Monday, 13 June 2011

माझा झंपक पणा

त्या दिवशी सेशन जरासे लांबलेच. लोकांचे प्रश्न जसे संपतच नव्हते.
सगळे आटोपुन पुण्यातून निघायला रात्रीचे साडेनऊ वाजले.
स्वारगेटवर येऊन बस पकडली.
बसने कात्रज पार केले कंडक्टरने तिकिटे सर्वाना दिली गेल्याची खात्री केली आणि स्वतःचे हिषोब संपवुन गाडीतले दिवे बंद केले.
सेशन जोरदार झाला होता थोडे थकल्यासारखे झाले होते पण एखादे सेशन मनासारखे झाल्यानन्तर जो उत्साह असतो तसाच उत्साह वाटत होता.त्यामुळे झोप लागायचा प्रश्नच नव्हता.
काही वाचायचे तर अंधारात वाचायचे कसे. मी सेशनची उजळणी करत बसलो. एका श्रोत्याने एक मस्त प्रश्न विचारला होता. मी थोडासा अडखळलोच होतो त्यावर .
बोलताना मी म्हणालो होतो की आपली प्रत्येक गोष्ट ही रूटीन बनलेली असते. जेवण , कपडे , मित्र , पुस्तके या सर्वांचा एक पॅटर्न ठरुन जातो आणि सगळ्या गोष्टी साचेबंद होतात. आपल्या जगण्यात थोडे वेगळेपण असले तर जीवनाचा आनन्द घेता येतो.
त्या श्रोत्याने विचारले साचेबंदपणा कसा काय म्हणता? मग रोज जेवण घ्यायचे नाही काय. रोजच्या जेवणात आपण कुठे तेचतेच खातो. ते वेगळेवेगळे असतेच की.
आपण टीव्ही बघतो. तो वेगळेपणाच असतो.
तो म्हणत होता त्यात तथ्य होते.
तुमचे बरोबर आहे पण आपण जो विचार करतो त्याच्यात ही साचेबंदपणा आलेला असतो. उदा मनोरंजन सुद्धा आपण एका ठरावीक प्रकारचेच अपेक्षीत ठेवतो .
जेवताना आपल्याला जे पदार्थ नक्की माहित असतात तेच चाखतो. आवडते आणि नावडते देखील. रोज एका ठरावीक वेळेसच जेवतो. बरीच कुटुंबे शनिवारी संध्याकाळी हॉटेलात जातात. फ्रीक्वेन्सी थोडी कमी पण तरीही फ्रीक्वेन्सी ना.
बोलण्याच्या नादात मीथोडा पुढे गेलो आणि म्हणालो सेक्स/ कामजीवन हे सुद्धा आपल्यासाठी एक रूटीन बनलेले असते. मी कित्येक जोडपी अशी पाहिली आहेत की जी ठरावीक फ्रीक्वेन्सीने कामजीवन उपभोगतात. त्याचा ही मग कंटाळा येतो. खरे तर त्या रुटीनचा ठरावीक चाकोरीचा कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आयुष्य नीरस वाटू लागते.
माणूस हे यंत्र नव्हे. पण आपण कामजीवन यंत्रवत जगतो.
त्या श्रोत्याने एकदम विचारले....त्यात बदल कसा आणणार? आणि सगळे हसले.
मी म्हणालो की आपण जे जगतो त्यातला साचेबंदपणा सोडण्यासाठी जे करतो त्यात बदल हवा
म्हणजे.....?
म्हणजे की आपण आनन्द ज्या पद्धतीने उपभोगतो त्यात थोडा बदल हवा. बाह्य साधने बदलण्यापेक्षा आपण आपल्या वृत्तीत बदल करायला हवा.
उदा: आपण विनोदसुद्धा एका ठरावीक पद्धतीचेच ऐकतो त्याचा पॅटर्न ठरलेला असतो. गम्मत करतो त्याचाही पॅटर्न ठरलेला असतो. कधितरी आपण आपल्या वयाला शोभेल असे न वागता लहान मुलांसारखे वागून पाहूयात त्यांच्या सारखी गम्मत करुयात. आपले जगण्यातले रूटीन मोडले की जगणे आनन्ददायी ठरते.
