दिवाळीच्या सुट्टीचा म्हणा की मस्त थंड हवेचा परीणाम म्हणा बहुतेक जण दुपारी सुद्धा उत्साही असतात. घरी कसाबसा एखादा कप चहा पिणारे मस्त पैकी आलं टाकून केलेल्या वाफाळत्या चहाचे दोन तीन राउंड सहज करतात.
सकाळचे कॉलेज असणारांची तर एक वेगळीच मजा असते. भल्या पहाटे अंथरुणावरुन बाहेर पडायची इच्छा नसते. गोधडीवर गोधडी "एक पाच मिनीटानी उठु" म्हणत पुन्हा गुडूप झोपतात. अशा घोरासूराना उठवायची एक मस्त ट्रीक कामी येते. घरभर वाफाळत्या आल्याच्या चहाचा सुवास दरवळतो. त्या मस्त गंधाने गारठा माघार घेतो. आपण एकदम फ्रेश होतो. मरगळ कुठे गायबते ते समजत देखील नाही. सुस्ती एकदम जादु झाल्यासारखी नाहीशी होते.
कॉलेज मधे तर एक वेगळाच माहौल असतो. एरवी काकूबाई छाप डार्क बदामी ,लाईट ग्रे, फिक्का मरून , असल्या मळखाउ रंगाना हद्दपार केलेले असते. पोपटी केशरी गुलाबी लाल जांभळा लेमन यलो अशा उत्साही रंगांची झगमग सुरु झालेली असते.
असे रंगीबेरंगी कपडे अंगावर असले की उत्साह अजूनच वाढतो.
कॉलेज कॅन्टीनला तिखट जाळ वडापाव आण गरमागरम कटिंग चहाच्या साक्षीने पीजे अर्थात डबड्या जोक्स च्या मैफिली सुरु होतात. एकातुन एक त्यातून अजून एक असे विषय निघत जातात. थेट मागच्या वर्षीच्या गॅदरिंग पर्यन्त जातो. गॅदरिंग च्या नाटकात काय धमाल झाली होती पासून लीना प्रधान ला मिळालेले फिशपाँड पर्यन्त चर्चा होत रहाते. या वर्षी देण्यासाठी जिलब्या पाडाव्या तशा चारोळ्या पडत असतात. गॅदरिंगच्या ऑर्केस्ट्रात दर वर्षी गायले जाणारे "दोनो ने किया था प्यार मगर. मुझे याद रहा तू भूल गया..... मैने तेरे लिये रे जग छोडा......" हे गाणे कोण गाणार याच्या चर्चा झडतात.
फर्स्ट इयर च्या मुलाना याची कल्पना नसते. त्यामुळे त्याना नईलाजाने ऑडियन्सची भूमिका घ्यावी लागते. पण त्यांच्या चेहेर्‍यावरची उत्सूकता आणि डोळ्यातील चमक बरेच काही सांगून जाते. आपणही हे असले क्षण मनात टीपत असतो.
गॅदरिंग मिस करायचे नाही. हा डोक्यातला विचार चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत असतो.
डिसेंबर महिन्यातील हवेचा परीणाम असो की नुकत्याच संपलेल्या दिवाळीचा. वातावरणात एक वेगळीच जादू असते.
नक्की काय ते सांगता येणार नाही.
चला आला धुंदूर मास. म्हणत आज्जी कधी गुळ घालुन मस्त गोडसर बाजरीच्या भाकर्‍या अन हिरव्या मिरच्यांचा ठेचा करायची. हिरव्या मिरचीचा सणसणीत तिखटजाळ कमी व्हावा म्हणुन सोबतीला ताटात लोण्याचा गोळा असायचा.
कच्चा कांदा मिर्चीचा ठेचा बाजरीची भाकरी अन सोबत तो लोण्याचा पांढरा शूभ्र गोळा. ही माझ्या लेखी तरी सर्वोच्च चैन आहे. कोणी डिसेंबर असे नुसते म्हंटले तरी मला त्या बाजरीच्या भाकरीचा खरपूस वास येतो.