त्यानन्तर थोड्याशा इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. कार्यक्रम आटोपल्यानन्तरही लोकांचे नेहमीप्रमाणे स्वतःच्या समस्यांशी निगडीत खाजगी प्रश्न झाले.
आणि मी निघालो.
विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधला माझ्या उत्तरांमधला आता साचेबंदपणा येत चालला होता.
काहीतरी वेगळे करुन बघायचे म्हणजे तरी काय?
मी माझ्याच विचारांत होतो. त्या अंधारात अचानक मला माझ्याकडे कोणीतरी रोखून टक लावून बघतय अशी जाणी झाली. मी इकडे तिकडे पाहिले.
बहुतेकजण एस्टीच्या तालावर मानाहलवत गाढ झोपले होते.
लोकाना बघता बघता माझे लक्ष्य समोरच्या सीटवरच्या दोन बायकांकडे गेले. ड्राव्हरच्या मागच्या उलट्या सीटवर बसलेल्या असल्या त्या दोघीना बसमधले सर्व चेहेरे दिसत असावेत. त्यांचे डोळे विलक्षण तेजाने चमकत होते. कुत्र्या मांजरांचे डोळे चमकतातना तसे काहिसे.
मला बहुते भास झाला असावा. मी पुन्हा त्यांच्या कडे पाहिले.त्या दोघींच्या माना हलत होत्या पण डोळे मात्र चमकत होते.
या बाया डोळे सताड उघदे टाकून झोपल्यात की काय मी मनात म्हणालो.
मनातले कुतुहल स्वस्थ बसु देईना. मी नीट निरखून पाहिले.
त्या दोघी झोपलेल्याच होत्या. त्यांच्या मिटलेल्या पापण्यांवर बसमधल्या निळ्या लाईटचा उजेड पडून त्या चकाकत होत्या.
मला मी घेतलेल्या कुशंकांचे हसू आले ....
घरी पोचलो. आणि त्या चमकत्या पापण्यां आठवतच हसत झोपलो.
सकाळी भल्या पहाटेच जाग आली. बहुधा पाच वाजले असावेत. अचानक एक भन्नाट आयडीय सुचली.
गम्मतीत थोडे नाविन्य आणले तर?
मी माझ्या मुलीची गम्मत करायची ठरवली.
तिच्या वॉटरकलरच्या बॉक्समधून पांढरा रंग ब्रशने माझ्या पापण्याना लावला. त्यावर दोन्ही पापण्यांवर काळी भरीव वर्तुळे काढली.
आता पापण्या मिटल्यावर त्यावर रंगवलेले वटारलेले डोळे दिसत होते. आरशात एकेक डोळा बंद करून खात्री करून घेतली.
हॉल मध्ये जाऊन झोपलो. थोड्या वेळाने माझी मुलगी येईल आणि ती मला उठवयाला येळ त्यावेळी धमाल गम्मत येईल अशा विचारत मी डोळे मिटले.
थोड्या वेळाने माझ्या वडीलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. मी जागा झालो वडील ते उभे होते त्या जागीच मोठ्याने ओरडत होते . ते खूप घाबरले होते. त्याना दरदरून घाम फुटला होता. मी त्यांच्या जवळ जायला लागलो तसे ते भूत पाहिल्यासारखे अजूनच जोरजोराने ओरडू लागले.
माझ्या रंगवलेल्या वटारल्या डोळ्यांचा तो परीणाम होता.
मी लहान असतो तर नक्की धपाटे खाल्ले असते या असल्या मस्करी साठी.
घरातले सगळे गोळा झाले ते आमच्या दोघांचे अवतार बघून खोखो हसू लागले.
आई ने डोक्याला हात लावला म्हणाली. झंपकच आहेस तू. इवढा मोठा झालास तरी अजून लहान मुलांसारखा राहिलास.
तो झंपकपणा आज आठवला तरी सगळेच जण कितीही मरगळलेलो असलो तरी एकदम रीफ्रेश होतो.

Sunday, 5 June 2011

पायर्‍यांची विहीर

विहीरीला पायर्‍या असतात.
मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली.
तीला पायर्‍या होत्या .त्याना पायर्‍या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो.
काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्‍यांची विहीर बघायला गेलो. आणि एक भूलोकीचा चमत्कार पहातोय असेच वाटले.
इस १४९९ मध्ये कोण्या रुडाबाईने दुश्काळी काम म्हणून बाम्धून घेतलेल्या या विहीरी चे बांधकाम एक चमत्कारच आहे.
गेली पाचशे वर्षे हा चमत्कार इथल्या लोकानी साम्भाळून ठेवलेला आहे.
गुजरातमध्ये दुश्काळ पडलेला होता. जनतेला रोजगार मिळावा म्हणून वीरसिंह वाघेला राजाच्या राणीने ही विहीर बांधवून घेतली. थोडिशी जैन शैलीची थोडीशी हडप्पन शैलीची ही विहीर.
पाच मजले असलेली विहीर असे म्हम्तले तर आपल्या डोळ्यासमोर काहीच उभे रहात नाही.
त्या जागेवर जाईपर्यन्त काहीच कळत नाही. बाहेर लावलेला बोर्ड पाहूनही काही खुलासा होत नाही.
adalaj waw 1
आपण एका देखण्या प्रवेशद्वारातून पायर्‍या उतरायला लागतो
2
पुढे येणारे दृष्य काय असेल याची अजूनही कल्पना येत नाही
3
आणि शब्द सापडणार नाहीत असे एक भव्य शिल्प दिसायला लागते
4
पाच मजले जमिनीखाली असलेले हे बाम्धकाम म्हणजे कल्पनेचा एक सुंदर खेळ आहे.
भर उन्हातून जाणार्‍या वाटसरुना साधू सन्यासाना घटकाभर विसावा घेता येईल ताजे तवाने होता येईल या उद्देशाने रुडाबाईने ही विहीर बांधली
इथे बाम्धकामुळे उन सावलीचा एक मजेशीर खेळ सुरू होतो.
आणि त्यामुळे जमिनीखाली पाच मजले असूनही हवा आणि उजेड खेळते रहातात
5
स्ट्रक्चरल सौंदर्य म्हनजे काय याची अनुभूती घेत आपण खाली उतरत रहातो
6
भिंतीवरील नक्षी ,आणि भुमिती ची मजा एकाच वेळेस घेता येते
7
आणि मग बांधकामा मधले एक एक चमत्कार बघायला मिळतात.
8
त्याकाळच्या इंजिनीयरिम्गची कमाल. स्प्रिंगप्रमाणे गोलाकार स्पायरल वळणे घेत खाली उतरणारा हा दगडी जिना. एकावर एक रचलेल्या दगडांची टोके एकमेकात फसवून चुना न वापरता केलेले हे बांधकाम अती अद्भुत आहे.
9
वावाटसरूला स्वच्छा पाणी मिळावे म्हणून रचलेली ही विहीर
10
इथून लवकर पाय निघत नाही.
11
या विहीरीत हजारभ सैन्य सहज सामावू शकायचे.
या वविहीरीचे बांधकाम वीस वर्षे चालले होते. कडक उन्हाळ्यातही विहीर आटत नाही.
एका दंतकथे नुसार सुलतान बाघेराने राजा वीरसिंह वाघेलाचापराभव केला आणि रुडाबाईसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला
रुडाबाईने विहीरीचे बांधकाम पूर्ण करू दे . ते झाल्यावर लग्न करेन असे वचन दिले.
सुलताना ने जेंव्हा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तेंव्हा रुडाबाईने ( रुडा या जुन्या गुजराथी शब्दाचा अर्थ " चांगली") त्या विहीरीत जीव देऊन आपली आयूष्ययात्रा संपवली.
सुलतानाने चिडून विहीर बांधणार्‍या कारागीरांचा वध केला.

Wednesday, 1 June 2011

वर्तमान

काल मी तेथे फुलांच्या देशात होतो
फुलपाखरांना पहाताना तुला शोधीत होतो
गवसले तेथे एक गुढ काय मला
ते पाहून पुन्हा पुन्हा बेभान होत होतो.
सांगता न येते ते मला काय होते
रंध्रातुनी माझ्या आनंदे वहात होते.
प्रत्येक फुलात तूच तूच होतीस
ऐसा गोड आभास अनुभवत होतो
मी गात गाणे देवाला आळवीत होतो
र्‍हदयातील भावना तुला कळवीत होतो
सखये रोज तुला मी तेथे ऐसाच भेटत असतो
आठवणींच्या पुस्तकातले वर्तमान जगत असतो