डिसेंबरात लग्नांचा सुकाळ असतो. त्यामुळे बरेच महीने न भेटलेले सगे सोयरे मित्र नातेवाईक भेटत असतात. भेटल्यावर गप्पाना अक्षरश ऊत येतो. " अरे हो....... सकाळी लवकर उठायचे आहे." म्हणत रात्री किमान एक दीड पर्यन्त गप्पांचा जागर सुरूच रहातो.
डिसेंबर असतो स्नेह सम्मेलने काव्य सम्मेलने पुस्तक जत्रा आणि अशाच बर्‍याच सम्मेलनांचा. एकीकडे एकांकिका स्पर्धा. त्यातले ते जग वेगळेच असते. सदैव कसल्यातरी अचाट विचारानी भारलेलं. फुटकळ रोल असला तरी तो रोल ही पुढच्या भवितव्याची नांदी आहे या ठाम विश्वासावर अर्ध्या पाऊण तास चालणार्‍या एकांकिकेत नवं जग उभे करत त्यात जान ओतण्याचं सामर्थ्य त्या विश्वासत असते..
गावोगावी कोणती ना कोणती साहित्य सम्मेलने भरवली जातात. त्या निमित्ताने मोरोपंतांपासून नायगावकरांपर्यन्त नावे उगाळली जातात. त्यायल्या एखाद्या कार्यक्रमात शाळेत आठवी नववीत शिकलेली "नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूस.. माझे घर चंद्रमौळी .आणि दाराशी सायली.." ही इंदीरा संतांची कविता ही कविता संतूरच्या पार्श्व भूमीवर ऐकताना नव्याने भेटत जाते. कवितेचा शब्द न शब्द अंगभर संतुरचे झंकार उमटवतो.
डिसेंबर हा महिना गाण्याच्या, संगीताच्या मैफलींचा. नव्या जुन्या गायकाना ऐकण्याचा. त्या निमित्ताने पूर्वी ऐकलेल्या कुमार गंधर्व,शोभा गुर्टू, जसराज्, भीमसेन जोशी यांच्या मैफलींच्या आठवणीना उजाळा देण्याचा. हरीप्रसाद चौरसियांच्या बासरीवर ऐकलेला मालकंस, शिवकुमार शर्मानी संतूरवर छेडलेला हंसध्वनी आणि त्याला झाकीर हुसेन नी केलेली दणकेबाज साथ. त्याला मिळालेली टाळ्यांची छप्परफाड दाद. यांचे गारूड मानगुटीवरून उतरता उतरत नाही.
अशाच एखाद्या कार्यक्रमा कोणीतरी "आज जाने की जीद ना करो." ऐकवतं "रंजीशे सही......" ऐकवतं आपण पार हरवून जातो आणि नंतर स्वतःला कशाकशात शोधत रहातो.
डिसेंबर महिना असतो आकाशाचा. स्वच्छ निरभ्र आभाळ पहाण्याचा. शाळेत लहान असतानी मी निरभ्र या शब्दाचा अर्थ "निरभ्र म्हणजे अभ्रा न घातलेला" असा सांगितला होता. ते माझं निरभ्र वय होतं. कुठलाच अभ्रा, आवरण न चढवलेलं. जसं आहे तसं. डिसेंबरातलं आकाश तसंच असतं. डिसेंबरात संध्याकाळी मावळतीचं सूर्यबिंब दिसतं. ते जाणवतं ते त्याच्या पार्श्व भूमीवर उडणार्‍या पतंगाच्या हालचालीने. ईग्रजी व्ही च्या आकारात आकाशात उडणार्‍या बगळ्यांच्या माळे मुळे. डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात. हे कमी पडेल वाटले म्हणून की काय वृश्चिक राशी इंग्रजी एस आकारात आकाश व्यापून त्यातल्या अनुराधा मूळ ज्येष्ठा नक्षत्रानी दिवाळी साजरी करत असते.

No comments:

Post a Comment