Tuesday, 24 May 2011

स्वर्गाची सहल

या दिवाळीत सहलीसाठी चक्क स्वर्गात जायचे असे ठरवले. त्या प्रमाणे एका दिवशी भल्या सकाळी निघालो. सातार्‍याच्या खिंडीतल्या गणपतीबाप्पा ला जाताजाता डावीकडे न वळता उजवीकडे सज्जन गडाकडे वळालो. सज्जन गड मागे टाकून चाळकेवाडी ला आलो.
येथे पवनचक्क्यांचे जंगल आहे. उसाच्या शेतात उभे रहावे तसे आम्ही पवनचक्क्यांच्या शेतात उभे होतो
pavanchakki
हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच.
इथला भन्नाट वारा आणि रानफुले. कास पठारासारखेच हे सुद्धा वॅली ऑफ फ्लॉवर्स आहे.
fule
इथे काही वनस्पती चक्क मांसाहारी आहेत. त्या किडे खातात. किडे फुलाना चिकटतात आणि तेथेच विरघळतात.
मी गेलो तेंव्हा फुलांचा बहर ओसरला होता.
पण काही म्हणा या सानुल्या गवतफुलांची ऐट काही औरच
fule2
येथून पुढे पठारावरून रस्ता नसलेल्या भागातून विचारत विचारत येड्यासारखे गाडी रेटत पुढे गेलो. हा रस्ता पुढे पाटणला उतरतो
पाटणहून पुढे चिपलूण रस्त्याला लागल्यावर पुढे कोयनानगर लागते. नेहरू गार्डनला उजव्या बाजूला ठेवत थोडे पुढे गेलो की मग विशाल शिवसागर सुरु होतो. तुमचे डोळे पोहोचतील तिकडे हिरव्या रंगाच्या लक्षावधी छटा दिसू लागतात.
green1
त्या सागरनिळ्या हिरव्या रंगाचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे
green2
कोयनानगरचा निसर्ग काहीही हातचे राखून ठेवत नाही. तो मुक्त हाताने उधळण करत असतो. आपल्या पिशवीतलीएकेक रत्ने उलगडून दाखवत असतो
green3
कुबेराने खजीना उघडावा त्यातला पाचूचा कप्पा आपल्याला देऊन टाकावा आणि चल घे ऐश कर म्हणावे तशा थाटात हा खजिना आपल्या पुढ्यात येत असतो.
kuber
कधी अवखळ बनून मस्ती करत तर कधी एकदम घनगंभीर होत ;
निसर्ग आपल्या समोर वेगवेगळ्या रुपात येतच रहातो.
green4
यातले कोणते रूप डोळ्यात साठवु आणि कोणते राखीव ठेवु हे ठरवताच येत नाही
खरच निसर्ग जे लिहितो ते गद्य पद्य अशा शब्दात मांडताच येत नाही . जे असते ते सर्व हृद्यच असते.
GADYA PADYA
आकाशाचा निळा गवताचा पिवळसर हिरवा. पालवीला आलेल्या फांदीचा तांबूस हिरवा. जुन्या पानाचा कच्च हिरवा. मधूनच पोपटी झाक मिरवणारी नवी पाने. अशी काही सरमिसळ होते की सांगता येत नाही
RANG
शिवसागराच्या आरस्पानी पाण्याच्या परिणामामुळे काही वेगळीच जादू होत असते
pani
हवेत इतका उत्साह असतो की त्यापुढे मध्यानीचा सूर्य सुद्धा शीतळ भासू लागतो
surya
बोट हळुहळु आपल्या कोयनेच्या जंगलाकडे नेत असते.
boat boat2
इथले काही जंगल हे मुद्दाम लावलेले आहे.
JANGLE4
उघड्याबोडक्या डोंगराना पहायची सवय असलेले डोळे .
त्याना ही मेजवानी च होती JANGLE2
ते जरा कमी घनदाट आहे. पण घनदाट म्हणजे नक्की काय हे इथे येऊनच पहावे
JANGLE JANGLE5
त्याहून पुढे वासोटा बाजूला गेले की नैसर्गीक जंगल पहायला मिळते. त्यासाठी बोटीने दोन तास प्रवास करावा लागतो.
या जंगलात बिबटे ,अस्वले, ससे, खारी ,कुत्री, तरस असे अनेक प्राणी आहेत. पण ते बहुतेकदा उन्हाळ्यात तलावाच्या काठाशी पाणी प्यायला आल्यावर पहायला मिळतात. जंगलात पाणी असताना प्राणी बाहेर फारसे पडतच नाहीत.
दूरचे हिरवे डोंगर, हिरवे लुसलुशीत गवत नितळ पाणी स्चच्छ आकाश प्रदुषण मुक्त हवा..परत जायला येथून पाय निघत नाही
आपण या चित्रमय निसर्गातलेच एक होऊन जातो.
DONGAR
पण नाईलाज असतो. अजून बरेच काही पहायचे बाकी असते.
kade
निसरडे कडे. अक्षरशः उभ्या चढणीचे डोंगर त्यातून अव्याहत कोसळणारे गडगडाटी धबधबे हे निसर्गाचे रौद्र रूप पाहून घाबरायला होते.
dhabadhaba
पण ते काहीसे आपल्या आजोबांसारखे ....... नातवाला अंगाखांद्यावर खेळवताना उग्र मिशाळ चेहेर्‍याच्या मागे कौतूक भरलेले असते.
dhabadhaba
परतीचे वेध लागलेले असतात. उन्हे उतरु लागलेली असतात. पण पाऊल निघत नाही. निसर्गावर दुपारच्या उन्हाने काही वेगळेच रंग चढवलेले असतातdupar
खरे तर इथून शहरात परत जायला आम्ही सर्वच नाखूष होतो. निसर्गसुद्धा या रे बसा रे जाल रे आत्ता आलात आन आत्ता लगेच कुठे निघालात असेच म्हणत असतो. तो आग्रह मोडवत नाही. पाऊल धबधब्यात थोडेसे विसावते.
dhabadhaba2

एक धागा सूखाचा

प्रेमचंदांची  एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली...
दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम
हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट.
शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय....
अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली. दार थडाथडा आउअटू लागले.
बोचरी थंडी आणि वारा आत येऊ लागला...
पहिल्या मित्राने दुसर्‍याला सांगितले....
जरा दार बंद करतोस का.
दुसरा म्हणाला ...मी दमलोय वणवण भटकून. शिवाय सकाळपासून अन्नाचा कण नाही गेला पोटात.
"माझी काय वेगळी परिस्थिती आहे " पहिला म्हणाला " आपण दोघे ही बरोबर होतो की"
"पण मी आजारी आहे तू उठून दार लाव की"
"माझी पाठ गेलीय कामातून"
"माझ्या पायात गोळे आले आहेत"
दोघेही स्वतः किती शिणलोय हे सांगत होते. कोणाचेच पारडे खाली जात नव्हते.
" मी लहान पणी किती खस्ता खाल्या...... धाकट्या भावंडांचे सर्व मलाच करावे लागायचे. आईचे प्रेम कधी मिळालेच नाही"
"मी सुद्धा ते केलय सावत्र आईचा छळ सोसलाय"
दोघांच्या व्यथा सारख्याच होत्या.
शेवटी दोघानी ठरवले की ज्याने जास्त दु:खे भोगली असतील तो झोपेल आणि दुसरा उठून दार लावेल
" मी लहान पणी फार दु:ख भोगले आहे दारुड्या बापाचा पाठ मोडेस्तोवर मार खाल्लाय" पहिला म्हणाला.
"आणि मी सावत्र आईचा" दुसरा म्हणाला.
" मी जेवत असताना समोरचे ताट भिरकावून दिले होते बापाने. मारहाणीत त्याने माझा हात मोडला"
" सावत्र आईने मला तापल्या तव्याचे चटके दिले होते"
".....@#......."
"!!!......----"
दोघे ही मित्र आपापली दु:खे सांगत होते.
दोघांचीही दु:ख्खे तुल्यबळ होती. कोणीच हार जायला तयार नव्हते.
दोघानीही अगदी आठवत होते त्या वयापासून आठवत होती ती सगळी दु:खे उगाळून झाली.
पहिल्या मित्राला हळूहळु राग येऊ लागला.
बाकी काही नाही निदान इतरांपेक्षा आपल्या कडे अभिमान बाळगावा असे काहितरी होते तेच कोणीतरी हिरावून नेत आहे असे त्याला वाटू लागले.
रागाच्या तिरीमीरीत तो ऊठला त्याने दुसर्‍याला लाथाबुक्क्यानी बदडून काढले.
मित्राला मारताना संतापाने तो रडत होता. मारून मारून पहिला मित्र दमला. दुसरा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला आता माराच्या वेदनाच जाणवत नव्हत्या.
भान आल्यावर पहिल्या मित्राला दुसर्‍याची अवस्था जाणवली. तो खजील झाला. त्याने दुसर्‍याची माफी मागितली. त्याला कुठे लागलेखुपले आएह का ते पाहिले. त्याची पाठ चेपू लागला. दुसरा मित्र ग्लानीत क्षीण हसला.
पहिल्या मित्राला त्या अवस्थेत मित्राचे हसणे पाहून नवल वाटले.
"फार मारले नी मी तुला" पहिला खजील होत म्हणाला
" हरकत नाही ...तू संतापाने मारलेस्.........जाऊदेत. सूखे नव्हतीच कधी आयूष्यात. दु:खेच होती. तु प्रत्येक दु:खाच्या बाबतीत आप्ण समसमान होतो. पणआज मी त्या बाबतीत तुझ्यापेक्षा वरचढ ठरलोय. आपला काहीच दोष नसताना मित्राने; लाथाबुक्यानी मारल्याचे दु:ख मी तुला मिळू देणार नाही"

Saturday, 21 May 2011

रूपक 1

एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत
झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच . माकड अशी एखादी संधी मिळते का पहायला एका उंच झाडावर जाऊन बसले.जंगलाचा सगळा परीसर त्या झाडावरुन दिसत होता.
एक संधी आणि आपले नाव सुवर्णाक्षरात......
माकड इकडे तिकडे पहात होते. तेवढ्यात त्याला एक सिंह; शिकार करून सावज खाऊन विश्रान्ती घेत झोपलेला दिसला. माकडाला आयती संधी मिळाली
झाडावरुन उतरुन ते तडक त्या झोपलेल्या सिंहाजवळ गेले. आणि माकडाने त्या झोपलेल्या सिंहाच्या कानाखाली एक जोरात वाजवली.
काहितरी करण्याच्या जोषात माकडाने सिंहाच्या कानाखाली वाजवली खरी पण नन्तर त्याला वस्तिस्थितीची जाणीव झाली. आपण काय करुन बसलो हे माकडाला जाणवले.त्याने ओळखले की आता आपले काही खरे नाही. हा सिंह; चिडलेला सिंह आपल्याला नक्कीच ठार मारणार.माकडाने तेथुन लगेच पळ काढला
सिंहाची झोप ताडकन उडाली त्याने डोळे उघडुन पाहीले. कानाशीलात काहितरी जोरात लागले हे त्याला कळाले. पळुन जाणा-या माकडाला पाहुन त्याला काय झाले हे त्याला कळाले. माकडाने सिंहाच्या ,जंगलच्या राजाच्या कानाखाली वाजवावी याचेच त्याला आश्चर्य वाटले.
क्षणभर माकडाच्या धाडसाचे कौतूक ही वाटले. पण मग नन्तर त्याने विचार केला की हे माकड जंगलात जाईल झाला प्रकार सर्वाना सांगेल.
मग जंगलच्या राजाची अब्रूच गेल्यासारखे होईल. कोणालाच आपले भय रहाणार नाही. या माकडाला आत्ताच मारुन टाकायला हवे.
सिंह माकडाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करु लागला.
माकड पुढे पळु लागले सिंह त्याच्या मागे. माकड पुढे सिंह मागे. माकड पुढे सिंह मागे. आता काही आपण वाचत नाही असा विचार करुन माकड जंगलातून आणखी जोरात पळु लागले.
माकडाला मारुन टाकलेच पाहीजे असा विचार करुन सिंह तेवढ्याच जोरात माकडामागे धावु लागला. माकड वाट सापदेल तसे धावत होते सिंह त्याच्या मागे धावतच होताच माकड पुढे सिंह मागे आडवेतिडवे या झाडा आडुन जा त्या पाय वाटेने जा इकडुन तिकडून धाव जीव मुठीत धरुन माकड पळत होते. आणि माकडाला जिमन्त सोडायचे नाहीच हे ठरवुन सिंह त्याच्या मागे पळत होता.
इकडे तिकडे आडवे तिडवे पळुन पळुन माकड आता दमुन गेले होते. लपायला जागा शोधत होते. तेवढ्यात त्याला जंगलात वाटेवर पडलेले एक कसले तरी जुने वर्तमानपत्र सापदले. वर्तमान पत्र उघडुन त्याच्या आडोशाने माकड एका झाडाच्या बुन्ध्याला टेकुन बसले.
माकडाच्या मागेमागे असलेला सिंह तिथेही पोहोचलाच. त्याने पाहिले की कोणीतरी वर्तमानपत्र वाचत बसलेला आहे.आपण त्यालाच विचारु यात असा विचार करुन सिंहाने विचारले सुद्धा " दादा या बाजुने कोणी एखादे माकड जाताना पाहिले तुम्ही?"
या प्रशनाला उत्त्तर म्हणुन माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो खालमानेने परत फ़िरला. म्हणाला "ऒ ! तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
ओशो रजनीशांची एक खासीयत आहे काही सांगताना ते विनोदाचा बरेचदा वापर करतात
एखादा विनोद सांगायचा आणि त्याचा रूपक म्हणुन वापर करून एखादा मर्मबोध करायचा.
ही त्यांची आवडती ष्टाईल.
ह्या विनोदाचा रूपक म्हणुन ते कसा सुंदर वापर करतील / ते कसा सांगतील बघा ...
अगोदर विनोद पूर्ण सांगतील आणि मग आधुन बधुन त्या विनोदातली वाक्ये घोळवत रहातील.
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे.
आपण सुद्धा या माकडासारखे असतो. वर्तमानात जगायच्या ऐवजी आपण जेंव्हा या जगात नसू तेंव्हा लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करत असतो. काही उपयोग आहे का?
पण आपल्याला नेहमीच वाटते असते की आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले जावे म्हणून.
मग विचार करु लागतो........वर्तमानाच नाही तर भविष्यकाळाचा ज्यात आपण असणारसुद्धा नाही त्या भविष्याकाळाचा विचार. मन हे खूप अजब असते. वर्तमानाचाच आधार घेउन ते तुम्हाला इतरत्र रमवत असते. स्वत:चे जाळे विणत असते तुम्हाला त्यात अडकवत असते.
जरा ओळ्खा या मनाला.
म्हणते की काहितरी असे कर जे तुला शक्य नाही का तर लोकानी त्यासाठी तुझे नाव घ्यावे.त्याने तुला आत्ता काहीही मिळणार नाही. आणि जेंव्हा लोक नाव घेतील तेंव्हा ते ऐकायला तू असणार सुद्धा नाहीस.
आपण थोडेसे त्या सिंहासारखे असतो. झोपलेले.... स्वप्नात मग्न. वर्तमाना कडे पूर्ण पाठ फ़िरवुन..भूतकाळाच्या गतवैभवात रममाण होऊन झोपलेले असतो. वर्तमान नावाचे काही असते हे विसरुन स्वत:च्या साम्राज्यात रममाण असतो. एखादे माकड येते आपल्या कानाखाली देते. आपली स्वप्ने नगरी चक्काचूर होते स्वप्ने विखुरली जातात.. एखादे माकड आपली स्वप्नांची दुनिया उलटी करुन जाते. एखादा क्षुल्लक प्रसंग आपल्या ताळ्यावर आणुन ठेवतो.हवेत उडणारी पावले जमिनीवर टेकवतो.
आपल्याला राग येतो. ताळ्यावर आल्याच्या नव्हे ....तर आपण स्वप्नात होतो हे लोकाना समजले याचा
त्या क्षुल्लक कारणाच्या मागे आपण हात धुऊन पूर्ण शक्तिनिशी लागतो.
आणि तद्दन फ़ालतू का होईना ध्येय अगदी हातापाशी जवळ आलेले असताना एखाद्या किरकोळ कारणासाठी शेपुट फ़िरवुन माघार घेतो.
लोक काय म्हणतील या बाऊ ला घाबरुन आपल्याला जमत असलेले कामही अवघड करुन ठेवतो.
सिंहाने वर्तमानपत्र बाजूला करुन बघितले असते तर माकड सहज हाती लागले असते.
माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो परत फ़िरला म्हणाला "ऒ तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
सत्य हे असेच असते. ते एखाद्या पातळ पडद्याआड दडलेले असते. आपण तो पडदा बाजूला करायचे कष्ट घेतच नाही.
कुणाच्या तरी एखाद्या क्षुल्लक शब्दाला महत्व देऊन "संपलंच की सगळं" म्हणत माघार घेतो. सत्य हे आपल्या समोरच असते. फ़क्त आपण त्या भोवतालचे लोकाचार , समाजमन , शिष्ठाचार , जात, धर्मग्रन्थ हे असले भ्रामक पडदे बाजूला सारत नाही. सत्य पडद्या आडच रहाते.आपण मात्र त्याच्या अगदी जवळ जाउन माघारी फ़िरलेलो असतो...... पराभूत होऊन.
:::::::स्वामी विजुभौ
( डीस्क्लेमर: प्रस्तूत रूपक हे ओशो रजनीशानी कधीही कोणत्याही व्याख्यानात सांगीतले नव्हते. हे लिखाण हे विजुभौंचे विचार आहेत.)

हॅट्स ऑफ टू लिलीयन

एखादे पुस्तक वाचल्यानन्तर त्यातील पात्रे आपल्याला भेटली तर किती बरे असे वाटत रहाते. आणि जर ते पुस्तक तुमच्या आवडत्या पुस्तकापैकी असेल तर मग विचारायलाच नको.
"चीपर बाय डझन" हे पुस्तक मी प्रथम किर्लोस्कर मासीकातुन तुकड्यातुकड्यात वाचले. मग नन्तर कधितरी ते आख्खे पुस्तक हातात लागले. आजतागायत त्याची पारायणे झाली तरी मनातुन अजून् सुटले नाही.
चीपर बाय डझन ही बारा भावन्डे आणि त्यांचे आईवडील यांची खरी कहाणी. त्या बारा भावंडांपैकी दोघानी सांगितलेली. आपल्याला आई वडीलानी कसे वाढवले; त्या सगळ्या गम्मती सांगतानाच पालकत्व कसे असावे हेही सांगणारी मस्त गोष्ट असे या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल.
फ्रॅन्क गिल्ब्रेथ आणि लिलीयन मोलर ही दोघे टाईम ऍन्ड मोशन स्टडीचे कन्सल्टन्ट. त्याना बारा मुले होती. इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी देताना करावे लागनारे सर्व प्राथमीक प्रयोग त्यानी आपल्या मुलांवर केले. यात गणीत शिकवण्यपासून ते भाषा शिकण्यापर्यन्त सर्व काही. मुलाना भाषा लवकर शिकता यावी तसेच मिळालेला प्रत्येक क्षण उपयोगात आणता यावा यासाठी मुले आंघोळ करताना भाषेच्या रेकॉर्ड्स लावुन ठेउन त्यांच्या कानावर भाषा पडावी किंवा झोपतानासुद्धा मुलाना सहजगत्या गणीताची सूत्रे डोळ्यासमोर दिसावीत म्हणून ती छतावर लिहुन ठेवणे यासारखे मजेदार उपाय त्यानी केले.
कारखान्यात हालचालींचे व्यवस्थापन शिकवताना सर्वात आळशी कामगार समोर ठेवा की तो कमीतकमी हालचालीत काम करतो असे भन्नाट पण उपयोगी युक्त्यांचा वापर करत.
बारा मुले घरात कशी एकमेकांची देखभाल करताना होणार्‍या गम्मती हा तर या पुस्तकाचा सर्वात धम्माल भाग.
शस्त्रक्रिया करताना सर्जनना स्वतःचावेळ वाचवता यावा म्हणून या गिल्ब्रेथ महाशयानी स्वतःवर शस्त्रक्रिया करतानाच्या फिल्म्स घेउन त्याचे ऍनालिसीस केले. तसेच दाढी करताना दोन्ही हातानी केल्यास १९ सेकन्द वेळ वाचतो असेही प्रयोग करुन पाहिले. प्रत्येक कामात हालचाली कमी वेळात करुन वेळ कसा वाचवता येईल याचे अनेक प्रयोग या पुस्तकात आहेत.
मुलाना श्रमाचे महत्त्व कळावे म्हणून घरातल्या घरातच कामांचे लीलाव ( सर्वात कमी बोली बोलेल त्याला काम )करायची पद्धत किंवा कामाची वाटणी यातुन घराचे व्यस्थापन असे अनेक प्रसंग यात आहेत.
एकदा त्याना कोणीतरी विचारले की इतका वेळ वाचवुन करायचे काय? गिल्ब्रेथ महोदयाने उत्तर दिले मिळालेले क्षन आनन्दात जगायचे.फ्रॅन्क गिल्ब्रेथने दुसर्‍या महायुद्धाच्या कालात अमेरेकन सैन्याला हालचालींचे व्यवस्थापन कसे करायचे तेही शिकवले.
फ्रॅन्क गिल्ब्रेथच्या मृत्यु च्या घटनेवर हे पुस्तक संपते. पण त्याचे वेगवेगळे प्रयोग मनातुन कधीच संपत नाहीत
हे पुस्तक वाचुन झाल्यावर मी कोठेतरी वाचले की त्या बारा मुलांची आई लिलीयनला अमेरीकेत १९४७ सालचे लेडी ऑफ द ईयर हे पारीतोषीक मिळाले.
जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बारा मुलंची आई असलेल्या लिलीयनचे पुढे काय झाले याचा जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बेलीज ओन देअर टोज मध्ये बाप नसताना त्यांच्या आईने सगळ्याना कसे साम्भाळले;आणि त्यावेळी करावा लागलेला संघर्ष याबद्दल लिहिले आहे.
फ्रॅन्क गेल्यावर लिलीयन ने त्याचा इन्डस्ट्रीयल कन्सल्तन्सीचा व्यवसाय संभाळला.
एखादी "स्त्री" इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी करु शकेल यावर त्या काळच्या लोकांचा विष्वासच बसत नव्हता परिणिती कित्येक क्लायन्ट इतरत्र जाउ लागले. लिलीयनला आपणही कन्सल्टन्सी करु शकतो हे लोकाना पटवुन सांगावे लागायचे. एखादी स्त्री औद्योगीक सल्लागार असु शकते हे त्यावेळच्या अमेरीकन समाजाला पटतच नव्हते. लिलीयन ने तिची अनेक पुस्तके पती फ्रॅन्क गिलब्रेथ च्या नावावर लिहिले आहेत.
लिलीयनला तिच्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले.त्यात २० वेगवेगळ्या प्रकारच्या मानद पदव्या आहेत. १९२१ साली ती सोसायटी ऑफ इन्डस्ट्रीयल इंन्जेनीयर या संस्थेची पहिली महिला सभासद होती. फूट पेडल ट्रॅश कॅन आणि फ्रीज मधली कप्प्यांची दारे हे शोधही तिच्या नावावर आहेत. होममेकर ऍन्ड हर जॉब आणि लिव्हिन्ग विथ अवर चिल्ड्रेन ही दोन पुस्तके तिने केवळ गृहिणींसाठी स्वातन्त्र्य आणि जगण्याचा आनन्द कसा घ्यावा हे सांगत लिहिली. यात तिने घर ही एक आनन्दाची जागा आहे व्यक्तिमत्व खुलण्यासाठी आनन्दी घर गरजेचे आहे. आनन्दी घर राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलली तरच हे शक्य होते हे ठामपणे मांडले. वयाच्या नव्वद वर्षापर्यन्त लिलीयन कार्यरत राहिली. वेगवेगळ्या कम्पन्यांमध्ये संशोधन करत वेगवेगळ्या विद्यापीठात लेक्चर्स देत तिने काम केले. २ जानेवारी १९७२ ला वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी देहावसान झाले.
गृहिणी झाले की सम्पले चूल मूल हेच आपले करीयर न मानता स्वतःच्या बारा मुलांचे नीट संगोपनकरुनही लिलीयन अखंड कार्यरत राहिली. एक यशस्वी व्यक्ती म्हणून औद्योगीक जगाला तीची दखल घ्यायला लावली.
हॅट्स ऑफ टू लिलीयन गिल्ब्रेथ.